माहिती देत नसल्याचा आरोप;कॅफोंचा चार्ज काढण्याचे आदेश : आयुक्तांची सावध भूमिका
छत्रपती संभाजीनगर : Municipal Audit Chief Finance Officer : महापालिकेत २६/११ रोजी झालेली स्थायी समितीची सभा प्रशासन आणि समितीच्या सदस्यांसाठी धक्कादायक निर्णय देणारी ठरली. चार वेळा पत्र देऊनही ऑडिटसाठी माहिती दिली जात नाही, पाच वर्षात ऑडिट झालेले नाही, असे सांगत सभापती अनिल मकरिये यांनी मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांचा पदभार काढण्याचे आदेश दिले.
विशेष म्हणजे या सभेत एक विषय वगळता इतर सर्व विषय एका मिनिटात मंजूर करत, सभापतींनी हा आदेश ‘बॉम्ब’ प्रशासनावर टाकत सभा आटोपती घेतली. त्यानंतर आयुक्तांच्या दालनात अर्धा तास याच विषयावर खल झाला. यापूर्वीच्या सभांमध्ये सभापतींनी दिलेल्या अनेक आदेशावर आयुक्तांनी कार्यवाही केलेली नाही, त्यामुळे या आदेशानुसार उद्याच आयुक्त पदभार काढतील का?, अशी चर्चाही मनपा वर्तुळात रंगली होती.
सभापती मकरिये यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील, कल्पिता पिंपळे, नगर सचिव नंदकिशोर भोंबे यांच्यासह अधिकारी, समिती सदस्य उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीला हर्सूल प्रक्रिया प्रकल्प केंद्राच्या आगीचा मुद्दा उपस्थित झाला, मात्र या विषयावर सभापतींनी नगरसेवक राजगौरव वानखेडे यांच्यासह सदस्यांना जास्त बोलू दिले नाही. त्यानंत मागील सभेचे इतिवृत्त मंजूर केले. त्यानंतर विषय क्रमांक १०५ वगळता इतर सर्व (एकूण १५) विषय मंजूर असल्याचे सभापतींनी घोषित केले.
त्यानंतर हातातील पत्र दाखवित, लेखा विभागाची चौकशी करावी, तोपर्यंत मुख्य लेखा व वित्त अधिकारी संतोष वाहुळे यांचा चार्ज काढून मुख्य लेखा परीक्षक शिवाजी नाईकवाडे यांच्याकडे देण्यात यावा, असे आदेश दिले. चार वेळा पत्र दिले, तरीही माहिती दिली नाही. पाच वर्षापासून लेखा विभागाचे ऑडिट झालेले नाही, अशी जोडही सभापतींनी दिली. यावेळी लेखा परीक्षक नाईकवाडे यांनी लेखा परीक्षणाबाबतचे अधिनियमातील कलम व तरतूदीची माहिती सभागृहाला दिली.
आयुक्तांच्या दालनात अर्धा तास झाली चर्चा
प्रत्येक स्थायी समितीच्या बैठकीत आयुक्त न आल्याने नाराजीचा सूर सभापतींना ओढलेला आहे, आजही सभा सुरू झाली तेव्हा आयुक्त आलेले नव्हते. सदस्यांनी याकडे लक्ष वेधले असता, त्यांची मुख्यमंत्र्यांसोबतच व्हीसी चालू असल्याचे खुद्द सभापतींनीच सांगितले. आदेश दिल्यानंतर बैठक आटोपती घेण्याच्या एक मिनिट आधी आयुक्त अमोल येडगे सभागृहात आले. मात्र राष्ट्रगीत सुरू झाले. त्यानंतर सभापती व आयुक्त व इतर पदाधिकारी दालनात गेले. आयुक्तांच्या दालनात सुमारे अर्धा तास चर्चा चालली. यावेळी नगरसेवक राजगौरव वानखेडे, ॲड. माधुरी अदवंत, अमित भुईगळ यांच्यासह एमआयएमचे तीन नगरसेवक आणि मुख्य वित्त व लेखा अधिकारी वाहुळे, लेखा परीक्षक नाईकवाडे आदी उपस्थित होते.
अधिकाऱ्यांना टार्गेट करणे योग्य नाही: भुईगळ
सभापतींनी आदेश दिल्यानंतर वंचितचे नगरसेवक तथा समिती सदस्य अमित भुईगळ यांनी सभापतींच्या या आदेशावर नाराजी व्यक्त केली. एखाद्या अधिकाऱ्याला टार्गेट करणे, एकतर्फी कारवाई करणे योग्य नाही. आदेश देण्यापूर्वी त्या अधिकाऱ्यांना सभागृहात खुलासा करू द्यावा, त्यांनी माहिती का नाही दिली, काय अडचणी आहेत, काय कारणे आहेत, हे ते सांगतील, त्यांना खुलासा करू द्यावा, अशी मागणी भुईगळ यांनी केली, मात्र सभापतींनी त्यांचे काही ऐकले नाही.
माहिती देण्यास अडचण काय : सभापती
महापालिकेच्या उत्पन्नाचा स्त्रोत आणि खर्चाचा तपशील देण्यासंदर्भात ५ मे, १५ ऑक्टोबर आणि २७ ऑक्टोबर या तारखांना पत्र दिलेले आहे. त्यानंतरही माहिती काही दिली नाही. चुकीचे काम करत नाही तर माहिती देण्यास काय अडचण आहे. मी महापालिकेचे १ रुपयाचेही नुकसान होऊ देणार नाही.: अनिल मकरिये, सभापती.
तपासून नियमानुसार कार्यवाही करू : आयुक्त
मी बैठकीत नसल्याने स्थायी समितीच्या बैठकीत काय झाले, याबाबत मला माहित नाही. मी जेव्हा आलो, तेव्हा सभा संपली होती. काय निर्णय झाले हे इतिवृत्तात येईल. काय माहिती दिली, किती माहिती दिली, याबाबत दोन्ही अधिकाऱ्यांचा खुलासा घेतल्याशिवाय मला समजणार नाही. या प्रकरणात तपासून नियमानुसार जी कार्यवाही असेल ती करण्यात येईल.: अमोल येडगे, आयुक्त.
Read About : Horizon Supercomputer : अमेरिकेतील शक्तिशाली शैक्षणिक सुपरकॉम्प्युटर होरायझन कार्यान्वित; 132 पेटाफ्लॉप्स वेगाने करणार संशोधन
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.