Ad Advertisement Ad Advertisement

Vertical Property Card – राज्यातील 7 कोटी फ्लॅटधारकांना मिळणार ‘व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड; फडणवीस सरकारचा ऐतिहासिक निर्णय

हरकती, सूचना नोंदण्यासाठी नियमावलीचा मसुदा 30 दिवस संकेतस्थळावर

मुंबई : Vertical Property Card – जमिनीच्या ‘सातबारा’च्या धर्तीवर फ्लॅटधारकांना स्वतंत्र ओळख आणि कायदेशीर हक्क देणारे ‘स्वतंत्र मालमत्ता पत्रिका’ (व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड) प्रदान करण्याचा ऐतिहासिक निर्णय फडणवीस सरकारने घेतला आहे. राज्यातील अंदाजे 7 कोटी सदनिकाधारकांना याचा लाभ मिळेल, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी दिली.

या नियमावलीचा मसुदा (ड्राफ्ट) गुरुवारी महसूल विभागाच्या शासकीय संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला असून, त्यावर 30 दिवस नागरिक आणि तज्ज्ञांकडून सूचना आणि हरकती मागवण्यात आल्या आहेत. त्यानंतर पुढील दोन महिन्यांत नियमावली अंतिम करून ही योजना राज्यभर लागू केली जाईल, असे अशी माहिती महसूलमंत्री बावनकुळे यांनी पत्रकारांना दिली. यावेळी महसूल राज्यमंत्री योगेश कदम उपस्थित होते.

नियमावली अचूक करण्याचा प्रयत्न

ग्रामीण भागात जसा जमिनीसाठी सातबारा आणि शहरी भागात मिळकत पत्रिका (CTS) असते, तशी स्वतंत्र ओळख व मालकी हक्काचा ठोस अभिलेख फ्लॅटधारकांकडे नव्हता. ही कमतरता भरून काढण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 मधील नियमांमध्ये सुधारणा करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, या मसुद्याचा अभ्यास करून नागरिकांनी आणि माध्यमांनी जास्तीत जास्त सूचना द्याव्यात, जेणेकरून नियमावली अधिक अचूक तयार करता येईल, असे आवाहनही चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

D1 आणि D2 नमुन्यांत स्वतंत्र नोंदी

नव्या रचनेनुसार, नागरी भागातील इमारतींसाठी ‘D1’ आणि ‘D2’ असे नमुने निश्चित करण्यात आले आहेत.

  • D1 नमुना : मूळ मालक, जमीन, मंजूर बांधकाम आराखडा, खुली जागा, रस्ते आणि सामाईक क्षेत्राचा सर्वसमावेशक मुख्य अभिलेख यामध्ये राहील. सामाईक जागेवर सर्वांचा हक्क नोंदवला जाईल.
  • D2 नमुना : प्रत्येक फ्लॅटधारकाचे नाव, सदनिका क्रमांक, मंजूर क्षेत्रफळ आणि संबंधित हक्कांची स्वतंत्र नोंद यामध्ये असेल.
  • ग्रामीण भाग : ग्रामीण भागातील इमारतींसाठी ‘आयए (IA) – गाव नमूना 7 क’ आणि ‘आयबी (IB) – गाव नमूना 7 ड’ अशा स्वरूपात अभिलेख तयार केले जातील.
डिजिटल कार्ड आणि सर्व विभागांचे एकत्रिकरण

संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन राबवली जाणार असून, मंजुरीनंतर फ्लॅटधारकांना एटीएम कार्डप्रमाणे खिशात ठेवता येईल, असे डिजिटल प्रॉपर्टी कार्ड मिळेल. यासाठी नोंदणी आणि मुद्रांक विभाग, सहकार विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, नियोजन प्राधिकरणे (सिडको, नैना, महापालिका, नगरपालिका), महारेरा आणि भूमी अभिलेख विभागांचे API माध्यमातून एकत्रीकरण केले जाणार आहे. इमारतीचा पुनर्विकास झाल्यास जुन्या नोंदी बंद करून नवीन आराखड्यानुसार अद्ययावत नोंदी केल्या जातील.

बोजे, कर्ज आणि व्यवहार सुलभ होणार

  • फ्लॅटवर बँकेचे कर्ज, गहाणखत, मालमत्ता कर किंवा सोसायटीची थकबाकी, न्यायालयीन निर्बंध अथवा शासकीय देणी असल्यास त्याची थेट नोंद संबंधित प्रॉपर्टी कार्डवर होईल.
  • बिल्डरचे कॉमन कर्ज मुख्य नोंदीवर, तर वैयक्तिक कर्ज संबंधित सदनीकाधारकाच्या कार्डवर दिसेल.
  • अधिकृत बांधकाम, मंजूर नकाशा आणि संबंधित कागदपत्रे असलेल्या प्रकल्पांनाच हे कार्ड मिळणार असून, अनधिकृत बांधकामांना यातून वगळण्यात आले आहे.
पुनर्विकास आणि कन्व्हेयन्सबाबत स्पष्टीकरण

कन्व्हेयन्स आणि पुनर्विकासाच्या प्रश्नावर बोलताना महसूलमंत्र्यांनी स्पष्ट केले की, डीम कन्व्हेयन्सची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी महसूल, नगरविकास आणि सहकार विभागाची कार्यपद्धती (SOP) तयार करण्यात येत आहे.

Read About : Maharashtra Girls Gold Medal – महाराष्ट्राच्या मुलींचा ‘सुवर्ण दबदबा’ कायम!

E-paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.