Ad Advertisement Ad Advertisement

Maharashtra Girls Gold Medal – महाराष्ट्राच्या मुलींचा ‘सुवर्ण दबदबा’ कायम!

४५ व्या कनिष्ठ राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत २७ व्यांदा विजेता

वडोदरा : Maharashtra Girls Gold Medal आक्रमणाचा वेग, संरक्षणातील संयम आणि सांघिक ताकदीची अभेद्य भिंत… या त्रिसूत्रीच्या जोरावर महाराष्ट्राच्या मुलींनी ४५ व्या कनिष्ठ राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत सुवर्णपदकावर दिमाखात मोहोर उमटवली! महाराष्ट्राने अंतिम सामन्यात ओडिशाला २७-१९ अशा आठ गुणांनी नमवत आपले २७ वे राष्ट्रीय विजेतेपद पटकावले. विशेष म्हणजे, महाराष्ट्राच्या मुलींनी सलग १२ व्या विजेतेपदाची ऐतिहासिक कामगिरी नोंदवत राष्ट्रीय खो-खोवरील आपले निर्विवाद वर्चस्व पुन्हा अधोरेखित केले.

गतविजेत्या महाराष्ट्राने आक्रमणाची संधी साधत सुरुवातीपासूनच वेगवान खेळ केला. पहिल्या डावात १२ गुण आणि ३ बोनस गुणांची कमाई करत एकूण १५ गुण नोंदवले. महाराष्ट्राच्या आक्रमणापुढे ओडिशाला पहिल्या डावात केवळ ६ गुणांवर समाधान मानावे लागले. आघाडीवर असलेल्या महाराष्ट्राने दुसऱ्या डावातही खेळावरील पकड सैल होऊ दिली नाही. आक्रमणात १० गुणांची कमाई करत विजयाच्या दिशेने आणखी एक भक्कम पाऊल टाकले. ओडिशानेही दुसऱ्या डावात १० गुण मिळवत प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पहिल्या डावातील पिछाडी भरून काढणे त्यांना शक्य झाले नाही. या डावात महाराष्ट्राने २, तर ओडिशाने ३ बोनस गुण मिळवले. परिणामी महाराष्ट्राने २७-१९ अशी आठ गुणांची विजयी आघाडी कायम राखत सुवर्णपदकावर कब्जा केला.

मुलांचे उपविजेतेपदावर समाधान

मुलांच्या अंतिम लढतीत महाराष्ट्राला अवघ्या चार गुणांनी कर्नाटककडून पराभवाचा धक्का स्वीकारावा लागला. कर्नाटकने ३०-२६ अशी मात करत ४५ व्या कनिष्ठ राष्ट्रीय खो-खो स्पर्धेतील मुलांचे विजेतेपद पटकावले. विशेष म्हणजे, कर्नाटकने सलग दुसऱ्या वर्षी अंतिम सामन्यात महाराष्ट्राला नमवल्याने महाराष्ट्राच्या गोटात या पराभवाची सल कायम राहिली. जितेंद्र वसावे आणि तबरेज खान यांच्या आक्रमणातील गुणांनी महाराष्ट्राला सामन्यात टिकवून ठेवले; तर अन्य खेळाडूंनी संरक्षणात कडवी झुंज दिली. मात्र, चार गुणांमुळे विजेतेपद हातातून निसटले.

धनश्रीला जानकी पुरस्कार; इब्राहिमला वीर अभिमन्यू पुरस्कार

स्पर्धेतील वैयक्तिक पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राच्या धनश्री कंकने उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर मुलींच्या गटातील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा ‘जानकी पुरस्कार’ पटकावला. ठाणे, महाराष्ट्राच्या धनश्रीने आपल्या खेळाने स्पर्धेत विशेष छाप पाडली. तर कर्नाटकच्या इब्राहिमला मुलांच्या गटातील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा ‘वीर अभिमन्यू पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले.

Read About : Maharashtra Exam Fee Waiver 15 Lakh Students – दुष्काळग्रस्त 15.28 लाख विद्यार्थ्यांना 96.27 कोटींची परीक्षा शुल्कमाफी

E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.