१२ महिन्यांहून अधिक काळ गोवरचा अखंडित प्रसार; २०२६ मध्ये ५,४०० हून अधिक रुग्ण आणि किमान १० जणांचा मृत्यू
वॉशिंग्टन : US Loses Measles-Free Status After 26 Years सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रात अमेरिकेला एक मोठा धक्का बसला असून, तब्बल २६ वर्षांनंतर अमेरिकेने आपला गोवर-मुक्त दर्जा अधिकृतपणे गमावला आहे. पॅन अमेरिकन हेल्थ ऑर्गनायझेशन या जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रादेशिक शाखेने ही घोषणा केली. देशात सलग १२ महिन्यांहून अधिक काळ गोवरच्या एकाच विषाणूचा अखंडित प्रसार सुरू राहिल्याने हा निर्णय घेण्यात आहे.
अमेरिकेने २००० साली गोवरचे यशस्वीरित्या उच्चाटन केले होते आणि २०२४ पर्यंत दरवर्षी देशात गोवरचे १०० पेक्षा कमी रुग्ण आढळत होते. मात्र, २०२६ मध्ये आतापर्यंत देशात गोवरचे ५,४०० हून अधिक रुग्ण आढळले असून, किमान १० जणांचा मृत्यू झाला आहे. ही गेल्या तीन दशकांतील सर्वात मोठी साथ ठरली आहे. लसीकरणाबाबत पसरलेले गैरसमज आणि मुलांच्या लसीकरणाचे घटते प्रमाण ही यामागील मुख्य कारणे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
संसर्ग रोखण्यासाठी लहान मुलांमध्ये एमएमआर लसीकरणाचे प्रमाण किमान ९५ टक्के असणे आवश्यक असते. परंतु, २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात अमेरिकेतील बालवाडीच्या मुलांमधील लसीकरणाचे प्रमाण ९२.४ टक्क्यांपर्यंत खाली घसरले आहे, तर काही राज्यांत ते ७५ टक्क्यांपर्यंत कमी झाले आहे.
आरोग्य विभागाचे सचिव रॉबर्ट एफ. केनेडी ज्युनियर यांच्या नेतृत्वाखाली लसीकरणाबाबत चुकीच्या माहितीला आळा घालण्यात अपयश आल्याची टीका सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञांनी केली आहे. अमेरिकेसोबतच मेक्सिको, बोलिव्हिया, ब्रिटन आणि स्पेन या देशांनीही यंदा आपला गोवर-मुक्त दर्जा गमावला आहे. हा दर्जा पुन्हा मिळवण्यासाठी अमेरिकेला आता पुढील काही आठवड्यांत कृती आराखडा सादर करून लसीकरण मोहीम तीव्र करावी लागणार आहे.
Read About : Packaged Food Warning Labels : पॅकेज्ड खाद्यपदार्थांवर हाय फॅट, हाय शुगर, हाय सॉल्ट चेतावणी लेबल बंधनकारक; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
E-paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.