३० नोव्हेंबरला लोकसभा, तर २ डिसेंबरला राज्यसभेची बैठक
महिला आरक्षणाशी संबंधित विधेयक सादर होणार
नवी दिल्ली : Parliament special session 2026 एकीकडे संसदेचे पावसाळी अधिवेशन संपल्याची अधिकृत घोषणा झालेली नसतानाच, केंद्र सरकारने आवश्यक शासकीय कामकाज पूर्ण करण्यासाठी लोकसभा आणि राज्यसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्याचा निर्णय गुरुवारी घेतला आहे. यानुसार, लोकसभेची बैठक ३० नोव्हेंबर, तर राज्यसभेची बैठक २ डिसेंबरपासून होणार आहे. या अधिवेशनात महिला आरक्षण व परिसीमन (मतदारसंघ पुनर्रचना) संबंधित घटनादुरुस्ती विधेयक पुन्हा सादर करणे व ते कोणत्याही स्थितीत मंजूर करवून घेण्यावर सरकार भर देणार असल्याचे समजते. या घटनाक्रमात केंद्रीय मंत्रिमंडळाची आज शुक्रवारी नवी दिल्लीत बैठक बोलावण्यात आली आहे. यात महिला आरक्षण व मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावर काथ्याकूट होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
केंद्र सरकार ३३ टक्के महिला आरक्षण विधेयक व त्या संबंधित मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मंजूर करण्यासाठी दोन तृतियांश बहुमत जुळवण्याच्या प्रयत्नात आहे. अशातच लोकसभा व राज्यसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. याबाबत संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू यांनी घोषणा केली. या अधिवेशनात मतदारसंघ पुनर्रचना संबंधित महिला आरक्षण विधेयक पुन्हा सादर करणे व ते मंजूर केले जाण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. सरकारने लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला आणि राज्यसभेचे सभापती सी. पी. राधाकृष्णन यांना दोन्ही सभागृहांची बैठक पुन्हा बोलावण्याची विनंती केली.
संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज ३ डिसेंबर रोजी समाप्त होऊ शकते, असे रिजिजू यांनी ट्विटरवरील पोस्टमध्ये सांगितले. दरम्यान, संसदेच्या पावसाळी अधिवेशनांतर्गत दोन्ही सभागृहांचे कामकाज गेल्या १३ ऑगस्ट रोजी अनिश्चित काळासाठी तहकूब झाले. मात्र त्यानंतर सत्रावसान झाले नव्हते. आता ३० नोव्हेंबर व २ डिसेंबरचे कामकाज संपताच पावसाळी अधिवेशनाचे सूप वाजल्याची घोषणा सरकार करू शकते.
लोकसभा होणार ८५० जागांची?
मतदारसंघ पुनर्रचनेच्या माध्यमातून लोकसभेच्या जागा ५४३ वरून ८५० करणे प्रस्तावित आहे. तसेच २०२९ च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी संसद तसेच राज्य विधानसभांमध्ये महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण लागू करण्याचा मार्ग मोकळा करणे हा प्रस्तुत विधेयकाचा उद्देश आहे. मात्र, हे विधेयक मंजूर होण्यासाठी सरकारसमोर संख्याबळाचे आव्हान आहे. घटनादुरुस्ती विधेयकाला लोकसभेत दोन-तृतीयांश म्हणजेच ३६१ मतांची गरज आहे. ३ जागा रिक्त असल्यामुळे सध्या सभागृहात ५४० सदस्य आहेत. सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे (एनडीए) ३२० सदस्य आहेत आणि विधेयक मंजूर करून घेण्यासाठी त्यांना विरोधी पक्षांच्या पाठिंब्याची आवश्यकता असेल.
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.