Ad Advertisement Ad Advertisement

Killer Robots वर नियंत्रणाचा प्रयत्न अपयशी; संयुक्त राष्ट्रांची चर्चा 2028 पर्यंत लांबणीवर

स्वायत्त ड्रोन्स आणि एआयवर आधारित शस्त्रांच्या वापरावर बंधनकारक करार होऊ शकला नाही; १२८ देशांच्या चर्चेत सर्वसहमतीचा अभाव

जिनिव्हा : Killer Robots कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित ‘किलर रोबोट्स’ आणि स्वायत्त ड्रोन्सच्या वापरावर कडक नियम घालण्याचे प्रयत्न शनिवारी पुन्हा एकदा निष्फळ ठरले. जिनिव्हा येथे संयुक्त राष्ट्रांच्या (यूएन) पुढाकाराने सुरू असलेल्या आठवडाभराच्या परिषदेत ठोस आणि बंधनकारक करार करण्याऐवजी, या विषयावरील चर्चा पुढील दोन वर्षे (२०२८ पर्यंत) सुरू ठेवण्यावर देशांमध्ये एकमत झाले आहे.
संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस, अनेक देश आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांनी मानवी नियंत्रणाशिवाय हल्ला करणाऱ्या शस्त्रांवर कायदेशीर बंधने घालण्याची मागणी केली होती. मात्र, जागतिक संघर्ष आणि बड्या लष्करी महासत्तांच्या वर्चस्वाच्या स्पर्धेमुळे ठोस निर्णय होऊ शकला नाही.

महासत्तांचा अडथळा

रशिया आणि अमेरिका यांसारख्या प्रगत एआय शस्त्रे विकसित करणाऱ्या देशांनी करारातील कठोर तरतुदींना विरोध केल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे. उच्च-तंत्रज्ञान शस्त्रांच्या विकासात मुक्त वाव मिळावा, अशी या देशांची भूमिका असल्याचे बोलले जात आहे.

निर्णय प्रक्रियेतील मर्यादा

ही चर्चा १२८ देशांचा सहभाग असलेल्या विशिष्ट पारंपरिक शस्त्रास्त्रांवरील करारांतर्गत (सीसीडब्ल्यू) अंतर्गत झाली. येथे कोणताही निर्णय सर्वसहमतीने घ्यावा लागतो, ज्यामुळे एका जरी देशाने विरोध केला तरी करार रखडतो.

कार्यकर्त्यांची नाराजी

‘स्टॉप किलर रोबोट्स’ या संघटनेने या निर्णयाला अत्यंत सौम्य म्हटले आहे. गेल्या १४ वर्षांपासून देश केवळ चर्चाच करत आहेत, तर दुसरीकडे या शस्त्रांमुळे अत्याचार वाढत आहेत, अशी तीव्र प्रतिक्रिया एमआयटीचे संशोधक मॅक्स टेगमार यांनी व्यक्त केली.

संयुक्त राष्ट्रांची भूमिका

नि:शस्त्रीकरण प्रकरणाच्या उच्च प्रतिनिधी इझुमी नाकामित्सू यांनी एआय प्रगतीचे स्वागत केले असले तरी, हा निर्णय म्हणजे ‘पेला अर्धा भरलेला की अर्धा रिकामा’ अशी स्थिती असल्याचे मान्य केले.

तांत्रिक वेग आणि राजनैतिक संथपणा

परिषदेपूर्वी ब्राझील, ऑस्ट्रिया, बेल्जियम, आयर्लंड, मेक्सिको, न्यूझीलंड आणि पनामा या सात देशांनी मानवी नियंत्रणाशिवाय होणाऱ्या संहारावर मर्यादा घालणारी नियमावली तयार करण्याचा प्रस्ताव मांडला होता, परंतु त्याला यश आले नाही. तंत्रज्ञान हे मुत्सद्देगिरीपेक्षा वेगाने पुढे जात आहे आणि राजनैतिक प्रक्रिया खूपच संथ आहे, अशी खंत ब्राझीलचे राजदूत फ्रेडरिको मेयर यांनी व्यक्त केली.

पोप लिओ चौदावे आणि विविध मानवतावादी संघटनांनी हा प्रश्न मानवी अस्तित्वाशी जोडलेला असल्याचे सांगत, ही शस्त्रे सामान्य होण्यापूर्वीच त्यांच्यावर नियंत्रण आणण्याचे आवाहन केले आहे. सध्या युद्धक्षेत्रात काही प्रमाणात स्वायत्त ड्रोन्सचा वापर सुरू झाला असून, २०२८ पर्यंत होणाऱ्या पुढील चर्चेतून यावर काही ठोस मार्ग निघतो का, याकडे जगाचे लक्ष लागले आहे.

Read About : एआयच्या युगात सायबर लवचिकताच व्यवसायाची खरी ढाल; हल्ल्यानंतरही कामकाज सुरू ठेवण्यावर भर – Cyber Resilience

E-paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.