Ad Advertisement Ad Advertisement

जर्मनीतील उद्योगांनी महाराष्ट्रात उत्पादनासह संशोधन आणि विकास केंद्रे उभारावीत; मुख्यमंत्री फडणवीसांचे आवाहन Foreign Investment

लोअर सॅक्सोनीचे मंत्री-अध्यक्ष ओलाफ लाईस यांच्या शिष्टमंडळासमवेत चर्चा

मुंबई : Foreign Investment – महाराष्ट्राचे आर्थिक सामर्थ्य, कुशल मनुष्यबळ, वेगाने विस्तारणारी बाजारपेठ आणि वैविध्यपूर्ण औद्योगिक परिसंस्था यामुळे जर्मनीच्या लोअर सॅक्सोनी राज्यातील उद्योगांसाठी राज्यात गुंतवणुकीच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. जर्मन उद्योगांनी महाराष्ट्रात उत्पादनासह संशोधन आणि विकास केंद्रे उभारून जगभरातील बाजारपेठांना सेवा द्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

लोअर सॅक्सोनीचे मंत्री-अध्यक्ष ओलाफ लाईस यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळासमवेत वर्षा निवासस्थानी झालेल्या चर्चेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी उभय राज्यांतील सहकार्याचा कृती आराखडा मांडला.

महाराष्ट्र-लोअर सॅक्सोनी संयुक्त कार्यगट

भागीदारीला ठोस स्वरूप देण्यासाठी वरिष्ठ शासकीय अधिकारी, उद्योग प्रतिनिधी आणि शैक्षणिक संस्थांचा समावेश असलेला ‘महाराष्ट्र-लोअर सॅक्सोनी संयुक्त कार्यगट’ स्थापन करावा, असे सांगतानाच, नवी मुंबईत उभारण्यात येणाऱ्या एज्युसिटीमध्ये लोअर सॅक्सोनीतील विद्यापीठे, संशोधन संस्था आणि उद्योगांनी सहभागी व्हावे. संयुक्त संशोधन कार्यक्रम, दुहेरी पदवी अभ्यासक्रम, उद्योगाभिमुख शिक्षण, विद्यार्थी देवाणघेवाण आणि महाराष्ट्रात शैक्षणिक संकुले स्थापन करण्यासाठी राज्य शासन आवश्यक सहकार्य करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

राज्याच्या आर्थिक विकासाला गती

मुंबईतील वित्तीय आणि तंत्रज्ञान परिसंस्था, पुण्यातील वाहन आणि अभियांत्रिकी उद्योग, नागपूरची दळणवळण आणि औद्योगिक क्षमता तसेच नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरमधील उत्पादन समूह राज्याच्या आर्थिक विकासाला गती देत आहेत. जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण आणि आगामी वाढवण बंदरामुळे जागतिक मूल्यसाखळी तसेच निर्यात केंद्र म्हणून महाराष्ट्राचे स्थान अधिक बळकट होईल. राज्य शासन पायाभूत सुविधा, प्रगत उत्पादन, कृत्रिम बुद्धिमत्ता, हरित ऊर्जा, शिक्षण आणि मनुष्यबळ विकासात मोठी गुंतवणूक करत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

वाहन उत्पादन आणि निर्यातीवर भर

प्रगत उत्पादन आणि भविष्यकालीन वाहन तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात फोक्सवॅगन हा महाराष्ट्र आणि लोअर सॅक्सोनीमधील महत्वाचा औद्योगिक दुवा आहे. राज्य शासनाने चाकण येथील उत्पादन सुविधांचे आधुनिकीकरण तसेच इलेक्ट्रिक आणि हायब्रीड वाहनांसाठी नव्या गुंतवणूक कार्यक्रमाला मंजुरी दिली आहे. महाराष्ट्राला वाहन उत्पादन, अभियांत्रिकी, उत्पादन विकास, चाचणी आणि निर्यातीचे जागतिक केंद्र बनविण्याचा राज्याचा मानस आहे. अचूक अभियांत्रिकी, औद्योगिक स्वयंचलन, रोबोटिक्स, सेमीकंडक्टर, बॅटरी, एरोस्पेस आणि औद्योगिक कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रांतही सहकार्याच्या व्यापक संधी असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

गुंतवणुकीला बळ देण्याचा जर्मनीचा मानस

लोअर सॅक्सोनीचे मंत्री-अध्यक्ष ओलाफ लाईस म्हणाले, वाहन उद्योग, संरक्षण व सुरक्षा तंत्रज्ञान, डिजिटलायझेशन, कृत्रिम बुद्धिमत्ता, बांधकाम आणि नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रांत दोन्ही राज्यांमध्ये मोठी क्षमता आहे. सध्याच्या गुंतवणुकीला बळ देतानाच उद्योग, संशोधक आणि नागरिकांमधील संबंध अधिक दृढ करण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भारत-युरोपीय संघ मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटींच्या यशस्वी निष्पत्तीमुळे बाजारपेठ प्रवेश, अतिरिक्त गुंतवणूक आणि औद्योगिक सहकार्यासाठी नव्या संधी उपलब्ध होतील, असे लाईस यांनी सांगितले.

Read About : ठिबक सिंचनातून 70 टक्क्यांपर्यंत पाणी बचतीचा दावा; रशियाची कृषी तंत्रे चर्चेत – Climate-Smart Agriculture Technology

E-paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.