दोष एआयचा नाही. दोष एआयचे उद्योग उभारणाऱ्यांचा आहे. ज्यांना ज्ञानाच्या कक्षा वाढवायच्या आहेत ते लोक एआयचा विकास करत नाहीयेत. केवळ पैसा हेच उद्दिष्ट असलेले धनिक एआय(AI) उद्योग उभारत आहेत. उदा. एलॉन मस्क. लहान मुलांना नादी लावून त्यांचं आयुष्य नासवण्याच्या आरोपाला आता मेटा इत्यादी कंपन्या तोंड देत आहेत. कला जाणिवांचा प्रसार करण्याऐवजी त्या बोथट करण्याकडं एआयच्या मनोरंजन शाखेचं लक्ष आहे. दुसरं म्हणजे एआय (AI) हा उद्योग फार म्हणजे फार गुंतवणूक खाणारा आहे.
या वातावरणाचा एक परिणाम असा की, या उद्योगातून लोक आता पैसे काढून घेऊ लागलेत.
एआयवर (डेटा मायनिंग, प्रोसेसिंग इत्यादी) अमेरिकन सरकार ट्रिलियन डॉलर्स रक्कम खर्च करायचं म्हणत होतं. एआयमध्ये गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांनी निवडणुकीत अब्जावधी डॉलर्स ओतले. माध्यमांचा, सरकारी संस्थांचा वापर करून एआय (AI) उद्योगानं एक एआय गारूड तयार केलं. एआय म्हणजे सारं काही अशा वेडानं अमेरिका पछाडली. सर्व समस्यांवर अक्सीर इलाज, एआय. खेळ स्पर्धेत भरपूर पदकं हवीत? एआय. उपचार चांगले व्हायला हवेत? एआय. तंगड्या दुखत आहेत? एआय (AI). केस गळत आहेत? एआय. बद्धकोष्ठ झालंय? एआय. कॉलेजेसना सांगण्यात आलं एआय शिकवा. भाषा, इतिहास, कला, साहित्य इत्यादी सारं बंद करा. पोरं आणि त्यांचे आईबापही येड लागल्यासारखं एआय… एआय… करू लागले.
एआयमुळं किती नोकऱ्या नव्यानं निर्माण होतील, एकूण रोजगार किती वाढेल याबद्दल खात्रीलायक माहिती अजून मिळालेली नाही. किती रोजगार जातील आणि किती नव्यानं होतील याचा अंदाज अजून आलेला नाही. दुसऱ्या बाजूला एआय (AI) उद्योगामुळं नुकसान किती होईल त्याचा अनुभव मात्र अमेरिकन जनता आत्ताच घेतेय. जिथं जिथं एआय प्रकल्पांची उभारणी सुरू झालीय तिथं निसर्गाचा नाश होतोय. एआय (AI) प्रकल्प खूप पाणी पितो. प्रकल्पाच्या आसपासच्या लोकांना पाण्याची टंचाई भासू लागलीय. एआय (AI) खूप वीज वापरतो. अमेरिकेत वीज महाग होतेय, विजेची टंचाई निर्माण झालीय. अमेरिकन माणूस म्हणतोय की, अगदी मूलभूत अशी पाण्याची समस्या आधी सोडवा, नंतर एआयची क्रांती करा.
अमेरिकेत सध्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवतेय. नद्यांची पात्रं कोरडी पडली आहेत. पाऊस लहरी झालाय. पाणी जमिनीत मुरत नाही, भूगर्भातली पाण्याची पातळी खालावत चाललीय. पाण्याचा उपसा जितका होतो तितकी पुन्हा भरपाई होत नाही. त्यात या खूप पाणी पिणाऱ्या प्रकल्पाची भर. पाणी ही अमेरिकेची खरी समस्या आहे. कोलोराडो नदीवरचं हूव्हर धरण जागतिक पर्यटनाचं केंद्र आहे.
पर्यटक तिथं पोचतात तर जलाशय रोडावलेला दिसतो. कोलोराडो खोऱ्यात आणि जलाशयात पाणीसाठा ४० टक्क्यांच्या खाली घसरलाय. कोलोराडो नदी सात राज्यांतल्या चार कोटी लोकांना पाणी पुरवते. कोलोराडो खोऱ्यातले लोक एआय (AI) प्रकल्पाला विरोध करत आहेत. कोलोराडोतल्या पाण्याचं रेशनिंग सरकारनं सुरू केलंय. एआयचा उपयोग आहे हे तर खरंच आहे. माहिती गोळा करण्याचा वेग, विश्लेषण करण्याचा वेग, नवं ज्ञान तयार करण्याचा वेग एआयनं प्रचंड वाढवला. ज्ञानाची सर्व क्षेत्रं अधिक समृद्ध झाली. माणसाचं दैनंदिन जीवनही प्रचंड सुकर आणि सुखी झालं. एआयचे दुष्परिणाम दिसू लागले. अगदी मोजक्या क्षेत्रांतल्या अगदी मोजक्या व्यक्तींची बौद्धिक क्षमता वाढली. नव्वद टक्के जनता मेंदूचा वापर करेनाशी झाली.
मापन, गणन, विश्लेषण, क्रिएटिव्हिटी या गोष्टी सामान्य माणसाच्या जीवनातून गायब होऊ लागल्या.
दोष एआयचा नाही. दोष एआयचे उद्योग उभारणाऱ्यांचा आहे. ज्यांना ज्ञानाच्या कक्षा वाढवायच्या आहेत ते लोक एआयचा विकास करत नाहीयेत. केवळ पैसा हेच उद्दिष्ट असलेले धनिक एआय (AI) उद्योग उभारत आहेत. उदा. एलॉन मस्क. लहान मुलांना नादी लावून त्यांचं आयुष्य नासवण्याच्या आरोपाला आता मेटा इत्यादी कंपन्या तोंड देत आहेत. कला जाणिवांचा प्रसार करण्याऐवजी त्या बोथट करण्याकडं एआयच्या मनोरंजन शाखेचं लक्ष आहे. दुसरं म्हणजे एआय हा उद्योग फार म्हणजे फार गुंतवणूक खाणारा आहे. दुनियेला निर्बुद्ध करणारा हा उद्योग जगातलं खूप भांडवल खातो आहे. एआयवाले आणि एआयच्या परिणामांचे बळी असे दोन वर्ग समाजात होऊ घातलेत. एआयवाले अति धनिक आणि पोटभरू निर्बुद्ध बळी अशा फळ्या समाजात पडत आहेत.
पुन्हा तेच. दोष एआयचा नाही. एआयमधला विकास ही समाजातली आधुनिक क्रांती आहे. एआयचा गैरवापर हा प्रॉब्लेम आहे.
साधनांचा वापर आणि वाटप महत्त्वाचा असतो. आज बेकारी, शिक्षण, आरोग्य, उपासमारी या समस्या जगाच्या साठेक टक्के नागरिकांना भेडसावत आहेत. त्या सोडवण्याला अग्रक्रम हवा की सेलफोन, कॉम्प्युटर, सिनेमा, टीव्ही, विमानप्रवास यांच्यावर अधिक पैसे गुंतवायला हवेत? एआयचा वापर अलीकडं शस्त्रांची मारक क्षमता वाढवण्याकडं होऊ लागलाय. माणसं जगवण्यापेक्षा मारण्याकडं एआयचं लक्ष अधिक आहे.
अमेरिकेत एआय (AI) नको असे फलक जागोजागी, व्हाइट हाउससमोर लागलेत ही गोष्ट आश्चर्याची आहे. अमेरिकन समाजाचे निर्णय एके काळी जनता घेत असे. अमेरिका स्थापन झाली तेव्हा टाउन हॉल हा अमेरिकन समाजजीवनाचा आत्मा होता. दुसऱ्या महायुद्धाच्या आसपास अमेरिकेचा ताबा बाजारानं आणि धनिकांनी घेतला. एलॉन मस्क याच्यासारखा मानसिक आणि बौद्धिक तोल गेलेला माणूस अमेरिकेची धोरणं ठरवतो, अमेरिकन सरकारचा भाग होतो, ही घटना अमेरिकेतल्या वातावरणाची निदर्शक आहे. अशा परिस्थितीत धनिकांनी प्रचंड पैसा बाजारात लोटला असताना, माध्यमांनी लोकांना वेडं केलं असताना, लोकांनी आपल्या पातळीवर एकत्र येऊन एआयला विरोध केला, ही फार मोठी गोष्ट आहे. हे सारं लिहीत असताना भारतात विशाखापट्टणम, हैदराबाद, बंगळुरू, नवी मुंबई या ठिकाणी धडाधड डेटा सेंटर तयार होत आहेत, सरकार त्यांना प्रोत्साहन देत आहे. स्थानिक लोक अस्वस्थ आहेत; पण काही करू शकत नाहीत अशी स्थिती आहे.
निळू दामले
damlenilkanth@gmail.com
