Lust Stories 3 : ट्रेलर रिलीजराधिका आपटे, विजय वर्मा, अदिती राव हैदरी मुख्य भूमिकेत
मुंबई : नेमके काय शोधत आहेत लोक? या प्रश्नाचे उत्तर घेऊन नेटफ्लिक्स आपल्या बहुचर्चित ‘लस्ट स्टोरीज’ या अँथॉलॉजी मालिकेचा तिसरा भाग घेऊन येत आहे. (Lust Stories 3 trailer) ‘लस्ट स्टोरीज ३’चा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, यामध्ये प्रेमाचे, नात्यांचे आणि वासनेचे चार वेगळे पदर उलगडण्यात आले आहेत. या तिसऱ्या पर्वाचे दिग्दर्शन विक्रमादित्य मोटवाने, किरण राव, शकुन बत्रा आणि विशाल भारद्वाज या चार दिग्गज दिग्दर्शकांनी केले आहे. भावनांमधील गुंतागुंत, अंतर्गत संघर्ष आणि मानवी संबंधांमधील अनपेक्षित वळणे या चार कथांच्या माध्यमातून मांडण्यात आली आहेत.
या अँथॉलॉजीत राधिका आपटे, कोंकणा सेन शर्मा, अदिती राव हैदरी, विजय वर्मा, अभिषेक बॅनर्जी, सिद्धार्थ, अली फझल, राधिका मदान, सना थंपी आणि गुरफतेह पिरजादा यांसारखे तगडे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.
विक्रमादित्य मोटवान यांच्या म्हणण्यानुसार, ‘दैनंदिन आयुष्यातील आरामदायीपणा आणि अनपेक्षित गोष्टींची इच्छा जेव्हा समोरासमोर येते तेव्हा काय घडते हे विनोदी व भावनिक पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे.’
किरण राव म्हणाल्या की, ‘आकर्षणाची पहिली ठिणगी कशी गुंतागुंतीची बनते आणि माणसाचे निर्णय त्याच्या आयुष्यावर कसा परिणाम करतात, हे दाखवण्याची उत्सुकता होती.’ ‘लस्ट स्टोरीज ३’ हे येत्या १८ सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

You need an account to post comments.