स्वायत्त AI एजंट्स आणि ओपन-सोर्स टूल्सच्या गैरवापरातून गोपनीय डेटा चोरीचा धोका; ‘सीईआरटी-इन’कडून अत्यंत गंभीर इशारा जारी!
नवी दिल्ली : AI Cyber Attack India भारतातील सर्वोच्च सायबर सुरक्षा एजन्सी ‘इंडियन इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम’ने (सीईआरटी-इन) देशातील सरकारी आणि खासगी संस्थांसाठी एक अत्यंत गंभीर इशारा (रेड अलर्ट) जारी केला आहे. स्वायत्त कृत्रिम बुद्धिमत्ता (ॲटॉनॉमस एआय एजंटस्) आणि ओपन-सोर्स एआय टूल्सचा गैरवापर करून सायबर गुन्हेगारांनी भारतीय संस्थांच्या मुख्य यंत्रणेमध्ये बेकायदेशीरपणे प्रवेश मिळवला असून गोपनीय डेटा चोरल्याचे उघडकीस आले आहे.
‘सीईआरटी-इन’ने ‘एआय एजंटस् ॲज अटॅक व्हेक्टर्स’ (सीआयएडी-२०२६-००४९) या शीर्षकाखाली हा गंभीर इशारा जारी केला आहे. एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, दोन वेगवेगळ्या मार्गांनी भारतीय संस्थांच्या डिजिटल पायाभूत सुविधांवर (आयसीटी इन्फ्रास्ट्रक्चर) हल्ले करण्यात आले आहेत.
संशोधन एआय मॉडेलकडून अनधिकृत प्रवेश
एआय मॉडेल तयार करणाऱ्या कंपन्यांनी स्वत:हून याबाबत माहिती दिली की, त्यांच्या संशोधन आणि मूल्यांकनाखाली असलेल्या स्वायत्त एआय मॉडेल्सनी दिलेल्या कामाच्या मर्यादा ओलांडल्या. सार्वजनिक कोड रेपॉजिटरी आणि क्लाउड सर्व्हिसमध्ये उघडे राहिलेले पासवर्ड्स आणि कॉन्फिगरेशनचा वापर करून या एआय एजंट्सनी भारतीय संस्थांच्या लाईव्ह यंत्रणेमध्ये प्रवेश केला आणि व्यावसायिक व वैयक्तिक डेटा वाचला. धक्कादायक बाब म्हणजे कोणत्याही बाधित भारतीय संस्थेला त्यांच्या यंत्रणेमध्ये एआय एजंट्स घुसल्याचे स्वत:हून समजले नाही. एआय मॉडेल बनवणाऱ्या कंपन्यांनी अंतर्गत तपासणीनंतर माहिती दिल्यावरच ही बाब समोर आली.
हॅकर्सकडून एआय टूल्सचा शस्त्र म्हणून वापर
‘सीईआरटी-इन’ने केलेल्या तपासात असे दिसून आले की, सायबर गुन्हेगार आर्थिक फायद्यासाठी ‘एआय-नेटिव्ह ऑफेंसिव्ह-सिक्युरिटी’ टूल्सचा वापर करत आहेत. या एआय टूल्समुळे पूर्वी एका हल्ल्यासाठी लागणारा दिवसांचा वेळ आता अवघ्या काही तासांवर आला आहे. ज्या संस्थांनी सुरक्षेतील त्रुटी अंशत: दुरुस्त केल्या होत्या, त्यांच्यावर काही दिवसांतच पुन्हा मोठा हल्ला करण्यात आला.
सायबर हल्ला होऊ शकला, कारण…
‘सीईआरटी-इन’नुसार, एआय एजंट्सनी मानवी हॅकर्सपेक्षा कितीतरी पटीने जलद आणि वेगाने खालील सुरक्षा त्रुटींचा शोध घेऊन गैरफायदा घेतला :
- सोर्स कोड आणि सार्वजनिक फायलींमध्ये उघडे राहिलेले आयडी व पासवर्डस.
- चाचणीसाठी बनवलेले आणि बंद करायचे राहिलेले खुले एपीआय.
- क्लाउड सेवा आणि बॅकएंड यंत्रणेमध्ये दिलेले आवश्यकतेपेक्षा जास्त अधिकार.
- टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन नसलेले किंवा कमकुवत पासवर्ड असलेले ॲडमिन पॅनेल्स.
‘सीईआरटी-इन’ आणि तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला
हल्ल्यांचा धोका टाळण्यासाठी ‘सीईआरटी-इन’ आणि जागतिक सायबर सुरक्षा कंपनी ‘कास्पर्सकी’चे व्यवस्थापक जयदीप सिंग यांनी संस्थांना तातडीने खालील पावले उचलण्याचे आवाहन केले आहे:
- पासवर्ड व कोडिंग ऑडिट: आपल्या यंत्रणेच्या कोड, फायली आणि क्लाउड स्टोरेज तपासून उघडे पडलेले सर्व पासवर्डस् तातडीने बदलावेत.
- डेटा आणि यंत्रणेचे विलगीकरण : एआयचे संशोधन किंवा चाचणी करताना प्रत्यक्ष डेटा वापरण्याऐवजी कृत्रिम डेटाचा वापर करावा.
- मानवी मंजुरी : कोणत्याही एआय एजंटला पूर्ण स्वातंत्र्य न देता, कोणतीही मोठी किंवा महत्त्वाची कृती करण्यापूर्वी मानवी मंजुरी अनिवार्य करावी.
- सुरक्षा पॅचिंग : यंत्रणेमधील त्रुटी किंवा सुरक्षेतील भगदाडे आठवडे लावण्याऐवजी काही तासांत दुरुस्त करावीत.
हल्ला झाल्यास सावधगिरी
एकदा डेटा लीक झाल्यास किंवा हल्ला झाल्यास ती यंत्रणा पूर्णपणे सुरक्षित घोषित होईपर्यंत त्यावर बारीक लक्ष ठेवावे, कारण काही दिवसांतच पुन्हा हल्ला होण्याची दाट शक्यता असते.
Read About : Voter List Revision 2027- 17 राज्यात मतदारयाद्यांची विशेष पुनरीक्षण मोहीम
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.