तैवान, दक्षिण कोरियाला फायदा, तर अनेक देशांवर आर्थिक ताण
वॉशिंग्टन : AI Economy आयएमएफच्या ऑक्टोबर २०२६ च्या अहवालाचा इशारा; सेमीकंडक्टर आणि डेटा सेंटर क्षेत्रातील गुंतवणुकीमुळे काही देशांची भरभराट, तर ऊर्जा आयातदार देशांसमोर आव्हाने
आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रातील वाढती गुंतवणूक आणि मध्य पूर्वेतील युद्धामुळे जगाची अर्थव्यवस्था दोन भागात विभागली जात असल्याचा इशारा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने दिला आहे. चिप निर्मिती आणि एआय सप्लाय चेनशी जोडलेल्या देशांना याचा प्रचंड फायदा होत आहे, तर दुसरीकडे ऊर्जा आयातीवर अवलंबून असलेल्या आणि तंत्रज्ञान क्षेत्रापासून दूर असलेल्या देशांवर आर्थिक ताण वाढला आहे. आयएमएफच्या ऑक्टोबर २०२६ मधील वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक अहवालानुसार, सध्या जगात विभाजित जागतिक अर्थव्यवस्था निर्माण झाली आहे.
या देशांना झाला सर्वाधिक फायदा (२०२६ चे अंदाज)
- तैवान : एआय क्रांतीचा सर्वाधिक फायदा तैवानला झाला आहे. तैवानचा आर्थिक विकास दर २०२५ मधील ८.८ टक्क्यांवरून २०२६ मध्ये १०.७ टक्क्यांवर पोहोचण्याचा अंदाज आहे.
- दक्षिण कोरिया : सेमीकंडक्टरच्या जागतिक मागणीमुळे दक्षिण कोरियाचा विकास दर २०२६ मध्ये ३.३ टक्के राहण्याचा अंदाज आहे (२०२५ मध्ये हा दर १.१ टक्के होता).
- आग्नेय आशिया : डेटा सेंटर्स आणि तंत्रज्ञानामुळे व्हिएतनामचा विकास दर ८.४ टक्के आणि मलेशियाचा ५.२ टक्के राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
ठराविक देशांचाच वरचष्मा
आयएमएफने स्पष्ट केले की, एआयचा फायदा मोजक्याच देशांपुरता मर्यादित आहे. जगभरातील प्रगत सेमीकंडक्टर व्यापारापैकी ६२ टक्के हिस्सा एकट्या तैवान आणि कोरियाचा आहे. दुसरीकडे, एआयशी संबंधित संगणकीय हार्डवेअरच्या एकूण आयातीमध्ये अमेरिका आणि चीनचा वाटा ७५ टक्के पेक्षा जास्त आहे, तसेच २०२४ नंतर उभारण्यात आलेल्या नव्या डेटा सेंटर्समध्ये या दोन देशांची भागीदारी ५७ टक्के आहे.
मागास देश अधिक अडचणीत
जे देश ऊर्जा आयातीवर अवलंबून आहेत आणि तंत्रज्ञान क्षेत्राशी जोडलेले नाहीत, त्यांना महागडी आयात, चलनाचे अवमूल्यन आणि उत्पन्नातील घसरणीचा सामना करावा लागेल. यामुळे जागतिक स्तरावर असमानता वाढेल.
शेअर बाजाराला धोका
एआय कंपन्यांच्या वाढत्या मूल्यांकनाबाबत गुंतवणूकदार प्रमाणाबाहेर आशावादी आहेत. जर ही अपेक्षा पूर्ण झाली नाही, तर एआय क्षेत्रातील गुंतवणूक अचानक मंदावू शकते आणि अमेरिका-कोरियासारख्या टेक शेअर्सच्या बाजारात मोठी घसरण होऊ शकते.
Read About : UPI MDR Fee Debate : यूपीआयवर लगान कशासाठी
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.