Ad Advertisement Ad Advertisement

Sion Railway Bridge Reopening – मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी!

सायनचा नव्याने बांधलेला रेल्वे पूल लवकरच होणार खुला; वाहतूक कोंडी सुटणार

मुंबई : Sion Railway Bridge Reopening मुंबईच्या मध्य रेल्वेवरील सायन रेल्वे स्थानकाजवळ असलेला, ब्रिटिशकालीन ११२ वर्षे जुना पूल पाडून नव्याने बांधण्यात आलेला उड्डाणपूल लवकरच वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. यामुळे सायन, कुर्ला आणि धारावी परिसरातील नागरिकांची वाहतूक कोंडीतून मोठी सुटका होणार आहे, असे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

२०१९ मध्ये ‘आयआयटी बॉम्बे’कडून करण्यात आलेल्या स्ट्रक्चल ऑडिटमध्ये हा जुना पूल असुरक्षित घोषित करण्यात आला होता. त्यानंतर मुंबई अर्बन ट्रान्स्पोर्ट प्रोजेक्टअंतर्गत दोन अतिरिक्त रेल्वे मार्गांसाठी हा पूल पाडून नव्याने बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. गेल्या दोन वर्षांपासून हा पूल बंद होता.

पालिकेच्या म्हणण्यानुसार, नव्या पुलाचा एकेरी स्पॅन ५४.५ मीटर लांब आणि २९ मीटर रुंद आहे. रेल्वेरुळांवर खांब नसलेली रचना तयार करण्यात आल्यामुळे उरटळ आणि कुर्लादरम्यान प्रस्तावित असलेल्या ५ व्या आणि ६ व्या रेल्वे मार्गांसाठी पुरेशी जागा उपलब्ध झाली आहे.

वाहतूक कोंडीपासून मोठा दिलासा

पूल बंद असल्यामुळे गेल्या दोन वर्षांत वाहनचालकांना धारावी पूल, बीकेसी-चुनाभट्टी लिंक रोड किंवा सांताक्रुझ-चेम्बूर लिंक रोडवरून मोठे वळसे घ्यावे लागत होते, ज्यामुळे या भागात प्रचंड वाहतूक कोंडी होत होती. हा पूल सुरू झाल्यानंतर सायन, कुर्ला आणि विशेषत: धारावी परिसरातील पूर्व-पश्चिम कनेक्टिव्हिटी सुरळीत होईल आणि नागरिकांचा प्रवास सुकर होईल.

काम कोणी केले आणि कधी होणार खुला?

रेल्वे रुळांवरील मुख्य पूल किंवा गर्डरचे काम मध्य रेल्वेने केले आहे, तर पालिकेच्या पूल विभागाने संपर्क रस्ते बनवून मजबूत केले आहेत. या संपूर्ण प्रकल्पाचा खर्च रेल्वे प्राधिकरणाद्वारे केला जात आहे. निविदेनुसार या कामाची मुदत फेब्रुवारी २०२७ पर्यंत होती, तरी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बंगर यांनी कामाला प्राधान्य देत लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, ऑक्टोबरच्या उत्तरार्धात हा पूल वाहतुकीसाठी खुला होण्याची दाट शक्यता आहे.

Read About : UPI MDR Fee Debate : यूपीआयवर लगान कशासाठी
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.