खा.डॉ. काळेंनी केल्या मनपा आयुक्तांना सूचना : मतदारसंघातील विकासकामांवरही झाली चर्चा
छत्रपती संभाजीनगर : मुकुंदवाडी – बाळापूर अंडरपासच्या कामात ‘शिवाजीनगर’प्रमाणे चुका नको : मुकूंदवाडी-बाळापूरकडे जाणाऱ्या रोडवर गेट क्र.५६ येथे रेल्वे विभागाच्या वतीने अंडरपास (भुयारी मार्ग) करण्यात येत आहे, या कामासाठी महापालिकेची एनओसी रेल्वे विभागाला हवी आहे, या मार्गासाठी रेल्वेला एनओसी द्यावी, अशी सूचना मनपा आयुक्तांकडे केली आहे. या कामात शिवाजीनगर अंडरपासप्रमाणे चुका होवू नयेत, पावसाळ्यात पाणी साचू नये, किमान १५ फुट उंचीची बस सहज या मार्गातून जावी, असा हा मार्ग व्हावा., अशी अपेक्षाही खासदार डॉ. कल्याण काळे यांनी शुक्रवारी (दि.२७) पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. तत्पूर्वी त्यांनी मनपा आयुक्तांसोबत विविध विषयावर बैठकीत चर्चा केली.
खा. डॉ. काळे यांच्या उपस्थितीत महापालिकेत शुक्रवारी झालेल्या बैठकीला आयुक्त अमोल येडगे यांच्यासह महापालिकेचे सर्व विभागप्रमुख, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, माजी गटनेते भाऊसाहेब जगताप आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर त्यांनी महापौर समीर राजूरकर यांच्याशीही चर्चा केली. पत्रकारांशी बोलताना खा. काळे म्हणाले की, मुकूंदवाडी ते बाळापूरकडे जाण्यासाठी रेल्वे लाइनमुळे या भागातील नागरिकांना ये-जा करण्यासाठी रेल्वे गेट ओलांडावा लागतो.
चोवीस तासात जेवढ्या वेळेस रेल्वे ये-जा करतात, तेवढ्या वेळेस गेट क्र.५६ बंद केल्या जातो. त्यामुळे नागरिकांना ताटकळत बसावे लागते. मुकूंदवाडीतील झेंडा चौक ते बाळापूरकडे जाणारा रस्ताही आता वाहतूक कोंडीमुळे त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे हा अंडरपास झाल्यास नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे. नागरिकांची होणारी ही अडचण लक्षात घेऊन रेल्वे विभागाशी सातत्याने पाठपुरावा करून बाळापूर येथे अंडरपास मंजूर करून आणला आहे. रेल्वे विभागाने सर्वेक्षणही सुरू केले आहे. अंडरपासच्या कामासाठी रेल्वे विभागाला महापालिकेची एनओसी हवी असून, ती देण्यात यावी, अशी मागणी आयुक्तांना केली आहे.
सोमवारी अधिकारी करणार संयुक्त पाहणी
या बैठकीत आयुक्तांनी मनपा अधिकाऱ्यांना रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत जावून सोमवारी संयुक्त पाहणी करण्याचे निर्देश दिले. या पाहणीनंतर एनओसी देण्यात येईल, असे आयुक्तांनी सांगितल्याचे खा. काळे म्हणाले.
असून अडचण…नसून खोळंबा…
बीड बायपास, सातारा-देवळाई परिसरातील वसाहतींना शहराशी जोडण्यासाठी शिवाजीनगर येथे अंडरपास करण्यात आलेला अंडरपास नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. पावसाळ्यात अंडरपासमध्ये पाणी साचणे, चिखलामुळे वाहने घसरून पडणे, अंधार असणे, अशा अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. उंची कमी असल्याने, या अंडरपासमधून बस, अग्निशमन बंब, मोठी रुग्णवाहिका आदींसारखी वाहने जात नाहीत. शिवाजीनगर अंडरपास पूर्ण झाल्यानंतरही ‘असून अडचण नसून खोळंबा’ असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. बाळापूर गेट क्र.५६ येथे होणारा अंडरपास करताना या चुका टाळल्या जाव्यात., अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Read About : Municipal Audit Chief Finance Officer – मनपा प्रशासनावर स्थायी सभापतींचा आदेश ‘बॉम्ब’
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.