Ad Advertisement Ad Advertisement

सात हजार टन डिझेल असलेले तेलवाहू जहाज समुद्रात उलटले

बचाव कार्य सुरू : एका खलाशाचा मृत्यू, आठ भारतीय सुखरूप

माद्रिद : स्पेनमधील इबिझा बेटाजवळ डिझेल घेऊन जाणारे एक तेलवाहू जहाज उलटले आहे. मेड एमरे नावाच्या या जहाजावर माल्टाचा ध्वज असून, ते सात हजार टन डिझेल घेऊन जात होते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. समुद्राच्या पृष्ठभागावर इंधनाचे अत्यंत किरकोळ अंश दिसून आले असले तरी, अद्याप कोणत्याही मोठ्या तेलगळतीचे वृत्त नाही. हे जहाज २०१९ मध्ये बनवलेले असून त्याला डबल हल (दुहेरी आवरण) असल्याने तूर्त मोठी गळती टळली आहे. तथापि, गळती झाल्यास ते एक मोठे पर्यावरणीय संकट असेल. कारण, हा किनारा जागतिक वारसा स्थळाच्या यादीत असून, तेथे दुर्मिळ समुद्री गवताची कुरणे आहेत.

जहाजावर आठ भारतीयांसह १७ खलाशी होते. त्यांची सुटका करण्यात आली आहे. त्यापैकी सात जणांना रुग्णालयात नेण्यात आले. नंतर त्यातील एकाला डाॅक्टरांनी मृत घोषित केले, असे बालेआरिक बेटांच्या आपत्कालीन सेवेने सांगितले. उपचार घेत असलेल्या सहा जणांना हायपोथर्मिया (थंडीमुळे शरीराचे तापमान कमी होणे) झाल्याचे स्पॅनिश माध्यमांनी म्हटले आहे. दरम्यान, भारताचे जहाजबांधणी मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी सर्व भारतीय खलाशी सुखरूप असल्याचे सांगितले.

कुठे उलटले ?

जहाज इबिझाच्या किनाऱ्यापासून २५ सागरी मैलांवर (सुमारे ४६ किमी) आणि व्हॅलेन्सियापासून ५७ सागरी मैलांवर उलटले. ते दक्षिण स्पेनमधील अल्जेसिरासहून उत्तर-पूर्वेकडील बार्सिलोनाकडे जात होते. हे जहाज कशामुळे उलटले, हे अजून स्पष्ट नाही. स्पॅनिश माध्यमांनुसार, बुधवारी स्थानिक वेळेनुसार रात्री सुमारे १०.३० वाजता व्हॅलेन्सियातील बचाव पथकाला मदतीचा संदेश मिळाला. जहाजावरील कर्मचाऱ्यांनी जहाज ९० अंशांच्या कोनात कलले असल्याचे सांगितले.

बचाव कार्यासाठी अनुकूल स्थिती

प्रादेशिक आपत्कालीन संचालक पाब्लो गारिझ यांनी सांगितले की, जहाज पूर्णपणे बुडालेले नाही, जसे आधी वृत्त होते. ते अंशत: पाण्यात आहे. त्यामुळे बचाव कामासाठी परिस्थिती अनुकूल झाली आहे, कारण जहाज १,००० मीटर खोलीवर असण्याच्या शक्यतेवरून आता पृष्ठभागावर काम करता येईल अशा स्थितीत आपण आलो आहोत, असे ते म्हणाले.

जागतिक वारसास्थळांच्या यादीत समावेश असलेला परिसर

इबिझाच्या सागरी परिसराचा १९९९ मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाला. येथे ‘पोसिडोनिया ओशनिका’ या समुद्री गवताची कुरणे आहेत; हे गवत फक्त भूमध्य समुद्रात आढळते आणि सागरी जैवविविधता टिकवण्यात त्याची भूमिका आहे. याशिवाय हा सागरी परिसर कासव, डॉल्फिन आणि दुर्मीळ सागरी पक्ष्यांचे आश्रयस्थान असल्याने स्पेनच्या सागरी प्रशासनाने दुसऱ्या सर्वोच्च स्तराची राष्ट्रीय सागरी प्रदूषण नियंत्रण योजना लागू केली आहे. संभाव्य तेलगळती रोखण्यासाठी ‘क्लारा कॅम्पोमोर’ हे विशेष प्रदूषण नियंत्रण जहाज आणि टेहळणी विमाने घटनास्थळी तैनात ठेवण्यात आली आहेत. २००२ मध्ये स्पेनला ‘प्रेस्टीज’ तेलवाहू जहाजामुळे सर्वांत मोठ्या पर्यावरणीय आपत्तींपैकी एकीचा सामना करावा लागला होता; तेव्हा गॅलिसियाच्या किनाऱ्याजवळ ६०,००० टनांहून अधिक इंधनाची समुद्रात गळती झाली होती.

Read About : India Road Accidents : देशभरात भीषण अपघात; 50 जणांचा मृत्यू, धुळ्यातील पवार कुटुंबावर काळाचा घाला!
E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.