ऑक्टोबर २०२६ ते जून २०२७ चे नियोजन : ग्रामीण भागातील १,२६५ गावे आणि १,१४४ वाड्यांचा समावेश
बीड Beed Water Scarcity Action Plan 2026-27 : आगामी उन्हाळ्यात निर्माण होणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आतापासूनच नियोजन सुरू केले आहे. ऑक्टोबर २०२६ ते जून २०२७ या कालावधीसाठी जिल्ह्याचा संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला असून, यामध्ये ग्रामीण आणि नागरी भागातील पाणीपुरवठ्यासाठी विविध उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. यामध्ये १ हजार २६४ गावे आणि ११४४ वाड्यांसाठी १२४ कोटी ८९ लाख ६६ हजारांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या (पाणीटंचाई विभाग) वतीने तयार करण्यात आलेला हा आराखडा विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे सादर करण्यात आला आहे.ग्रामीण भागासाठी ऑक्टोबर २०२६ ते डिसेंबर २०२६ या तीन महिन्यांच्या कालावधीत विविध पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. यामध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा, विहिरींचे अधिग्रहण, तात्पुरती पूरक नळ योजना, नळ योजनांची विशेष दुरुस्ती, विहिरींचे खोलीकरण, नवीन विंधन विहिरी घेणे, हातपंपांची दुरुस्ती आदी कामांचा समावेश आहे.या ग्रामीण कृती आराखड्यानुसार १ हजार २६५ गावांसह १ हजार १४४ वाड्या-वस्त्यांसाठी एकूण ६ हजार ४२४ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. त्यासाठी तब्बल १२४ कोटी ८९ लाख ६६ हजार रुपयांची अंदाजित तरतूद दर्शविण्यात आली आहे.
दुसरीकडे, नागरी भागातील पाणीटंचाईचा विचार करून ऑक्टोबर २०२६ ते जून २०२४ या कालावधीसाठी स्वतंत्र नियोजन करण्यात आले आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर २०२६ या कालावधीत ८४ उपाययोजना, जानेवारी ते मार्च २०२७ या कालावधीत ८४३ उपाययोजना, तर एप्रिल ते जून २०२७ या कालावधीत ४७४ उपाययोजना प्रस्तावित आहेत.या तीन टप्प्यांसाठी अनुक्रमे ५ कोटी ९३ लाख, १४ कोटी ९१ लाख ९० हजार आणि ८ कोटी ६१ लाख रुपयांचा अंदाजित खर्च दर्शविण्यात आला आहे.
पाणीटंचाईच्या काळात नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा, विहिरींचे अधिग्रहण आणि पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती यांसारख्या उपाययोजनांवर प्रशासनाचा भर राहणार आहे.आगामी उन्हाळ्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू नये आणि ग्रामीण तसेच नागरी भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने संभाव्य कृती आराखड्याच्या माध्यमातून पूर्वतयारी सुरू केली आहे.
बीड जिल्ह्यासाठी १५४ कोटींचा पाणीटंचाई कृती आराखडा!
एकूण नियोजित खर्च : १५४ कोटी ३५ लाख ५६ हजार रुपये
ग्रामीण भागासाठी : १२४ कोटी ८९ लाख ६६ हजार रुपये
नागरी भागासाठी : २९ कोटी ४५ लाख ९० हजार रुपये
एकूण योजना : ७ हजार ८२५
लाभार्थी गावे : १ हजार २८०
वाड्या-वस्त्या : १ हजार १४४
लातूरच्या टंचाई निवारणासाठी १६५ कोटींचा प्रस्ताव सादर
लातूर : महानगरपालिकेच्या स्थायी समितीची सभा तब्बल पाच महिन्यांनतर बुधवारी (दि.२५) सकाळी अकरा वाजता सभापती सचिन बंडापल्ले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. तब्बल साडेचार तास चाललेल्या या सभेत शहरातील विविध विषयांवर सांगोपांग चर्चा झाली. महापालिका आयुक्तांना धारेवर धरण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांसह विरोधी नगरसेवकांनी केला.
शहराला भेडसावणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आहे तेथून पाणी आणण्यासाठी एकूण १६५ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करून राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे. येणाऱ्या काळात उद्भवणाऱ्या भीषण पाणीटंचाईची भीती प्रत्येक सदस्याने उपस्थित करून पाण्यावर काम करण्याची मागणी महापालिकेला केली. या सभेला भाजपचे दोन नगरसेवक गैरहजर होते. बुधवारी, सकाळी अकरा वाजता सुरू झालेली बैठक तब्बल पाच महिन्यानंतर होत असल्याने अनेक नगरसेवकांनी नाराजी व्यक्त करीत आयुक्तांवर खापर फोडण्याचा प्रयत्न केला. या बैठकीत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले.
त्याचप्रमाणे इतर पाच विषयांवरही चर्चा करण्यात आली. सांगोपांग चर्चा करण्यात आली. प्रत्येक नगरसेवकाने स्वत:च्या प्रभागातील पाणीटंचाई निवारणासाठी गळती, नवीन जलवाहिनी, व्हॉल्व्ह बसविण्याची मागणी केली. त्याचप्रमाणे अनेक भागांतील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत, ते खड्डे बुजविण्याचीही मागणी केली. आगामी टंचाईच्या पार्श्वभूमीवर शहरातील मिनी वॉटर सप्लायला सक्षम करण्यासाठी शासनाकडे निधीसाठी प्रयत्न करण्याची मागणी केली.
Read About : Drought in Maharashtra 2026 – आणखी 13 तालुक्यांत दुष्काळ जाहीर होणार?
E-paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.