केवळ विचारांच्या माध्यमातून डिजिटल अवताराला बोलणे आणि हातवारे करण्याचे प्रशिक्षण देण्यात यश
वॉशिंग्टन : Brain-Computer Interface Technology पक्षाघात झालेल्या रुग्णांसाठी शास्त्रज्ञांनी असे ब्रेन-कॉम्प्युटर इंटरफेस तंत्रज्ञान विकसित केले आहे, जे मेंदूतील एकाच इम्प्लांटद्वारे रुग्णाचे बोलणे आणि शारीरिक हावभाव एकाच वेळी डिकोड करू शकते. याद्वारे रुग्ण केवळ आपल्या विचारांच्या जोरावर कॉम्प्युटर स्क्रीनवरील एका डिजिटल अवताराला बोलतं करू शकतो आणि त्याच्याकडून हाताच्या हालचालीही करून घेऊ शकतो.
युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, सॅन फ्रान्सिस्को च्या डॉ. एडवर्ड चांग यांच्या नेतृत्वाखालील टीमने हे संशोधन केले आहे. यापूर्वीची बीसीआय उपकरणे एकतर फक्त बोलणे किंवा फक्त हातापायांची हालचाल यापैकी एकच गोष्ट डिकोड करू शकत होती.
असे झाले संशोधन
शास्त्रज्ञांनी गंभीर पक्षाघात असलेल्या दोन रुग्णांच्या मेंदूतील सेन्सरिमोटर कॉर्टेक्स मेंदूचा तो भाग जो बोलणे आणि हालचाली नियंत्रित करतो) या भागावर २५३ अतिसूक्ष्म इलेक्ट्रोड्सची एक ग्रीड बसवली.
पहिला रुग्ण (स्ट्रोक): ब्रेनस्टेम स्ट्रोकमुळे या रुग्णाची बोलण्याची आणि हालचाल करण्याची क्षमता गेली होती. त्याने मनातल्या मनात हॅलो सारखे शब्द उच्चारण्याचा आणि सोबतच हात हलवणे, होकारार्थी मान डोलावणे किंवा टाळ्या वाजवण्याचा प्रयत्न केला.
दूसरा रुग्ण : हा रुग्ण एएलएस या गंभीर मज्जासंस्थेच्या आजाराने ग्रस्त होता. त्याने मनातल्या मनात १० वाक्ये आणि खांदे उडवणे किंवा थम्स-अप करणे यांसारख्या १० हावभावांची कल्पना केली.
कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अचूकता
जेव्हा आपण बोलताना हाताचे हावभाव करतो, तेव्हा मेंदूमध्ये एक विशिष्ट आणि गुंतागुंतीचा पॅटर्न तयार होतो. शास्त्रज्ञांनी या पॅटर्नचा अभ्यास करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स मॉडेल्सना प्रशिक्षित केले. हे एआय मॉडेल मेंदूतील लहरींचे रूपांतर तात्काळ स्क्रीनवर टेक्स्ट (लिहिलेले शब्द) आणि डिजिटल अवताराच्या हालचालींमध्ये करते. संभाषणाच्या चाचण्यांदरम्यान, या यंत्रणेने ७५ ते १०० टक्के अचूकतेसह काम केले. विशेष म्हणजे, जेव्हा एआयला बोलणे आणि हावभाव दोन्ही एकत्र डिकोड करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले, तेव्हा त्याची चुका करण्याची शक्यता खूप कमी झाली.
भविष्यातील ध्येय
हे संशोधन सध्या प्रूफ ऑफ कन्सेप्ट (प्रायोगिक तत्त्वावर) असून ते मर्यादित शब्दांवर तपासले गेले आहे. संशोधक समंथा ब्रॉस्लर यांच्या मते, भविष्यात याचे अधिक प्रगत आणि वायरलेस व्हर्जन तयार केले जाईल. यामुळे पक्षाघात झालेले रुग्ण भविष्यात कोणत्याही प्रयोगशाळेच्या मदतीशिवाय, केवळ आपल्या विचारांनी व्हीलचेअर, रोबोटिक हात किंवा इतर आधुनिक उपकरणे सहज नियंत्रित करू शकतील.
Read About : Ghati Hospital Bronchoscopy Almond Removed Child – दिवाळी पहाट ठरली चिमुकल्यासाठी जीवनदानाची!
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.