सीसीटीव्हीमध्ये थरारक हल्ला कैद, बैलाच्या भीतीने अनेकांची पळापळ
रायपूर : Bull Attack छत्तीसगडची राजधानी रायपूर येथील डीडी नगर भागात एका मोकाट बैलाने प्रचंड धुमाकूळ घातला. या आक्रमक बैलाने घराबाहेर उभ्या असलेल्या पिता-पुत्रावर अचानक हल्ला चढवला. हा हल्ला इतका अनपेक्षित होता की त्या दोघांना सावरण्याची संधीच मिळाली नाही.या हल्ल्यात पिता-पुत्र दोघेही जखमी झाले. या घटनेमुळे परिसरात जीव वाचवण्यासाठी नागरिकांची पळापळ झाली.
मागील काही दिवसांपासून या बैलाने संपूर्ण परिसरात दहशत निर्माण केली होती. त्याने वेगवेगळ्या ठिकाणी एकूण ७ ते १५ जणांवर हल्ले करून त्यांना जखमी केले. यामध्ये एका लहान मुलाला कडेवर घेतलेल्या वृद्धाचा आणि एका स्थानिक राजकीय नेत्याचाही समावेश आहे.
या थरारक घटनेचे दृश्य परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर महानगरपालिकेच्या ढिसाळ व्यवस्थापनावर स्थानिक जनतेतून तीव्र टीका होत असून, मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे.
दरम्यान, निवासी भागात हा प्राणी दहशत माजवत असल्याची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि वनविभागाच्या पथकाने संयुक्त मोहीम राबवली. अत्यंत आक्रमक झालेल्या या बैलाला पकडण्यासाठी पथकाने डार्टचा (भूल देणारे इंजेक्शन) वापर केला. बैल बेशुद्ध झाल्यानंतर त्याला पकडून निवासी भागातून सुरक्षित ठिकाणी दूर नेण्यात आले.
Read About : Triple Murder 2026 : देहरादूनमध्ये भरदिवसा तिहेरी हत्याकांड; वृद्ध दांपत्यासह मोलकरणीची हत्या
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.