Ad Advertisement Ad Advertisement

Cobalt-60 contamination : किरणोत्सर्गाची भूताटकी

Cobalt-60 contamination : शहराजवळ नवी सोसायटी तयार होतेय, त्यांच्या जाहिराती आणि सोयीसुविधा पाहून तुम्ही घर घेतलं खरं, पण एखाद दोन वर्षांच्या कालावधीत प्रत्येक घरात कोणीतरी आजारी पडायला लागलं. विशेषत: लहान मुलं, काही व्यंगासकटच जन्माला आली, तर काही जन्माला येतायेताच या जगातून गेली. कोणाला तरी कॅन्सर झाला. एक अस्वस्थ वातावरण सोसायटीत पसरलं! मग कोणीतरी वास्तूतज्ज्ञाला बोलावलं, त्यालाही काही कळेना. पण, सोसायटीत काहीतरी विचित्र घडतंय हे सगळ्यांना कळत होतं. नारायण धारपांच्या भयकथेत जसं घडतं तसंच सोसायटीत घडतंय,

असं प्रत्यक्षात घडलं तर..?

थोडा विचार करा, ही काल्पनिक परिस्थिती प्रत्यक्षात घडली तर? हो, हे घडलंय. भारतात नाही, पण तैवानमध्ये काही वर्षांपूर्वी घडलं आहे. १९८२ च्या ऑक्टोबर महिन्यात तैवानच्या एका रि-बार म्हणजे लोखंडाच्या सळ्या बनवणाऱ्या फॅक्टरीत ६०४ टन भंगार लोखंड येऊन पडलं. फॅक्टरीच्या भाषेत त्याला एचएमएस म्हणजे हेवी मेल्टिंग स्क्रॅप असं म्हटलं जातं. जगभरात अशाच भंगारातून लोखंडाच्या सळ्या बनवल्या जातात. या सळ्या इमारतीच्या बीम आणि कॉलममध्ये वापरल्या जातात.

तर हे ६०४ टन भंगार इतर भंगारात मिसळलं गेलं आणि २०,००० टन सळ्या कारखान्यातून बाहेर पडल्या. या सळ्यांचा उपयोग करून तैवानमध्ये जवळजवळ २०० इमारती उभ्या राहिल्या, अनेक टॉवर्स उभे राहिले, १७०० अपार्टमेंटचं एक गृहसंकुल म्हणजेच हाऊसिंग कॉम्प्लेक्स उभे राहिले. लोकं रहायला आली, पण आपण एका भयंकर संकटाच्या छायेत राहतो आहे हे समजायला मध्यंतरात १० वर्ष सहज निघून गेली.

१९९२ साली तैपॉवर या कंपनीत काम करणाऱ्या आणि या संकुलात राहणाऱ्या एका माणसाने त्याच्या मुलाला गीगर काउंटर नावाचे एक छोटे मशीन दाखवायला घरी आणले. तो न्यूक्लिअर पॉवर कंपनीत काम करणारा असल्याने तेथील किरणोत्सर्ग मोजण्यासाठी हे मशीन तो नेहमीच वापरायचा. घरी आल्यावर मुलाला ते मशीन दाखवताना त्याचे काटे गरगरा फिरायला लागले आणि त्याच्या लक्षात आले की आपल्या घराच्या भिंतींतून मोठ्या प्रमाणात रेडिएशन होत आहे. एखाद्या न्यूक्लिअर प्लँटमध्येसुद्धा होत नाही इतका किरणोत्सर्ग त्याच्या घरात होत होता.

किरणोत्सर्ग मोजण्याचे माप असते ‘सिव्हर्ट.’ त्याच्या घरात होणारा किरणोत्सर्ग सामान्य किरणोत्सर्गाच्या शंभर पट होता. 100 millisieverts हे रेडिएशन घरात होईलच कसे? या विचाराने तो चक्रावून गेला. नेमकी ही बातमी ‘लिबर्टी टाईम्स’ वृत्तपत्राच्या वार्ताहराला मिळाली आणि त्यानंतर एकच गदारोळ सुरू झाला!

घराच्या भिंतींमध्ये किरणोत्सर्गी पदार्थ आले कसे हा प्रश्न सगळ्यांनाच पडला आणि त्याचे उत्तर सापडले लोखंडाच्या सळ्यांमध्ये. त्याच त्या भंगारातून बनवलेल्या सळ्या!! सळ्या बनवण्यात वापरल्या गेलेल्या भंगारातल्या ६०४ टन भंगार तैवानच्या तीन मोठ्या न्यूक्लिअर पॉवर प्लँटमधून आले होते की चोरीच्या मालातून आले होते, की जुन्या टाकून दिलेल्या वैद्यकीय उपकरणातून आले होते? अनेक चर्चा सुरू झाल्या, पण वस्तुस्थिती एकच होती की तपासणी न करता बाहेर आलेल्या भंगारात Cobalt-60 होते.


थोडक्यात, प्रचंड मोठ्या प्रमाणात किरणोत्सर्ग असलेल्या घरांमध्ये ही सर्व माणसे १० वर्षांहूनही अधिक कालावधीपासून राहत होती. अनेकांना कॅन्सर झाला होता. अनेक घरांत जन्मत: शारीरिक व्यंगं असलेली मुलं जन्माला आली होती आणि त्याचे मूळ होते भंगारातून आलेल्या Cobalt-60 मिश्रित लोखंडी सळ्यांमध्ये!

शेवटी तैवानच्या अपघातात झालं काय?

ही बातमी व्हायरल झाल्यावर दबावामुळे त्यांना तपास करावाच लागला. ३१ जुलै १९९२ पासून किरणोत्सर्गी इमारतींचा शोध लागण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला दूषित घरांची संख्या मर्यादित होती; मात्र पुढील तपासणीत हा प्रश्न अधिक व्यापक असल्याचे स्पष्ट झाले. १९९७ पर्यंतच्या एका वैज्ञानिक अभ्यासानुसार, १४४ इमारतींमधील १,३२७ निवासी सदनिका किरणोत्सर्गाने दूषित असल्याचे निश्चित झाले होते.

नंतरच्या सर्व्हेत हा आकडा आणखी वाढला. तैवानच्या अणुऊर्जा नियामक संस्थेने, म्हणजेच ॲटॉमिक एनर्जी कौन्सिलने (एइसी), किरणोत्सर्गाचे प्रमाण मोजून बाधित घरांचे वर्गीकरण केले. काही घरांमध्ये वार्षिक किरणोत्सर्गाचा अंदाजित डोस १५ मिलिसिव्हर्टपेक्षा अधिक होता. अशा घरांमध्ये दीर्घकाळ राहणे आरोग्याच्या दृष्टीने धोकादायकच होते.

सरकारने किरणोत्सर्गाच्या पातळीनुसार वेगवेगळ्या उपाययोजना आखल्या. काही घरांच्या मालकांना निर्धारित वाजवी किमतीनुसार मालमत्ता सरकारला विकण्याची तरतूद करण्यात आली. काही इमारती पाडण्याचीही व्यवस्था केली गेली. या प्रकरणानंतर बाधित नागरिकांच्या आरोग्यावर किरणोत्सर्गाचे काय परिणाम झाले याचा अभ्यास करण्यात आला. संशोधकांनी गुणसूत्रांमधील बदल, कर्करोगाचे प्रमाण आणि इतर संभाव्य परिणामांचा अभ्यास केला. काही संशोधनांत बाधित लोकांमध्ये गुणसूत्रीय बदलांचे प्रमाण नियंत्रण गटाच्या तुलनेत अधिक असल्याचे नोंदवले गेले.

आजच्या तारखेस ते संकुल उजाड झाले आहे. इमारती पाडण्यात आल्या आहेत. कोणीही तेथे राहत नाही. कोबाल्टचे परिणामही कमी झाले आहेत, पण त्यात राहणाऱ्या कुटुंबांची वाताहत झाली हे ढळढळीत सत्य आहे. आता भारतात येऊ या! आपल्या देशातही बांधकामासाठी रि-बार हीच प्रोसेस आहे. रे रोड मुंबई – भावनगर गुजरात आणि बांगला देशात जुनी जहाजं कापली जातात. या कापलेल्या जहाजांच्या पत्र्यातून सळ्या बनवल्या जातात.

ही जहाजं परदेशातून आली असतात. त्यात असलेल्या उपकरणांची यादी मोघम दिली जाते. ही मोडकळीस आलेली जहाजं ‘हवाला’ मार्गाने दुबईतून इकडे येतात. या व्यवसायावर भाई लोकांची घट्ट पकड आहे, त्यामुळे अशा प्रकारचा धोका आपल्यालाही आहेच. काही वर्षांपूर्वी मुंबईत असेच काही किरणोत्सर्गी पदार्थ भंगारवाल्यांकडून जप्त करण्यात आले होते.

२०१० साली दिल्लीत असाच एक किरणोत्सर्गाचा अपघात झाला होता. या दुर्घटनेत सात जणांना किरणोत्सर्ग झाला. त्यापैकी एका कामगाराचा २६ एप्रिल रोजी मृत्यू झाला. या घटनेला ‘ मायापुरी’ केस म्हणून ओळखले जाते. या विषयावर Cobalt-60: The Saga of an Invisible Death हे पुस्तक उपलब्ध आहे. थोडक्यात धोका किरणोत्सर्गापेक्षा निष्काळजीपणाचा आहे.

रामदास
संपर्क : ८७७९६९७९७०

Read About : Hungry Ghost Festival : भुकेल्या भुतांचा उत्सव
E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.