Ad Advertisement Ad Advertisement

Nanded Tigress Killed by Train- नांदेड जिल्ह्यात रेल्वेच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू

रेल्वेट्रॅकवर अर्धा किमीपर्यंत मांसाचे तुकडे : संचार प्रकल्प होणार कधी?

Nanded Tigress Killed by Train किनवट (जि. नांदेड) : तालुक्यातील बोधडी वनपरिक्षेत्रांतर्गत मदनापूर गावाजवळ किनवट-नांदेड रेल्वेमार्गावर चारवर्षीय वाघिण छिन्नविच्छिन्न अवस्थेत शनिवारी (दि.१७) आढळून आली. रेल्वेच्या धडकेत हा मृत्यू झाल्याची माहिती वन विभागाने दिली. या घटनेमुळे वन्यजीवप्रेमींतून प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत असून, जवळपास अर्धा किमीपर्यंत रेल्वेट्रॅकवर वाघिणीच्या मांसाचे तुकडे आढळून आले आहेत. दरम्यान, मांडवी, अंबाडी, किनवट, पैनगंगा असा ४० किमीचा संचार प्रकल्प (टायगर कॉरिडॉर) मंजूर करावा, अशी मागणी अभ्यासकांतून होत आहे.

बोधडी वनपरिमंडळातील दरसांगवी नियतक्षेत्रात, किनवट-नांदेड रेल्वेमार्गावरील सोमेश्वर महादेव मंदिराजवळ मदनापूर परिसरातील रेल्वे रुळावर ही घटना घडली. दरम्यान, हा प्रकार घातपाताचा असल्याचा संशय नागरिकांतून व्यक्त होत आहे. मृत वाघिणीचे शवविच्छेदन सावरी वन आगारातील विश्रामगृहात करण्यात आले. यावेळी उपवनसंरक्षक मनीषा पाटील, सहायक वनसंरक्षक एस. डी. इटलोड, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणचे प्रतिनिधी अतिंद्र कट्टी, पशुसंवर्धन विभागाचे सहायक आयुक्त डॉ. संजीव पाटील, डॉ. राहुल जोंधळे, डॉ. योगेश पाटील यांच्या पथकाने शवविच्छेदन केले. पंचांसमक्ष सावरी वन आगार येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

वाघ असूनही ‘कॉरिडॉर प्रोजेक्ट’ नाही

आजरोजी ५ वाघांचा वावर मराठवाड्यात आहे. असे असताही त्यांच्या संवर्धन आणि सुरक्षिततेसाठी संचार प्रकल्प (कॉरिडॉर प्रोजेक्ट) राबविण्यास प्रशासनाने असमर्थता दर्शवलेली आहे. शासनाने याकडे वेळीच लक्ष देण्याची गरज अभ्यासकांतून व्यक्त होत आहे. दोन किंवा त्यापेक्षा अधिक अभयारण्ये विविध मार्गिकांनी जोडणे म्हणजे कॉरिडॉर (संचार मार्ग) होय. राज्यात वाघांसाठी असे अनेक कॉरिडॉर तयार करण्यात आलेले आहेत.

जीव गेल्यावर उपाययोजना

वाघिण दगावल्यानंतर वन विभागाची यंत्रणा जागी झाली. बोधडी ते किनवट असा जवळपास १० किमीचा रेल्वेट्रॅक असून, या मार्गावरील रेल्वेचा वेग कमी ठेवावा या आशयाचे पत्र आता रेल्वे प्रशासनाला दिले जाणार आहे. किनवट परिसरात घनदाट जंगल असून येथे वाघांचा अधिवास असल्याचे वन विभागाला माहीत असताना आजवर ही उपाययोजना का केली नाही? असा सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.

वाघांच्या संचार मार्गिका अशा

पैनगंगा अभयारण्य, टिपेश्वर अभयारण्यातून (यवतमाळ) वाघ प्रवेश करीत आहेत. टिपेश्वरमधून यवतमाळ, कारंजा, अकोला, बुलढाणामार्गे जाईचा देव, अजिंठामार्गे गौताळा किंवा सोयगावमार्गे गौताळा किंवा टिपेश्वर, पैनगंगा, नांदेड, लातूर, येडशीमार्गे धाराशिव. ज्ञानगंगा अभयारण्यातील वाघ पुसद, हिंगोली, माहूरगड, किनवट, आदिलाबाद किंवा टिपेश्वरमध्ये जाऊ शकतात. गौताळा औट्रम घाट अभयारण्याचा भ्रमणमार्ग सोयगाव, सिल्लोड तालुक्यातून उत्तरेला यावल अभयारण्याकडे व पूर्वेला बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्याकडे जातो. तो पुढे मेळघाट किंवा काटेपूर्णाकडे विस्तारला जाऊ शकतो.

२०१९ पासून आगमन सुरू

१९७२ च्या शिकारीनंतर मराठवाड्यात पहिला वाघ (हिंगोली जिल्ह्यात) ३ नोव्हेंबर २०१९ रोजी सी १ टी १ (वॉकर) आला. यानंतर २१ फेब्रुवारी २०२१ रोजी गौताळा अभयारण्यात ४९ वर्षांनंतर (टी ३ सी १) वाघ आला. तर, नांदेड जिल्ह्यात वाघांचा वावर नियमित झाला आहे. तथापि, आता धाराशिव जिल्ह्यात २०२४ पासून ॲव्हेंजर नावाचा वाघ आहे. बीड, अहिल्यानगर, सोलापूर असा तो हिंडत आहे.

कॉरिडॉर म्हणजे?

दोन किंवा त्यापेक्षा अधिक अभयारण्ये विविध मार्गिकांनी जोडणे म्हणजे कॉरिडॉर (संचार मार्ग) होय. राज्यात वाघांसाठी असे अनेक कॉरिडॉर तयार करण्यात आलेले आहेत.

शासनाने वेळीच लक्ष देण्याची गरज

वाघांचा प्रदेश म्हणून एकेकाळी मराठवाडा प्रांताची ओळख होती. जी नंतर कमी-कमी होत पुसल्या गेली. आता वाघांनी डरकाळ्या फोडत आपल्या अधिवास क्षेत्रात पुनरागमन सुरू केले आहे. आजरोजी ५ वाघांचा वावर मराठवाड्यात आहेत. असे असताही त्यांच्या संवर्धन आणि सुरक्षिततेसाठी संचार प्रकल्प (कॉरिडॉर प्रोजेक्ट) राबविण्यास प्रशासनाने असमर्थता दर्शविलेली आहे.

शासनाने याकडे वेळीच लक्ष देण्याची गरज अभ्यासकांतून व्यक्त होत आहे. वाघांच्या संचार मार्गिका नागरीकरण, शेती, विकासप्रकल्प आदी कारणांमुळे बंदच झालेल्या आहेत. त्या पुन्हा कशा मोकळ्या आणि सुरक्षित करता येतील? याचा विचार होणे आवश्यक आहे, पण प्रशासनाकडून लोकांना त्रास होईल, विकासकामांत अडथळा अशी कारणे पुढे केली जात आहेत. परिणामी अभयारण्यांच्या परिघाबाहेर मुक्त संचार करत, सुरक्षित अधिवास क्षेत्र निर्माण करू पाहणाऱ्या मराठवाड्यातील वाघांची शिकार होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.

Read About: The Royals Season 2 : ‘द रॉयल्स २’ मध्ये नवा लव्ह ट्रँगल ( Love Triangle)

E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.