‘गडांचा मान, संविधानाचा सन्मान’ अभियानचे रायगडावर आयोजन
रायगड : DCM Eknath Shinde – छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेले गडकोट हे त्यांच्या दूरदृष्टीचे, पराक्रमाचे आणि व्यवस्थापन कौशल्याचे प्रतीक आहेत. या गडांचे पावित्र्य, ऐतिहासिक वारसा आणि पर्यावरण जपणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
संविधान दिनानिमित्त रायगडावरील हिरकणीवाडी येथे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (एमपीसीबी) ‘गडांचा मान, संविधानाचा सन्मान’ या विशेष अभियानाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी संविधान, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक विषयांवरही भूमिका मांडली.
शिवरायांच्या दूरदृष्टीतून तरुणांनी प्रेरणा घ्यावी
शिंदे यांनी सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन अभिवादन केले. अभियानांतर्गत स्वच्छता दूतांशी संवाद साधतानाच पाचाड-महाड मार्गावरील वनराई बंधाऱ्यांची पाहणी केली. शिवरायांनी किल्ल्यांवर पाणी व्यवस्थापन, धान्य साठवण, बाजारपेठा आणि संरक्षण व्यवस्थेचे नियोजन केले होते. त्यांच्या राज्यकारभारात सामान्य जनतेचे हित केंद्रस्थानी होते. शिवरायांच्या दूरदृष्टीतून आजच्या तरुणांनी प्रेरणा घ्यावी, असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी केले.
गडसंवर्धनाची लोकचळवळ बनावी
महाराष्ट्रातील 218 गडांना भेट देणाऱ्या आठ वर्षीय मुलीच्या गडसंवर्धनविषयक सूचनांचे कौतुक करत त्यांनी गडांवरील प्लास्टिक कचरा, अतिक्रमणे आणि प्रदूषण रोखण्याची गरज अधोरेखित केली. गडसंवर्धनाचे हे अभियान केवळ कार्यक्रम न राहता लोकचळवळ बनावे. गडकोटांचे संवर्धन, वृक्षारोपण, सौरऊर्जा, पाणी व्यवस्थापन आणि स्वच्छतेसाठी लोकसहभाग वाढविण्याचे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले.
न्याय, समानता आणि लोकशाहीची मूल्ये
शिवरायांचे स्वराज्य आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान हे न्याय, समानता आणि लोकशाहीची मूल्ये पुढे नेणारे आहेत. संविधानामुळे सामान्य कुटुंबातील व्यक्तीलाही सर्वोच्च पदापर्यंत पोहोचण्याची संधी मिळते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2015 मध्ये संविधान दिनाला राष्ट्रीय स्तरावर महत्त्व दिले, असे ते म्हणाले.
जिथे संकट, तिथे शिवसेना
शेतकरी, सामान्य नागरिक आणि संकटग्रस्तांच्या पाठीशी उभे राहणे ही सरकारची जबाबदारी असून ‘जिथे संकट, तिथे शिवसेना’ या भूमिकेतून मदतीचे कार्य सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले, एमपीसीबीचे अध्यक्ष सिद्धेश कदम, खासदार प्रा. ज्योती वाघमारे, इतर मान्यवर उपस्थित होते.
Read About : 19 Dams Dry in Marathwada- मराठवाड्यातील १९ धरणे कोरडीठाक
E-paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.