आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेच्या ‘जागतिक ऊर्जा दृष्टिकोन-२०२६’ अहवालातील अंदाज; विद्युतीकरणामुळे कुटुंबांचा ऊर्जा खर्च घटण्यासह रोजगारनिर्मितीला चालना
नवी दिल्ली : Global Electricity Demand जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी करून विजेचा वापर वाढवला, तर नागरिकांचे ऊर्जा खर्च घटण्यासह रोजगारनिर्मितीलाही चालना मिळू शकते. आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेच्या (आयईए) ‘जागतिक ऊर्जा दृष्टिकोन-२०२६’ अहवालात हा निष्कर्ष मांडण्यात आला आहे. तुर्कियेतील अंताल्या येथे सुरू असलेल्या ‘सीओपी-३१’ हवामान परिषदेदरम्यान हा अहवाल प्रसिद्ध झाला.
‘आयईए’च्या ‘नेट झिरो २०५०’ अंदाजानुसार, जागतिक अंतिम ऊर्जा वापरातील विजेचा वाटा २०२५ मधील २३ टक्क्यांवरून २०३५ पर्यंत ३५ टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो. यामुळे जगभरातील कुटुंबांचे सरासरी ऊर्जा खर्च सुमारे पाच टक्क्यांनी कमी होण्याचा अंदाज आहे. ऊर्जा क्षेत्रात निव्वळ १.५६ कोटी अतिरिक्त रोजगारही निर्माण होऊ शकतात.
मात्र, सध्याच्या धोरणांनुसार २०३५ पर्यंत विजेचा वाटा केवळ २८ ते २९ टक्क्यांपर्यंतच पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोप-३१ परिषदेचा अध्यक्ष देश तुर्कियेने मांडलेल्या ‘३५ बाय ३५’ उद्दिष्टासाठी अधिक प्रभावी प्रयत्नांची गरज आहे. भारताने ‘३५-बाय-३५’ उद्दिष्टाला पाठिंबा दिलेला नाही; त्याऐवजी हवामानविषयक समानता आणि आर्थिक मदतीवर भर दिला आहे.
गुंतवणूक वाढवावी लागणार
‘आयईए’च्या अंदाजानुसार, २०२५ ते २०३५ दरम्यान कुटुंबांचा इंधनावरील वार्षिक खर्च ६६० डॉलरवरून ३८० डॉलरपर्यंत, तर नैसर्गिक वायूवरील खर्च १४० डॉलरवरून १०५ डॉलरपर्यंत खाली येऊ शकतो. वीज खर्च वाढला तरी इंधनावरील बचतीमुळे एकूण खर्च कमी होण्याची शक्यता आहे.
वीजजाळे आणि साठवणूक महत्त्वाची
हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी २०३५ पर्यंत दरवर्षी सुमारे ८०० अब्ज डॉलरची गुंतवणूक आवश्यक आहे. वीज वितरण जाळे आणि ऊर्जा साठवणूक व्यवस्था सक्षम नसल्यास अक्षय ऊर्जेचा विस्तार मंदावू शकतो. अहवालानुसार, देशांनी वेगाने विद्युतीकरण केल्यास ऊर्जा सुरक्षा मजबूत होईल आणि तेल-गॅसच्या जागतिक किमतीतील चढउतारांचा परिणामही कमी करता येईल.
Read About : Gaganyaan Mission Latest Update : गगनयान मोहिमेला विलंब नाही, इस्रो प्रमुखांचा खुलासा
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.