Ad Advertisement Ad Advertisement

Desert Transformation : गाढवांनी केला नेगेव वाळवंटाचा कायापालट – 2026

पाण्यासाठी वाळूत खोदले खड्डे; वन्यजीवांना मिळाले पाणी आणि वाळवंटात तयार झाले हिरवे पट्टे

तेल अविव : Desert Transformation ‘मूर्ख, सुस्त आणि काहीच कामाचा नाही. गाढवाचे नाव निघताच आपल्या डोळ्यांसमोर हीच प्रतिमा उभी राहते. पण याच प्राण्याने असा काही पराक्रम केलाय, जो ऐकून कोणाचीही जीभ दाताखाली दाबली जाईल. कडक उन्हात पाण्याचा थेंबही नसलेल्या वाळवंटात या गाढवांनी पायांनी खड्डे खोदून पाणी शोधले आणि अवघ्या काही वर्षांत संपूर्ण वाळवंटाचा कायापालट करून दाखवला. इस्रायलमधील नेगेव वाळवंटात घडलेली ही रंजक आणि थक्क करणारी खरीखुरी गोष्ट आहे.

४४ वर्षांपूर्वी इस्रायलमधील नेगेव वाळवंटात शिकारीमुळे गाढवांची प्रजाती जवळजवळ नष्ट झाली होती. निसर्गाचे चक्र बिघडत चालल्याचे पाहून इस्रायलने शेजारील इराणकडे मदत मागितली. १९६८ मध्ये इराणच्या शाह यांनी इस्रायलला २८ दुर्मिळ जंगली गाढवे भेट म्हणून दिली. या ‘विशेष पाहुण्यांना’ विमानाने इस्रायलमध्ये आणले गेले. पुढे १९८२ मध्ये त्यांना मोकळा श्वास घेण्यासाठी भयंकर गरम अशा ‘नेगेव वाळवंटात’ सोडून देण्यात आले.

४५ अंश सेल्सिअसचे भयंकर तापमान, पाण्याचा पत्ता नाही अन् चारी बाजूला फक्त वाळू… अशा जिवघेण्या वातावरणात या गाढवांनी हार मानली नाही. त्यांनी जगण्यासाठी स्वत:मध्ये असे काही बदल केले, जे पाहून वैज्ञानिकही थक्क झाले. पाण्यासाठी त्यांनी स्वत:च्या पायांनी वाळूत खोल खड्डे खोदण्यास सुरुवात केली. या खड्ड्यांमध्ये जमिनीखालचे पाणी साचू लागले. या पाण्यामुळे फक्त गाढवांचीच नाही, तर वाळवंटातील पक्षी, साप आणि इतर वन्यजीवांचीही तहान भागली. पाणी साचल्यामुळे या खड्डयांच्या आजूबाजूला हळूहळू गवत आणि नवनवीन वनस्पती उगवू लागल्या. बघता बघता कोरड्या वाळवंटात हिरवेगार पट्टे तयार झाले.

ज्यांना हिणवले, त्यांनीच करून दाखवला चमत्कार

अनेक वर्षे वाळवंटात राहिल्यामुळे या गाढवांचा अवतारच बदलून गेला! आज ती एखाद्या लहान घोड्यासारखी रुबाबदार दिसतात आणि ताशी ७० किमीच्या वेगाने सुसाट धावतात. विशेष म्हणजे, पाण्याचा थेंबही न पिता ही गाढवे अनेक दिवस राहू शकतात. आज या वाळवंटात २८ वरून तब्बल ५०० ते ६०० गाढवे आनंदाने हुंदडत आहेत. माणसाने ज्या प्राण्याला नेहमी हिणवले आणि कमकुवत समजले, त्याच गाढवांनी एका ओसाड वाळवंटाचे नंदनवनात रुपांतर केले आहे.

Read About : Indian Wolf Satellite Collar लांडग्याला सॅटॅलाइट कॉलर; राज्यातील दुसरा प्रयोग संभाजीनगरात
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.