Ad Advertisement Ad Advertisement

Lord Dhanvantari and Ayurveda : धन्वंतरी

Lord Dhanvantari and Ayurveda : चरक संहितेत धन्वंतरींणा ‘भगवान’ आणि ‘आदिदेव’ म्हटलं आहे. विश्वातील रोगांचं निवारण करण्यासाठी आणि आयुर्वेदाची परंपरा पुनर्स्थापित करण्याच्या हेतूनं साक्षात विष्णूच धन्वंतरींचा अवतार घेते झाले असं म्हटलं आहे.

माणूस म्हणून जगण्याचं भान आल्यानंतर म्हणजे आगीच्या नियंत्रित वापराची सवय होऊन भाजून शिजवलेलं अन्न खाण्यामुळे सेरेब्रम म्हणजे मेंदूचा सर्वांत मोठा पुढचा आणि वरचा भाग विकसित झाल्यानंतर घडलेल्या उन्नतीचा एक टप्पा म्हणजे आपल्या शरीराची जाणीव. ते समजावून घेण्याचा केला गेलेला आणि त्याची शास्त्रीय चिकित्सा करण्याचा एक नवा उद्योग माणसानं मागे लावून घेतला. नवा उद्योग अशासाठी की त्यातून एक स्वतंत्र शास्त्र निर्माण झालं, त्याचं नाव आयुर्वेद! ही सगळी प्रस्तावना यासाठी की प्राणी जगतात स्वत:वर केले जाणारे तात्पुरते उपचार किंवा इतर एखाद्या प्राण्या-पक्ष्याकडून अंगावरचे किडे काढवून घेण्याच्या पलीकडे जाऊन रोगचिकित्सा करण्याची स्वत:ची एक पद्धत शोधून काढणारा मानवी मेंदू अद्वितीय आहे.

देवलोकांत रोगांवर उपचार करण्यासाठी औषधी रसायन आणि शल्यकर्मचा वापर करणं आणि कोणतीही विपदा किंवा आपत्ती आली तर त्याचं निवारण करणं ही दोन दायित्व पार पाडणारे जुळे भाऊ असल्याचा उल्लेख ऋग्वेदात वारंवार येतो. विवस्वान सूर्य आणि संज्ञा (सरण्यू / संजना) या दैवी दाम्पत्याची जुळी मुलं नासत्य आणि दस्र या अश्विनी कुमारांची अतिशय सुंदर स्तुती असलेली एकूण ५७ सूक्तं आहेत. वैदिक देवतांमध्ये इंद्र आणि अग्नि यांच्यानंतर सर्वाधिक सूक्तं अश्विनी कुमारांच्याच नावे आहेत. याशिवाय संपूर्ण ऋग्वेदात त्यांचा ३७६ वेळा उल्लेख आला आहे. या सगळ्या स्तुतीचा गोषवारा म्हणजे अश्विनी कुमारांनी त्यांच्या दिव्य शक्तीचा विनियोग करत केलेले चमत्कार, रोगमुक्ती आणि विविध ऋषींना आणि राजे राण्यांना संकटातून सोडवल्याची वर्णनं आणि त्यांनी केलेल्या उपकारांविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे. आजच्या काळात या प्रकारची काम करणाऱ्या यंत्रणेला डिझास्टर मॅनेजमेंट सिस्टीम आणि तत्काळ मदत देणाऱ्या चमूला क्विक रिस्पॉन्स टीम म्हणतात. हे आवर्जून सांगण्याची दोन मुख्य कारणं आहेत.

पहिलं अशा प्रकारची सेवा देणारी यंत्रणा असावी ही उमज असलेल्या आपल्या पूर्वजांविषयी वाटणारा आदर आणि दुसरं कारण तर त्याहूनही महत्त्वाचं आहे. सध्याच्या तुर्किए नावाच्या देशात बोगाज्काय नावाच्या ठिकाणी सापडलेल्या इसवी सन पूर्व १४०० च्या काळात कोरलेल्या मातीच्या विटांवरील कोरीव लेखांमध्ये (क्युनिफॉंर्म टॅबलेट्स) प्राचीन हित्ती आणि मितानी कबिल्यांमध्ये झालेल्या शांतता कराराचा उल्लेख आहे. हा करार पाळला जावा यासाठी साक्षीदार म्हणून इंद्र, वरुण, मित्र आणि नासत्य (अश्विनीकुमार) या वैदिक हिंदू देवतांची नावे कोरलेली आहेत. एकूण देवांच्या या वैद्यांची लोकप्रियता पार तुर्किएपर्यंत पसरली होती.

पुढे पौराणिक काळातील वाङ्मयात कथा येते – दानव असुरांसह लढण्यात देवलोकांची शक्ती कमी पडू लागली. त्यांच्या सततच्या पराभवावर तोडगा म्हणजे अमृत नावाच्या दिव्यद्रव्याची प्राप्ती करून घेणं. हे अमृत कसं मिळवायचं? तर क्षीरसमुद्रमंथन करून. काहीसं कठीणच होतं ते. पण, अखेर असुरांच्या मदतीनं सगळा क्षीरसागर घुसळून काढण्याचा घाट घालण्यात आला. मेरू पर्वताची रवी आणि वासुकी नागाची दोरी करून मंथनाला सुरुवात केली; पण मेरू पर्वताला आधार नव्हता, सहाजिकच तो बुडू लागला. अखेर भगवान विष्णूंनी कूर्मावतार धारण करत त्याला आधार दिला. तेरा रत्नांनंतर वरच्या उजव्या हाती चक्र, वरच्या डाव्या हाती शंख, खालच्या उजव्या हाती जलुका म्हणून जळू आणि खालच्या डाव्या हाती अमृत या आयुधांसह धन्वंतरी प्रकटले; तो दिवस होता आश्विन कृष्ण त्रयोदशी!

प्राचीन भारतीय विद्वज्जनांनी आयुर्वेदाचे प्रणेते म्हणून त्यांचं पूजन केलं. पृथ्वी लोकातील विविध वनस्पती आणि खनिजांचा वापर करून पृथ्वीवर रहिवास करणाऱ्या लोकांची रोगचिकित्सा करण्यासाठीच धन्वंतरीच्या रूपात श्रीनारायण अवतरले ही त्यांची प्रगाढ श्रद्धा आहे. सुश्रुत आणि चरक या आयुर्वेदाचार्यांनी आपापल्या ग्रंथात मंगलाचरणातचं त्यांना नमन केलं आहे. सुश्रुत संहितेच्या पहिल्याच अध्यायात धन्वंतरी स्वत:च सांगतात – ‘मी तो आदिदेव धन्वंतरी आहे, ज्याने देवांना जरामृत्यू आणि रोगांपासून मुक्त केले आणि आता पृथ्वीवर शल्यतंत्राचा (शस्त्रक्रियेचा) उपदेश करण्यासाठी जन्म घेतला आहे.’ तर चरक संहितेत धन्वंतरींणा ‘भगवान’ आणि ‘आदिदेव’ म्हटलं आहे. विश्वातील रोगांचं निवारण करण्यासाठी आणि आयुर्वेदाची परंपरा पुनर्स्थापित करण्याच्या हेतूनं साक्षात विष्णूच धन्वंतरींचा अवतार घेते झाले असं म्हटलं आहे.

वैद्य आणि शल्यकर्मी म्हणजे मेडिसीन आणि सर्जरी असं विभाजन आयुर्वेदातही आहे. काशिराज दिवोदास हे साक्षात भगवान धन्वंतरी होते आणि त्यांनी शल्यकर्मप्रधान चिकित्सा पद्धतीची रुजवात केली तोच हा धन्वंतरी संप्रदाय. महर्षी सुश्रुत हे दिवोदासांचं पट्टशिष्य आणि याच धन्वंतरीय परंपरेचे मुख्य प्रतिनिधी. थोडक्यात शल्य कर्मात पारंगत, निष्णात आणि कुशल चिकित्सकाला धन्वंतरीय म्हणजे ‘धन्वंतरी संप्रदाया’चा म्हटलं जातं.

देव लोकांत राहणाऱ्या लोकांची रोगचिकित्सा करणारे अश्विनीकुमार तर मर्त्य लोकांवर उपचार करणारे धन्वंतरी आणि त्यांचे अनुयायी असं सरळ विभाजन दिसून येतं. त्यातून मानवी शरीराला होणारे रोग, त्यांची लक्षणं – कारणं – औषधी आणि उपचार, शल्यकर्म, त्यांचं वर्गीकरण, यांसारख्या शास्त्रशुद्ध चिकित्सा पद्धतीचा अवलंब करून अनेकानेक रुग्णांना रोगमुक्त करण्याची आणि सुदृढ लोकांना रोग होण्यापासूनच परावृत्त करण्याची एक विलक्षण परंपराच धन्वंतरी यांनी या भूमीत साकारली आहे. स्वास्थ्य, आरोग्य, निरामयता या विविध संकल्पनांची व्याख्या करत रोग होऊ न देता, उत्तम सुदृढ शरीर, संतुलित मन आणि कुशाग्र बुद्धी या तिन्हीच्या मेळातून साधलेलं दीर्घायुष्य हीच भूमिका मांडणारा आयुर्वेद या चिकित्सकीय क्षेत्रातली आद्य प्रणाली आहे. हा सगळा इतिहास संदर्भाला ठेवत आपण भारतीयांनी धन्वंतरी ही संकल्पना प्रस्तुत केली. तिलाच ही बाविसावी शिल्पगाथा समर्पित!!!

डॉ. रमा गोळवलकर
संपर्क : ९४२२११४६२०

Read About : India Poverty Reduction : गरिबी कमी झाली; जीवनमान बदलले का?
E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.