Ad Advertisement Ad Advertisement

Dharashiv Fire News – येडशीत भीषण आग; एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू

किराणा आणि गिफ्ट दुकानातून आगीचा घरात फैलाव; दोघांचा होरपळून, तर चौघांचा धुरामुळे गुदमरून मृत्यू

येडशी / धाराशिव : Dharashiv Fire News दिवाळीच्या सणादरम्यान धाराशिव तालुक्यातील येडशी येथे काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली. किराणा दुकान आणि गिफ्ट वेअरच्या दुकानाला लागलेल्या भीषण आगीत वरच्या मजल्यावर राहणाऱ्या एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला. सोमवारी (दि. ९) पहाटे दोन ते अडीचच्या सुमारास ही दुर्घटना घडली. मृतांमध्ये तीन पिढ्यांतील सदस्यांचा समावेश असून, ऐन दिवाळीत करंडे कुटुंबावर काळाने घाला घातल्याने येडशीसह परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, येडशी येथील लातूर रोडवर करंडे कुटुंबाचे किराणा दुकान आणि गिफ्ट वेअरचे दुकान होते. दुकानाच्या वरच्या मजल्यावर कुटुंबीय वास्तव्यास होते. रविवारी रात्री लक्ष्मीपूजन केल्यानंतर कुटुंबातील सर्व सदस्य झोपले होते. पहाटेच्या सुमारास दुकानात अचानक आग लागली. काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले आणि संपूर्ण इमारतीत धुराचे लोट पसरले.

पहाटेची वेळ असल्याने कुटुंबातील सर्वजण गाढ झोपेत होते. आगीची तीव्रता वाढल्यानंतर त्यांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. रस्त्यावरून जाणाऱ्या एका वाहनधारकाच्या निदर्शनास ही घटना आल्यानंतर त्याने ग्रामस्थांना माहिती दिली. त्यानंतर गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.

तीन पिढ्यांतील सहा जणांचा दुर्दैवी अंत

या दुर्घटनेत उत्तम त्रिंबक करंडे (७५), चंद्रकला उत्तम करंडे (७२), गोविंद उत्तम करंडे (४५), ज्योती गोविंद करंडे (४०), गायत्री गोविंद करंडे (१८) आणि सिद्धी गोविंद करंडे (१२) यांचा मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार, दोघांचा होरपळून, तर चौघांचा धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक रितू खोखर, महसूल विभागाचे अधिकारी, ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

एकुलता एक मुलगा कृष्णा सुदैवाने बचावला

या भीषण दुर्घटनेत करंडे कुटुंबातील सहा जणांचा दुर्दैवी अंत झाला असला, तरी त्यांचा एकुलता एक मुलगा कृष्णा हा मात्र सुदैवाने बचावला आहे. एकाच रात्री आई-वडिलांसह कुटुंबातील सहा सदस्य गमावल्याने कृष्णावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. काळजाचा थरकाप उडवणाऱ्या या घटनेने संपूर्ण गाव हळहळले आहे .

अग्निशमन यंत्रणेच्या प्रतिसादावर प्रश्नचिन्ह
  • आग विझवण्यासाठी ग्रामस्थांनी सुरुवातीला बादल्यांमधून पाणी आणून प्रयत्न केले. बोअरवेल सुरू करूनही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, आगीने भीषण स्वरूप धारण केल्याने हे प्रयत्न अपुरे ठरले. जवळच्या पेट्रोल पंपावरील अग्निशामक उपकरणांचाही वापर करण्यात आला.
  • परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. मात्र, मदतकार्यात तांत्रिक अडचणी आल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेच्या प्रतिसादाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. या दुर्घटनेत नेमक्या कोणत्या अडचणी आल्या आणि मदत पोहोचण्यास विलंब झाला का, याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.
  • दिवाळीच्या आनंदाच्या क्षणी एका कुटुंबातील सहा जणांचा असा दुर्दैवी अंत झाल्याने येडशी गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Read About : Shahaganj Pipe Fire – शहागंजमध्ये पाणी योजनेचे पाइप जळून खाक
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.