Digital Self-Reliance : मायक्रोसॉफ्टच्या सेवांमध्ये आलेल्या एका तांत्रिक बिघाडाने जगातील ७४ देशांमधील डिजिटल व्यवहार विस्कळीत केले. एका कंपनीच्या सर्व्हरमध्ये निर्माण झालेल्या समस्येने विमानसेवा, बँकिंग, रुग्णालये, सरकारी कार्यालये, न्यायालये आणि उद्योगांचे कामकाज प्रभावित झाले. आधुनिक जग किती वेगाने डिजिटल झाले आहे याची जाणीव या घटनेने करून दिली.
मायक्रोसॉफ्टच्या गोंधळामुळे अनेक संस्थांना पर्यायी व्यवस्था शोधावी लागली. काही ठिकाणी पुन्हा कागदी नोंदी आणि फॅक्सचा आधार घ्यावा लागला. ब्रिटनमध्ये आरोग्य व्यवस्थेतील ई-मेल सेवांवर परिणाम झाल्याने औषधांच्या प्रिस्क्रप्शिनच्या वितरणात अडचणी निर्माण झाल्या. काही ठिकाणी न्यायालयीन कामकाज पुढे ढकलावे लागले. विमान कंपन्यांच्या ग्राहकसेवा यंत्रणांवर परिणाम झाला.
या घटनेतून सर्वांत महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे, जगातील एवढ्या मोठ्या देशांनी आपल्या अत्यावश्यक डिजिटल व्यवस्थेची जबाबदारी काही परदेशी कंपन्यांच्या हातात सोपवणे कितपत योग्य आहे? भारतासारख्या विशाल लोकसंख्या, मोठी अर्थव्यवस्था, विस्तीर्ण भौगोलिक क्षेत्र आणि प्रचंड प्रशासकीय गरजा असलेल्या देशाने या प्रश्नाकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे. या संदर्भात चीनचे उदाहरण अभ्यासण्यासारखे आहे. मायक्रोसॉफ्टच्या जागतिक सेवांमध्ये आलेल्या बिघाडाचा परिणाम अनेक देशांमध्ये दिसून आला. मात्र, चीनमध्ये त्याचा परिणाम तुलनेने मर्यादित राहिला. याचा अर्थ चीनमध्ये मायक्रोसॉफ्टची सेवा वापरली जात नाही किंवा चीन पूर्णपणे अशा संकटांपासून सुरक्षित आहे, असा होत नाही.
चीनमध्ये मायक्रोसॉफ्टच्या क्लाउड सेवा जगातील अन्य देशांप्रमाणे थेट मायक्रोसॉफ्टच्या जागतिक नेटवर्कवर चालत नाहीत. चीनमध्ये या सेवांचे संचालन स्थानिक भागीदार असलेल्या एका कंपनीमार्फत केले जाते, त्यामुळे जागतिक मायक्रोसॉफ्ट नेटवर्कमध्ये निर्माण झालेला बिघाड चीनमधील या स्वतंत्र व्यवस्थेवर फार मोठा परिणाम करू शकला नाही. चीनने गेल्या अनेक वर्षांत स्वत:च्या डिजिटल परिसंस्थेची उभारणी करण्यावर भर दिला आहे.
डिजिटल स्वावलंबन म्हणजे जगाशी संपर्क कायम ठेवून आपल्या देशाच्या महत्त्वाच्या डिजिटल व्यवस्था स्वत:च्या नियंत्रणाखाली ठेवणे आणि कोणत्याही एका कंपनीवर संपूर्ण अवलंबित्व निर्माण होऊ न देणे. एकेकाळी चीनही पाश्चात्त्य तंत्रज्ञानावर अवलंबून होता. परंतु, चीनने हळूहळू स्वत:ची तंत्रज्ञान परिसंस्था विकसित करण्यात मोठे यश मिळविले. या पार्श्वभूमीवर भारताकडे पाहताना असे दिसते की, अन्नधान्याच्या बाबतीत आपण स्वावलंबी होऊ शकलो. आपण त्यासाठी संशोधन केले व मग काम केले.
भारताने संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेच्या दिशेने गेल्या काही वर्षांत महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेचा पुढचा टप्पा डिजिटल आणि सॉफ्टवेअर आत्मनिर्भरतेचा असला पाहिजे. काही महत्त्वाच्या डिजिटल सेवांसाठी आपण अजूनही परदेशी कंपन्यांकडे पाहतो. त्यासाठी सातत्यपूर्ण संशोधन, कुशल मनुष्यबळ, प्रयोगशाळा, विद्यापीठे, उद्योग आणि पुरेसा आर्थिक निधी आवश्यक असतो. आपल्या देशात बुद्धिमत्तेची कमतरता नाही, पण जगातील प्रगत आणि वेगाने प्रगती करणाऱ्या देशांच्या तुलनेत भारताचा संशोधन खर्च कमी आहे. भारताने केवळ तंत्रज्ञानाचा ग्राहक बनून राहू नये. तंत्रज्ञान निर्माण करणारा आणि जगाला पुरविणारा देश बनणे हे आपले ध्येय असावे.
मायक्रोसॉफ्टच्या संकटाने आरोग्य क्षेत्रातील डिजिटल अवलंबित्वाचा एक गंभीर पैलू समोर आणला. विमानसेवा किंवा व्यावसायिक व्यवहार काही काळ विस्कळीत झाले तर आर्थिक नुकसान होते. परंतु, आरोग्य व्यवस्थेतील माहितीची देवाणघेवाण थांबली तर त्याचे परिणाम रुग्णांच्या आरोग्यावर आणि काही वेळा त्यांच्या जीवावरही बेतू शकतात. आधुनिक वैद्यकीय व्यवस्थेत रुग्णाची माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. त्याच्या पूर्वीच्या आजारांची माहिती, औषधांची नोंद, शस्त्रक्रियांचा इतिहास, रक्त तपासणीचे अहवाल, एक्स-रे, सीटी स्कॅन, एमआरआय, ॲलर्जी, रक्तगट आणि उपचारांचा तपशील यांची नोंद योग्य वेळी प्राप्त होणे आवश्यक असते. आज भारतात अशा प्रकारची एकात्मिक आरोग्य माहिती व्यवस्था पूर्ण क्षमतेने कार्यरत असल्याचे म्हणता येणार नाही.
आयुष्मान भारत डिजिटल मिशनच्या माध्यमातून महत्त्वाचे पाऊल उचलले आहे हे खरे. मात्र, आरोग्य नोंदींची संख्या वाढणे आणि देशातील प्रत्येक नागरिकाचा वैद्यकीय इतिहास सुरक्षित, अचूक आणि आवश्यकतेनुसार उपलब्ध होणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. त्यासाठी भारताला राष्ट्रीय स्तरावर सक्षम आरोग्य माहिती परिसंस्था उभारण्याची आवश्यकता आहे. भारतातील आरोग्यसेवेचा मोठा भाग खासगी क्षेत्रातून पुरविला जातो, त्यामुळे केवळ सरकारी रुग्णालयांच्या नोंदी एकत्रित करून राष्ट्रीय आरोग्य माहिती व्यवस्था पूर्ण होणार नाही. देशातील सर्व आरोग्य संस्थांना जोडणारी, माहितीची सुरक्षित देवाणघेवाण करणारी आणि आपत्कालीन परिस्थितीतही उपलब्ध राहणारी व्यवस्था तयार करणे आवश्यक आहे. आरोग्य व्यवस्था हा राष्ट्रीय सुरक्षेचाच एक भाग आहे.
भारताने तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काहीच केलेले नाही असे म्हणणे चुकीचे ठरेल. गेल्या काही वर्षांत भारताने डिजिटल पायाभूत सुविधांमध्ये मोठी झेप घेतली आहे. याचे सर्वांत मोठे उदाहरण म्हणजे यूपीआय. आज सामान्य माणसापासून ते मोठ्या व्यापाऱ्यांपर्यंत कोट्यवधी लोक डिजिटल व्यवहारांसाठी यूपीआयचा वापर करतात. याच धर्तीवर अन्य क्षेत्रांतही काम करता येऊ शकते. आधार, डिजिलॉकर, फास्टॅग, डिजीयात्रा, आयुष्मान भारत डिजिटल मिशन आणि विविध सरकारी डिजिटल सेवा हे भारताच्या परिवर्तनातील महत्त्वाचे टप्पे आहेत. या सर्व उपक्रमांनी प्रशासन आणि सामान्यांचे जीवनमान सुलभ करण्यास मदत केली आहे.
डॉ. पिनाक दंदे
संपर्क : ९८२३०४५५३३
Read About : Peter Lynch Investment Strategy – पीटर लिंच : शेअर निवडीचे षट्सूत्र
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.