Ad Advertisement Ad Advertisement

Drought in Maharashtra – राज्यात 34 लाख भूजल पुनर्भरण संरचनांच्या निर्मितीचे उद्दिष्ट मेपर्यंत पूर्ण करणार, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती

जलयुक्त शिवार योजनेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी 18 हजार गावांची निवड

मुंबई : Drought in Maharashtra – पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरवून भूजल पातळी वाढविणे, जुन्या जलसंधारण संरचनांचे पुनरुज्जीवन करणे आणि नव्या संरचनांची निर्मिती करणे, यासाठी राज्य शासनाने व्यापक कृती आराखडा तयार केला आहे. केंद्र शासनाच्या ‘जलसंचय : जनभागीदारी अभियाना’अंतर्गत राज्यात पुढील वर्षी मेपर्यंत 34 लाख 83 हजार 940 भूजल पुनर्भरण संरचनांची निर्मिती पूर्ण करण्यात येणार आहे. यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने आणि निश्चित उद्दिष्टानुसार काम करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे जलशक्ती अभियान (जलसंचय: जनभागिदारी 3.0) राबविण्याबाबत बैठक झाली या बैठकीस ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थान येथून मुख्यमंत्री फडणवीस तर, पुणे येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे केंद्रीय जलशक्ती राज्यमंत्री राज भूषण चौधरी सहभागी झाले होते.

राज्यातील जवळपास 90 टक्के भाग दुष्काळाच्या झळा सोसत असून, पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आगामी काळात पिण्याच्या पाण्याची मागणी वाढण्याची शक्यता आहे. या संकटाचे संधीत रूपांतर करण्याच्या दृष्टीने जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य देण्यात येत आहे. जुन्या जलसाठ्यांचे पुनरुज्जीवन, तलावांची दुरुस्ती, शेततळी आणि पुनर्भरण खड्ड्यांची निर्मिती यावर विशेष भर देण्यात येत आहे, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

18 हजार गावांत जलयुक्त शिवार 3.0

राज्य शासनाची महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजना तिसऱ्या टप्प्यात राबविण्यात येणार असून, त्यासाठी 18 हजार गावांची निवड करण्यात आली आहे. जलयुक्त शिवार 3.0, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, मनरेगा तसेच इतर योजनांमधील निधी आणि कामांचे एकत्रिकरण करून जलसंधारणाची कामे अधिक प्रभावीपणे राबविण्यात येतील. या कामांचे शास्त्रीय पद्धतीने नियोजन, मॅपिंग आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. याशिवाय, पावसाळ्यात वाहणाऱ्या आणि उर्वरित काळात कोरड्या राहणाऱ्या 50 किलोमीटर किंवा त्यापेक्षा अधिक लांबीच्या नद्यांचे पुनरुज्जीवन करण्याचे कामही सुरू करण्यात आले असल्याचे फडणवीस म्हणाले.

जलसंधारणासाठी केंद्राकडे विशेष निधीची मागणी

दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर विद्यमान जलसंधारण संरचनांची दुरुस्ती, तलावांचे पुनरुज्जीवन, शेततळी आणि पुनर्भरण खड्ड्यांची निर्मिती यासाठी केंद्र शासनाकडे विशेष आर्थिक मदतीची मागणी करण्यात आली आहे. राज्याच्या दुष्काळी परिस्थितीचा विचार करून केंद्र शासनाने प्रचलित निकषांच्या पलीकडे जाऊन मदत करावी, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

जलजीवन मिशनच्या कामांना गती देणार

जलजीवन मिशनअंतर्गत निधी खर्चाचे प्रमाण अपेक्षेपेक्षा कमी असल्याचे निदर्शनास आले आहे. डिसेंबरपर्यंत निधी विनियोगाचे प्रमाण 50 टक्क्यांपर्यंत नेण्याच्या दृष्टीने आवश्यक सूचना देण्यात येतील. तसेच, योजनेची शाश्वतता राखण्यासाठी पाण्याचा खात्रीशीर स्रोत आणि वीजबिल भरणा या दोन महत्वाच्या बाबींवर लक्ष केंद्रित करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

शास्त्रीय पद्धतीला प्राधान्य द्या – सी. आर. पाटील

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या गावाचे पाणी गावात आणि शेताचे पाणी शेतात अडविण्याच्या संकल्पनेतून जलसंधारणाची कामे लोकसहभागातून राबविण्याची गरज आहे. जलसंधारणाची कामे करताना लोकसहभागाबरोबरच शास्त्रीय पद्धती आणि तांत्रिक मार्गदर्शनाला प्राधान्य द्यावे, असे केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांनी यावेळी सांगितले.

जलसंधारणाची कामे करताना योग्य आराखडे, तांत्रिक मार्गदर्शन आणि प्रशिक्षण महत्वाचे आहे. यासाठी आयआयटीसारख्या संस्थांची मदत घेऊन पावसाचे पाणी अडवून त्याचा वर्षभर उपयोग होईल, अशी व्यवस्था करण्यात यावी. तसेच स्वच्छता आणि शौचालयांची उभारणी यासारख्या विषयांवरही सातत्याने काम करण्याची आवश्यकता असल्याचेही केंद्रीय मंत्री पाटील म्हणाले.

Read About : Vibha Thakur Death Case : सासरच्या दारातच विवाहितेवर अंत्यसंस्कार; विष दिल्याचा माहेरच्यांचा आरोप

E-paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.