डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील १०१ महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना दिलासा; रक्कम थेट बँक खात्यात जमा होणार
छत्रपती संभाजीनगर : Flood Relief for Students २०२५ मधील अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे बाधित झालेल्या तालुक्यांतील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना राज्य शासनाने दिलासा दिला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील १०१ महाविद्यालयांमधील ३८ हजार ४०९ विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्काच्या परताव्यासाठी ३ कोटी १३ लाख ९१ हजार ७०३ रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. उच्च शिक्षण विभागाने हा निधी विद्यापीठाकडे वर्ग केला असून, पात्र विद्यार्थ्यांच्या थेट बँक खात्यात रक्कम जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
१०१ महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना लाभ
२०२५ मध्ये राज्याच्या विविध भागांत झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. या नैसर्गिक आपत्तीचा फटका शेतीसह नागरिकांच्या दैनंदिन जीवनाला बसला. पूरग्रस्त कुटुंबांतील विद्यार्थ्यांवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी राज्य शासनाने पूर घोषित केलेल्या तालुक्यांतील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफीचा निर्णय घेतला होता.
या निर्णयानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील १०१ महाविद्यालयांमधील ३८ हजार ४०९ विद्यार्थी या योजनेसाठी पात्र ठरले आहेत. विद्यार्थ्यांनी भरलेल्या परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती करण्यासाठी आता शासनाने निधी मंजूर केला आहे.
तीन कोटींहून अधिक निधी मंजूर
परीक्षा शुल्काच्या परताव्यासाठी एकूण ३ कोटी १३ लाख ९१ हजार ७०३ रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. हा निधी महाविद्यालयांमार्फत वितरित करण्याऐवजी विद्यापीठाकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे पात्र विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षा शुल्काची रक्कम थेट मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
थेट बँक खात्यात जमा होणार रक्कम
उच्च शिक्षण विभागाने विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ. प्रवीण वक्ते यांना पत्र पाठवून निधी वितरणाबाबत सूचना दिल्या आहेत. मंजूर रक्कम पात्र विद्यार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करावी, तसेच निधीच्या विनियोगाचे उपयोगिता प्रमाणपत्र आणि संबंधित अहवाल विभागाकडे सादर करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.
पूरपरिस्थितीमुळे आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या कुटुंबांतील विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय दिलासादायक ठरणार आहे. मात्र, विद्यार्थ्यांच्या खात्यात प्रत्यक्ष रक्कम जमा होण्याची तारीख आणि वितरणाची प्रक्रिया याबाबत अधिकृत तपशील समोर आल्यानंतर लाभार्थ्यांना पुढील माहिती मिळू शकेल.
Read About : MPhil BARTI Fellowship PhD Admission एम.फिल; बार्टी फेलोशिपवर थेट पीएच.डी. प्रवेशाचा हक्क नाही
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.