२०३०-३१ पासून पहिलीसाठी सहा वर्षे पूर्ण असणे आवश्यक
Maharashtra School Admission Age Rules मुंबई : शालेय शिक्षण विभागामार्फत शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित करण्याबाबत नवीन शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे. या निर्णयानुसार नर्सरीपासून इयत्ता पहिलीपर्यंतच्या प्रवेशासाठी वयाचे निकष टप्प्याटप्प्याने लागू करण्यात येणार आहेत. त्यानुसार शैक्षणिक वर्ष २०३०-३१ पासून इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेणाऱ्या बालकाचे वय ३० जून रोजी सहा वर्षे पूर्ण असणे आवश्यक राहणार आहे.
नव्या निर्णयानुसार, शैक्षणिक वर्ष २०२७-२८ पासून बालवाटिका-१ अर्थात नर्सरीमध्ये प्रवेशासाठी बालकाचे वय ३० जून रोजी तीन वर्षे पूर्ण असणे आवश्यक असेल. त्यानंतर २०२८-२९ पासून बालवाटिका-२ अर्थात ज्युनियर केजीसाठी चार वर्षे, तर २०२९-३० पासून बालवाटिका-३ अर्थात सीनिअर केजीसाठी पाच वर्षे पूर्ण असणे आवश्यक राहील. अखेरीस २०३०-३१ पासून इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी सहा वर्षांचा निकष लागू केला जाणार आहे.
दरम्यान, शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये नर्सरीपासून इयत्ता पहिलीपर्यंत प्रवेश घेतलेल्या किंवा या वर्गांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना हे नवीन वयाचे निकष लागू होणार नाहीत. त्यामुळे सध्या शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत पालकांना दिलासा मिळणार आहे.
वयात १५ दिवसांची सवलत
प्रवेश प्रक्रियेत वयाच्या निकषांमुळे अडचण निर्माण होऊ नये, यासाठी शाळाप्रमुखांच्या स्तरावर किमान आणि कमाल १५ दिवसांची वयाची सवलत देण्याची तरतूद करण्यात आली आहे. ही सवलत नर्सरीपासून इयत्ता पहिलीपर्यंतच्या प्रवेशासाठी लागू असेल.
तसेच, मान्यताप्राप्त शाळेतून मागील वर्ग उत्तीर्ण होऊन पुढील वर्गात जाणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांना वयानुसार नव्या निकषांची अट लागू करण्यापासून सूट देण्यात येणार आहे. त्यामुळे आधीच शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या पुढील वर्गातील प्रवेशात अडथळे निर्माण होणार नाहीत.
सविस्तर मार्गदर्शक सूचना लवकरच
नवीन वयाच्या निकषांनुसार विद्यार्थ्यांचे प्रवेश कसे करावेत, याबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडून जारी करण्यात येणार आहेत. या सूचनांनंतर प्रवेश प्रक्रियेची अंमलबजावणी अधिक स्पष्ट होईल. नव्या नियमांमुळे पूर्व-प्राथमिक शिक्षणापासून पहिलीपर्यंतच्या प्रवेशासाठी वयाची एकसमान चौकट टप्प्याटप्प्याने निश्चित होणार आहे.
Read About : ऐन दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा, मागण्या पूर्ण न झाल्यास ६ नोव्हेंबरपासून राज्यव्यापी आंदोलन
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.