तिन्ही प्रकल्प मार्च २०२८ पर्यंत कार्यान्वित करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट
छत्रपती संभाजीनगर : GPIL Investment in Bidkin दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉरअंतर्गत विकसित होत असलेल्या ऑरिकच्या बिडकीन औद्योगिक क्षेत्रात गुंतवणुकीचा ओघ वाढत आहे. गोदावरी पॉवर अँड इस्पात लिमिटेडने (जीपीआयएल) येथे एकूण १,३३५ कोटी रुपयांच्या तीन प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. यामध्ये बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टिम (बीईएसएस), कोल्ड रोलिंग मिल आणि कंटेनर निर्मिती प्रकल्पाचा समावेश आहे. तिन्ही प्रकल्प मार्च २०२८ पर्यंत कार्यान्वित करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. या गुंतवणुकीमुळे बिडकीन औद्योगिक क्षेत्रात ऊर्जा साठवणूक, धातू प्रक्रिया आणि कंटेनर निर्मिती अशा विविध औद्योगिक क्षेत्रांचा विस्तार होण्यास मदत होणार आहे.
कंपनीच्या संचालक मंडळाने १३ नोव्हेंबर २०२६ रोजी झालेल्या बैठकीत या गुंतवणुकीस मंजुरी दिली. त्यानुसार कंपनीची उपकंपनी गोदावरी न्यू एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून १३५ कोटी रुपयांची गुंतवणूक करून तीन गिगावॅट अवर (जीव्हीएच) क्षमतेचा बॅटरी एनर्जी स्टोरेज प्रकल्प उभारण्यात येणार आहे. व्यावसायिक आणि औद्योगिक क्षेत्रातील ऊर्जासाठ्याची गरज पूर्ण करण्यासाठी हा प्रकल्प विकसित केला जाणार आहे. सध्या सुरू असलेल्या बीईएसएस प्रकल्पाच्या शेजारीच हा नवीन प्रकल्प उभारण्यात येणार असून, मार्च २०२८ पर्यंत तो कार्यान्वित करण्याचे नियोजन आहे
१,१०० कोटींची कोल्ड रोलिंग मिल
कंपनीने छत्तीसगडमधील टिळ्डा येथील सरोरा गावात प्रस्तावित केलेला १,१०० कोटी रुपयांचा कोल्ड रोलिंग मिल (सीआरएम) प्रकल्प आता बिडकीन येथे स्थलांतरित करण्यास मंजुरी दिली आहे. या सुधारित प्रकल्प खर्चामध्ये जमीन संपादन आणि खेळत्या भांडवलासाठीची तरतूद यांचाही समावेश आहे. या प्रकल्पामुळे बिडकीन औद्योगिक क्षेत्रातील उत्पादन उद्योगाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
१० हजार कंटेनर निर्मितीची क्षमता
याशिवाय १०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून कंटेनर निर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पात दरवर्षी १० हजार २० फूट क्षमतेचे कंटेनर आणि १२ हजार लहान कॅबिनेट तयार केले जाणार आहेत. बॅटरी स्टोरेज आणि सागरी वाहतूक क्षेत्रातील गरजा पूर्ण करण्यासाठी या उत्पादनांचा उपयोग होईल. हा प्रकल्पही कोल्ड रोलिंग मिलच्या शेजारी उभारण्यात येणार आहे.
Read About : Global M&A – जागतिक विलीनीकरण – खरेदी व्यवहारांना मोठा फटका; तिसऱ्या तिमाहीत व्यवहारमूल्य 36.9 टक्क्यांनी घटले
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.