Ad Advertisement Ad Advertisement

India vs New Zealand ODI series- एकदिवसीय मालिका बरोबरीत सुटणार

भारतीय संघातील बदलाचा न्यूझीलंडला फायदा होईल; चेतेश्वर पुजाराची भविष्यवाणी

नवी दिल्ली : India vs New Zealand ODI series : भारत आणि न्यूझीलंड संघात टी-२० मालिकेनंतर बुधवारपासून पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेचा रोमांच अनुभवण्यास मिळेल. उभय संघातील फलंदाजांकडून टी-२० मालिकेत चौकार आणि षटकारांची आतषबाजी पाहण्यास मिळाली आणि त्याचाच पुढील अंक एकदिवसीय प्रकारात पाहण्यास मिळेल. मात्र, भारताचा माजी कसोटीपटू चेतेश्वर पुजाराने एकदिवसीय मालिका २-२ अशी बरोबरीत सुटेल, अशी भविष्यवाणी केली आहे. तसेच भारतीय संघातील बदलाचा न्यूझीलंडला किंचित फायदा होईल, असे पुजाराला वाटते.

कर्णधार शुभमन गिल, रोहित शर्मा, विराट कोहलीसोबत एकदिवसीय प्रकारात खेळणारे खेळाडू टी-२० मालिका सुरू असतानाच न्यूझीलंडमध्ये दाखल झाले होते. परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी त्यांनी टी-२० संघासोबत सराव केला. एकदिवसीय मालिकेत रोहित आणि विराटच्या उपस्थितीमुळे भारताचे पारडे जड मानले जात आहे. मात्र, भारताकडून कसोटी खेळणाऱ्या पुजाराचे मत वेगळे आहे. पुजाराने मालिका बरोबरीत सुटण्याचे भाकित करताना मालिकेतील किमान एक सामना पावसामुळे रद्द होऊ शकतो, असे म्हटले आहे. १९ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेची पूर्वतयारी म्हणून एकदिवसीय मालिकेतील अखेरच्या दोन सामन्यांमध्ये कर्णधार शुभमन गिल आणि उपकर्णधार केएल राहुल उपलब्ध नसतील.

प्रसारणकर्त्यांसोबत संवाद साधताना पुजारा म्हणाला, ‘मालिकेचा निकाल २-२ असा बरोबरीत लागू शकतो. पहिल्या तीन सामन्यांमध्ये नियमित संघ असेल. मात्र, अखेरच्या दोन सामन्यांमध्ये नियमित कर्णधार व उप कर्णधार उपलब्ध नसतील. त्यामुळे, मला वाटते की, या बदलाचा किंचित फायदा न्यूझीलंडला होईल.’ आपले म्हणणे पटवून देताना पुजारा पुढे म्हणतो की, ‘पहिल्या तीन सामन्यांमध्ये भारतीय संघाचे पारडे जड असेल, पण शेवटचे दोन सामने थोडे आव्हानात्मक असू शकतात. दोन्ही संघांमध्ये अटीतटीची लढत अपेक्षित आहे. शिवाय, न्यूझीलंडमध्ये वारंवार पाऊस पडतो, त्यामुळे एक सामना पावसामुळे रद्द होऊ शकतो.’

कोहली सर्वाधिक शतके झळकावेल

मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यापैकी कोण जास्त शतके करू शकेल, असेही पुजाराला विचारण्यात आले. या माजी कसोटी तज्ज्ञाने सांगितले की, त्याच्या मते कोहली जास्त शतके झळकावेल. रोहित शर्मा पॉवरप्लेमध्ये चांगली सुरुवात करून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. तथापि, न्यूझीलंडमध्ये त्याची भूमिका बदलण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास, तो शतक करू शकतो. तथापि, विराटच्या संधी थोड्या जास्त आहेत. कारण, तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करतो. त्याची मुख्य भूमिका खेळ सुलभ करण्याची असेल.

तिसरा क्रमांक योग्य

पुजारा पुढे म्हणाला, ‘एकदिवसीय प्रकारात तिसऱ्या क्रमांकावरील फलंदाजासाठी शतकीय खेळी उभारणे थोडे सोपे असते. सलामीवीराची भूमिकाही निश्चित असते, पण न्यूझीलंडमधील परिस्थितीत ती थोडी बदलते. त्यामुळे मला वाटते की, न्यूझीलंडमध्ये शतक झळकावण्याची विराटची संधी रोहितपेक्षा चांगली आहे.

चॅपमन आणि रवींद्र ‘आऊट’ ; निकोल्स आणि सीफर्ट ‘इन’

ऑकलंड : मार्क चॅपमन आणि रचिन रवींद्र अद्याप दुखापतीमधून सावरले नसल्यामुळे एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी उपलब्ध नसतील. चॅपमन हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीतून सावरत आहे, तर रवींद्र अद्याप त्याच्या खांद्याच्या दुखापतीतून सावरलेला नाही. न्यूझीलंड क्रिकेटने (एनसी) एका निवेदनात म्हटले आहे की, ‘एमआरआयमध्ये असे दिसून आले आहे की, चॅपमनला त्याच्या डाव्या हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीतून पूर्णपणे बरे होण्यासाठी दोन आठवड्यांची आवश्यकता आहे, तर रवींद्र सध्या उजव्या खांद्याच्या दुखापतीमुळे पूर्ण क्षमतेने क्षेत्ररक्षण करू शकत नाही. चॅपमन, रवींद्र या दोघांना वगळल्यामुळे, चौथ्या आणि पाचव्या एकदिवसीय सामन्यांसाठी निवड झालेला टिम सीफर्ट आता संपूर्ण मालिकेसाठी उपलब्ध असेल, तर हेन्री निकोल्स पहिल्या तीन सामन्यांमध्ये खेळेल. आणखी एक खेळाडू डीन फॉक्सक्रॉफ्टचा मालिकेतील चौथ्या आणि पाचव्या सामन्यांसाठी संघात समावेश करण्यात आला आहे.

Read About : National Under 14 Tennis Champion- राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत महाराष्ट्राच्या मायरा शेखचा दुहेरी मुकुट

E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.