Indravati River : मागील दोन दशके आदिवासी व वन यांचे नाते जाणून घेण्याच्या ओढीने प्रवास सुरू आहे. मध्य भारतातील बस्तर भूमंडळात अनेकदा जाणे झाले. आजही बस्तरची ओढ अस्वस्थ करते. त्या मागील कारणे पण खास आहेत. मध्य भारतातील वनसंपदा व तिच्यासोबत जगणारे आदिवासी बांधव यांचे अद्वैत केवळ अद्भुतच…!
बस्तरच्या भूभागातील नैसर्गिक घटक व त्यांचे वैविध्य विलक्षण आहे. येथील जैव-सांस्कृतिक परंपरा वारंवार अनुभवावी अशीच आहे. प्रेमळ आदिवासी, त्यांचे जंगलाशी असणारे आदिम नाते, देवरायांसारखी लोकसंवर्धन परंपरा (Community Conserved Tradition) आजही टिकून आहे. इथल्या निर्मळ बस्तरीया हवेतील थंडावा, मोह मद्य महुली, पारंपरिक खाद्य-पदार्थ हे सारे अवीट आहे. या भूमीत खऱ्या अर्थाने जन-वन-स्वयंभ एक असल्याची प्रचीती येते.
बस्तरमध्ये पहिल्यांदा गेलो ते २००८ साली. जगदलपूर येथील ज्येष्ठ मित्र अर्जुन नाग यांच्या आग्रहाने. त्यांच्या मुलीच्या लग्नाला. हलबा आदिवासी समाजातील ते पहिले वकील. दुर्गम भागातील आदिवासी बांधवांविषयी नाग वकिलांना पराकोटीचे प्रेम आहे. बस्तरच्या पहिल्या भेटीत नागजींनी लग्नसमारंभ आटोपल्यावर चार दिवस मुक्कामी ठेवून घेतले. सोबत वन व आदिवासी विषयाचे विद्यार्थी मित्रवर्य मधू रामनाथ पण होते. यांनी बस्तर शब्दाचा सुरेख अर्थ सांगितला. बस्ता म्हणजे बांबू. विपुल प्रमाणात बांबू देणारी भूमी म्हणजे बस्तर. भटकंतीत जुन्या बस्तर जिल्ह्यातील त्यांचे जन्मगाव व सभोवतालचे जंगल दाखवले. नक्षलवाद, माओवादाचा प्रभाव, सरकारी उपाययोजना व त्यातून वाढणारी गुंतागुंत, हे कथन करताना दोघेही अस्वस्थ होताना पाहिले.
आदिवासी कसा पिचला जात आहे, हेही प्रत्यक्षात अनुभवले. या भेटीचे मुख्य आकर्षण ठरले ते इंद्रावती नदीचे दर्शन व तिच्यावरील भव्यदिव्य असा चित्रकुट धबधबा. यातून इंद्रावतीविषयी एक वेगळेच गहिरे नाते निर्माण झाले. पुढे अनेकदा बस्तरला गेलो. कधी एकटा तर कधी सह्याद्रीतील आदिवासी मित्रांसोबत. दरवेळी इंद्रावतीला भेटून आलो. महाराष्ट्रातून गडचिरोली सिरोंचा मार्गे बस्तरला जाताना वाटेत छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवरील सोमनूर गावी जाऊन खास गोदावरी-इंद्रावतीचा संगम न्याहाळला. आग्ऱ्याच्या सुटकेनंतर शिवाजी महाराज उत्तरेतून खाली उतरले व इंद्रावतीच्या काठाने व पुढे गोदाकाठाने महाराष्ट्रात परतले, असे अभ्यासक सांगतात.
बस्तर हा तसा वैशिष्ट्यपूर्ण प्रदेश आहे. द्वीपकल्पीय पठाराने व्यापलेला. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओरिसा या राज्यांच्या सीमा बस्तरला भिडतात. समुद्रसपाटीपासून बस्तर २८४ ते अगदी १२०० मीटर उंचीवर आहे. स्फटिकासारखे दिसणारे खडक (Crystalline rocks) हे येथील प्रमुख भू-वैशिष्ट्य. चित्रकूट प्रपाताच्या जागी हे खडक पहायला मिळतात. गोदावरीच्या उपनद्या असणाऱ्या इंद्रावती व सबरी या बस्तरच्या जीवनदायिनी आहेत. आबुजमाड, माल्यवंत पर्वतरांगांनी वेढलेल्या बस्तरमध्ये उष्णकटिबंधीय वनसंपदा विपुल आहे व त्याच बरोबर लोह खनिजसाठे पण. माडिया, मुरिया, दूर्वा, हळबा असे सहा-सात प्रकारचे आदिवासी समुदाय आपली संस्कृती टिकवून आहेत. त्यांच्या राहणीमानातून व जीवनशैलीतून ती प्रतीत होते. वेशभूषा, भाषा, खाद्यपदार्थ, मोहाच्या झाडाचा जन्मापासून ते मृत्यूपर्यंत नानाविध प्रकारे वापर व येथील जंगलातील बांबू प्रसिद्ध आहे.
ओरिसा हे इंद्रावतीचे माहेर. कालाहंडी जिल्ह्यात पूर्वघाटाच्या रांगेत मार्दीगुडा गावी तिचा उगम होतो. येथील घनदाट अरण्यात तीन धारांच्या रूपात इंद्रावती प्रकट होते. पुढे ती बस्तरच्या पठारावरून दक्षिणेकडे जगदलपूर दंतेवाडा जिल्ह्यातून वाहत जाते व पुढे महाराष्ट्र-तेलंगणा सीमेजवळ गोदावरी नदीला मिळते. वाटेत तिला केशधारा, कांदबिंधा, चंद्रगिरी, गोलागर, पोरागड, कापूर, मुरान, बांगिरी, तेलंगी, पार्लिजोरी, तुरी, चौरीजोरी असे असंख्य ओढे-नाले मिळतात. मोरांग, पदरीकुंडीजोरी, जौरा या नद्या तिला मिळतात. इंद्रावतीच्या उजव्या काठावरील महत्त्वाच्या उपनद्यामध्ये भास्केल, बोर्डिंग, नारंगी, निंब्रा (पर्लकोटा), कोत्री आणि बांदिया यांचा समावेश होतो. नंदीराज ही डाव्या तीराची एक महत्त्वपूर्ण उपनदी आहे. जंगली म्हशींसाठी प्रसिद्ध असणारे इंद्रावती राष्ट्रीय उद्यान वन्यजीव अभ्यासकांचे नंदनवन आहे.
इंद्रावतीचा प्रवाह ५३५ किलोमीटरपेक्षा अधिक आहे. तिचे पाणलोट क्षेत्र अबुजमाडच्या पर्वतमालांनी प्रभावित आहे. ते तीन राज्यात विभागले गेले आहे. त्याचे एकूण क्षेत्रफळ सुमारे ४२६५५ चौरस किलोमीटर इतके आहे.
इंद्रावती नदीच्या निर्मितीमागे अनेक पौराणिक लोककथा आहेत. एके काळी हा परिसर चंपा-चंदनाने भरलेला होता. अशा या सुगंधी ठिकाणी भगवान इंद्र आणि इंद्राणी काही काळ येथे राहण्यासाठी आले. जंगलात फिरत असताना इंद्र सुनाबेदा नावाच्या एका लहानशा गावात पोहोचले. जिथे त्यांची भेट उदंती नावाच्या एका सुंदर तरुणीशी झाली. पहिल्याच भेटीत ते एकमेकांच्या प्रेमात पडले. इंद्राणी एकटी पडली व दु:खी झाली. लोकांना तिने आपले दु:ख सांगितले. त्यांनी तिला तिथेच राहण्याचा सल्ला दिला. इंद्राणी इंद्रावर संतापली आणि तिने इंद्र व उदंतीचा अपमान केला. इंद्राणीच्या अश्रूतून इंद्रावती नदीची निर्मिती झाली. अशा या पौराणिक लोककथा आजही बस्तरच्या मातीत ऐकायला मिळतात. आदिवासी आपल्या लोकगीतात पण इंद्रावतीची महती गातात.
दरवर्षी जुलै महिन्यात इंद्रावती काठी ‘पुरवानी-उत्सव’ साजरा होतो. नदीला पहिला पूर आला की, तिला शांत करण्यासाठी हा उत्सव साजरा होतो, याविषयी आबुजमाडमधील आदिवासी कार्यकर्त्या जया ध्रुव अत्यंत आपुलकीने माहिती देतात. या दिवशी नदीला होडी व नावाडी (घाटणी) यांची सोन्याची मूर्ती अर्पण करण्याचा प्रघात आहे. लहान खेडे गावातील लोक बांबूच्या मूर्ती अर्पण करतात. नदीकाठचे लोक गरीब असो वा श्रीमंत पण त्यांच्या श्रद्धा समान असतात. हा उत्सव नाही केला तर नदी रागावते व नुकसान करते, अशी स्थानिकांची भावना आहे.
विजय सांबरे
vijaysambare@gmail.com
Read About : 70 TMC river linking project छत्रपती संभाजीनगरात मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; ७० टीएमसीचा नदीजोड प्रकल्प सात वर्षांत पूर्ण करणार
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.