JAXA च्या महत्त्वाकांक्षी मोहिमेत फोबोसवरील नमुने गोळा करण्याचे उद्दिष्ट; H3 रॉकेटमधून प्रक्षेपण, २०३१ मध्ये नमुने पृथ्वीवर परतण्याची अपेक्षा.
टोकियो : Japan MMX Mission मंगळाच्या रहस्यमय चंद्रांची निर्मिती आणि रचना समजून घेण्यासाठी जपानची अंतराळ संस्था ‘जेएएक्सए’ ‘मार्टियन मून एक्सप्लोरेशन’ (एमएमएक्स) ही महत्त्वाकांक्षी मोहीम राबवत आहे. या अंतराळ यानाचे प्रक्षेपण जपानच्या स्थानिक वेळेनुसार २० ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे ४.४१ वाजता (भारतीय वेळ पहाटे सुमारे १ वाजता) होणार आहे. हे यान मंगळाच्या चंद्रावरून पृथ्वीवर २०३१ मध्ये परतणार असून सोबत तेथील माती आणणार आहे.
एच-३ रॉकेटद्वारे तानेगाशिमा अंतराळ केंद्रातून हे यान झेपावणार आहे. मंगळाला फोबोस आणि डिमोस असे दोन चंद्र आहेत. हे चंद्र लघुग्रह मंगळाच्या गुरुत्वाकर्षणात अडकल्यामुळे तयार झाले की मंगळावर झालेल्या प्रचंड धडकेनंतर बाहेर फेकल्या गेलेल्या पदार्थातून त्यांची निर्मिती झाली, याबाबत शास्त्रज्ञांमध्ये अजूनही संभ्रम आहे. फोबोसवरील नमुने पृथ्वीवर आणल्यास या प्रश्नांची उत्तरे मिळण्यास मदत होऊ शकते.
‘आयडेफिक्स’ रोव्हर करणार पृष्ठभागाचा अभ्यास
एमएमएक्स प्रथम फोबोसचा दूरून अभ्यास करेल. त्यानंतर २५ किलो वजनाचा ‘आयडेफिक्स’ रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवला जाईल. तो तेथील मातीची रचना आणि पोत तपासेल. फोबोसवरील गुरुत्वाकर्षण अत्यंत कमी असल्यामुळे या रोव्हरचे वजन तिथे केवळ सुमारे १५ ग्रॅमइतके असेल. मोहिमेत एकूण ११ वैज्ञानिक उपकरणे आहेत.
२०३१ मध्ये पृथ्वीवर येणार नमुने
मोहिमेचे यान ऑगस्ट २०२७ मध्ये मंगळाजवळ पोहोचण्याची, तर सप्टेंबरपासून फोबोसचा अभ्यास सुरू करण्याची अपेक्षा आहे. २०२९ च्या सुरुवातीला रोव्हर सोडला जाईल. २०३० मध्ये मुख्य यान फोबोसवर उतरून नमुने गोळा करेल. किमान १० ग्रॅम पदार्थ असलेली कॅप्सूल २०३१ मध्ये पृथ्वीवर परत येईल. ती ऑस्ट्रेलियात उतरवल्यानंतर नमुने जपानमध्ये नेले जातील.
या मोहिमेत अमेरिका, फ्रान्स, जर्मनी आणि युरोपियन अंतराळ संस्थेचेही सहकार्य आहे. नमुन्यांचा अभ्यास केल्याने मंगळाच्या इतिहासासह सौरमालेच्या निर्मितीविषयी नवी माहिती मिळण्याची अपेक्षा आहे.
Read About: Orbital refueling technology in India – आता अंतराळात फिरता ‘इंधन पंप’!
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.