मारेकऱ्याशी ३०० हून अधिक फोन कॉल; मालमत्ता आणि २० लाखांच्या कर्जातून सुटका करण्यासाठी कट रचल्याचा पोलिसांचा दावा
कानपूर – Kanpur Murder Case उत्तर प्रदेशातील कानपूरमधील नामांकित औषध व्यावसायिक विनीत मिनोचा (वय ६३) यांच्या राहत्या घरात झालेल्या निर्घृण हत्या प्रकरणाला एक धक्कादायक आणि खळबळजनक वळण मिळाले आहे. या हत्येचा खरा सूत्रधार दुसरा कोणी नसून त्यांचा स्वतःचा मुलगा सुब्रत मिनोचा (वय ३२) असल्याचे तपासात उघड झाले आहे. सुब्रतनेच वडिलांच्या हत्येसाठी मारेकऱ्यांना ६ लाख रुपयांची सुपारी दिली होती. इतकेच नव्हे, तर पोलिसांनी अटक केल्यास स्वतःचा बचाव करण्यासाठी मारेकऱ्यांना ‘बायकोचे (सून शालू) नाव घ्या’ अशी धक्कादायक सूचनाही त्याने दिली होती, अशी माहिती पोलीस चौकशीत समोर आली आहे.
५ सप्टेंबरच्या रात्री नक्की काय घडले?
कल्याणपूर परिसरातील उच्चभ्रू ‘रतन ऑर्बिट’ सोसायटीत राहणारे विनीत मिनोचा यांचा बिरहाना मार्गावर औषधांचा मोठा व्यवसाय आहे. ५ सप्टेंबर २०२६ च्या रात्री त्यांचा मुलगा सुब्रत, सून शालू आणि त्यांचा पाच वर्षांचा नातू टिळक नगरमधील एका लाऊंजमध्ये ‘किट्टी पार्टी’साठी गेले होते. रात्री पावणेअकराच्या सुमारास विनीत मिनोचा घरी परतले. जेवण आटोपून झोपायला जात असताना त्यांना मुलाच्या खोलीचा दरवाजा अर्धवट उघडा दिसला. त्यांनी आत डोकावून पाहिले असता तेथे दोन अनोल्खी तरुण उभे होते. विनीत यांनी खोलीतील लाईट लावताच दोघांपैकी एकाला त्यांनी ओळखले. ते काही बोलणार इतक्यात त्या दोघा मारेकऱ्यांनी विनीत यांच्यावर चाकूने तब्बल २६ वार केले आणि तेथून पळ काढला.
सून शालूची अटक आणि कथानकातील ट्विस्ट
घटनेनंतर पोलिसांनी जलद गतीने तपास चक्र फिरवून विशाल गौतम नावाच्या मारेकऱ्याला अटक केली. विशालने सुरुवातीला पोलिसांना सांगितले की, विनीत यांची सून शालू हिने सासऱ्याच्या खुनासाठी ६ लाख रुपयांची सुपारी दिली होती. सासरे आपल्या वैयक्तिक स्वातंत्र्याच्या आड येत असल्यामुळे आपण हे पाऊल उचलल्याचे शालूने सुरुवातीला पोलिसांना सांगितले, ज्यामुळे पोलिसांनी तिला अटक केली. या सुरुवातीच्या काळात सुब्रतने आपल्याला काहीच माहित नसल्याचा आव आणला आणि संपूर्ण दोष आपल्या पत्नीवरच ढकलला होता.
मात्र, पोलिसांनी जेव्हा सुब्रत आणि मारेकरी विशाल गौतम यांचे कॉल डिटेल्स तपासले, तेव्हा त्यांच्यात ३०० हून अधिक वेळा फोनवरून संभाषण झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. या तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलीस आयुक्त रघुबीर लाल यांनी सुब्रतची कडक चौकशी केली, तेव्हा सुब्रतने आपला गुन्हा कबूल केला.
मालमत्ता आणि २० लाखांचे कर्ज
प्राथमिक तपासानुसार, या हत्येमागे मालमत्तेचा वाद आणि आर्थिक चणचण ही मुख्य कारणे होती. सुब्रतला अशी भीती होती की, त्याचे वडील विनीत मिनोचा हे आपली कोट्यवधींची मालमत्ता दुसऱ्या एका महिलेच्या नावावर करणार आहेत, ज्या महिलेसोबत विनीत यांचे कथित संबंध होते. त्यातच सुब्रतवर २० लाख रुपयांपेक्षा अधिकचे कर्ज झाले होते, ज्याचा बोजा तो सहन करू शकत नव्हता. वडिलांच्या मृत्यूनंतर सर्व मालमत्ता आपल्याला मिळेल आणि कर्जातून मुक्ती होईल, या आमिषाने सुब्रतने हा क्रूर कट रचला.
गुन्ह्याची कबुली आणि पुढील तपास
सुब्रतने पोलिसांना सांगितले की, सुरुवातीला विशालने शालूचे नाव घेतल्यामुळे त्याची अटक टळली होती. मात्र, निष्पाप शालू या प्रकरणात अडकल्यामुळे त्याला अपराधीपणाची भावना वाटू लागली आणि कारवाईचा फास आपल्या गळ्याशी येत असल्याची खात्री पटल्यानंतर त्याने स्वतःहून गुन्ह्याची कबुली दिली. कानपूर पोलीस सध्या सुब्रत, शालू आणि मारेकरी विशाल गौतम यांच्या जबाबांची तुलना सीसीटीव्ही फुटेज, कॉल रेकॉर्ड्स आणि इतर परिस्थितीजन्य पुराव्यांशी करत आहेत. सुब्रतच्या कबुलीनंतरही पोलिसांनी अद्याप शालूला पूर्णपणे निर्दोष ठरवलेले नसून, या कटात तिची नेमकी भूमिका काय होती, याचा सखोल तपास सुरू आहे.
Read About : EFICYENT Cross-Border Payments : आंतरराष्ट्रीय व्यवहारांत 10 अब्ज डॉलरचा टप्पा पार
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.