Karnataka Dinner Diplomacy : गंगा या पवित्र नदीचं नाव देण्यात आलेल्या कर्नाटकातल्या मुख्यमंत्र्यांच्या नव्या बंगल्यांची चर्चा सध्या भलतीच रंगली आहे. पदावर असताना देण्यात आलेला ‘कावेरी’ हा शासकीय बंगला माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अजून सोडलेला नाही. केवळ या एकाच कारणामुळं नव्हे; तर नवे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना दुुसरा ‘अनुग्रह’ हा मुख्यमंत्र्यांचं अधिकृत निवासस्थान म्हणूनच बांधलेला बंगला नको होता. मग त्यांनी या प्रकरणाला गतिमान कारभाराचा मुलामा दिला आणि त्यासाठी दुसरा मोठा बंगला हवा असं जाहीर केलं. वास्तविक त्यांनी एक बंगला आधीच हेरून ठेवलेला होता. मग काय? कर्नाटक सरकारनं ‘गतिमान कारभारा’चा नमुना म्हणून या १६ नोव्हेंबरला आदेश काढून ‘अनुग्रह’ बंगल्याजवळच्याच ‘कुमारकृपा’ या अतिथिगृहाचं नाव ‘गंगा’ असं बदललं आणि यापुढं ते मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान राहील असं जाहीर केलं. गेल्या ३ जूनला मुख्यमंत्रिपदाची सूत्रं स्वीकारल्यानंतर शिवकुमार हे सदाशिवनगर इथल्या खासगी निवासस्थानातूनच कामकाज पाहत होते. १६ नोव्हेंबरला विधिवत गृहप्रवेश करून १९ नोव्हेंबरपासून मुख्यमंत्र्यांनी नव्या बंगल्यातून कामकाज सुरू केलं आहे.
खरं म्हणजे कुमारकृपा रस्त्यावर असलेला ‘अनुग्रह’ हा बंगला वास्तुदोष आणि राजकीय अपशकुनाच्या समजुतींमुळं अनेक वर्ष रिकामाच आहे. ‘अनुग्रह’मध्ये राहणाऱ्या मुख्यमंत्र्यांना कार्यकाळ पूर्ण करता येत नाही किंवा त्यांना सत्ता गमवावी लागते, अशी एक समजूत कर्नाटकच्या राजकारणात रूढ झाली आहे. १९९० च्या दशकापासून जे. एच. पटेल, धरम सिंग आणि एच. डी. कुमारस्वामी या मुख्यमंत्र्यांनी तिथं वास्तव्य केलं; परंतु त्यांना काही ना काही कारणामुळं मुदतीपूर्वीच पद सोडावं लागलं होतं. केवळ एस. एम. कृष्णा यांनीच इथं राहून कार्यकाळ पूर्ण केला होता; मात्र २००४ च्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाला पराभव स्वीकारावा लागला होता. या भीतीमुळं बी. एस. येडियुरप्पा, सिद्धरामय्या आणि बसवराज बोम्मई यांनी या बंगल्यात राहणं टाळलं होतं. ‘अनुग्रह’ बंगल्याला शिवकुमार यांनी नकार दिला, त्याचं कारण हे असं होतं. ‘कुमारकृपा’ अतिथिगृहाला ऐतिहासिक वारसा स्थळाचा दर्जा असल्यानं या वास्तूची निवड केल्यानं मुख्यमंत्र्यांना सध्या टीकेचा सामना करावा लागतो आहे.
१८५६ मध्ये बांधण्यात आलेल्या ‘कुमारकृपा’ या वास्तूत तेव्हाच्या म्हैसूर संस्थानचे दिवाण सर कुमारपुरम शेषाद्री अय्यर हे राहत असत. १८८३ ते १९०१ असा त्यांचा १८ वर्षांचा कार्यकाळ म्हैसूर आणि बंगळुरू यांच्या आधुनिकीकरणाचा सुवर्णकाळ मानला जातो. आशियातला पहिला मोठा शिवनसमुद्र जलविद्युत प्रकल्प, वाणी विलास सागर धरण, प्रसिद्ध ग्लास हाऊस आणि व्हिक्टोरिया हॉस्पिटल यांची उभारणी त्यांंनी केली. म्हैसूरमधल्या रेल्वे मार्गांचा विस्तार, कोलार गोल्ड फील्ड्सचा विकास हेही त्यांच्याच कारकिर्दीत झालं. भारतीय विज्ञान संस्थेसाठी त्यांंनी बंगळुरूमध्ये ३७२ एकर जमीन मिळवून दिली. प्राचीन संस्कृत हस्तलिखितं जतन करण्यासाठी त्यांनी म्हैसूर इथं ओरिएंटल मॅन्युस्क्रप्टि्स लायब्ररी सुरू केली; तसंच ऐतिहासिक वास्तूंच्या अभ्यासासाठी १८९० मध्ये म्हैसूर पुरातत्व सर्वेक्षण विभागाची स्थापना केली. अशा अतिशय कर्तबगार व्यक्तीच्या निवासस्थानामुळं या अतिथिगृहाला पूर्वीच ‘ऐतिहासिक वारसा स्थळा’चा दर्जा मिळाला आहे.
कर्नाटकात सध्या काँग्रेसचं सरकार आहे. विरोधात असलेले भारतीय जनता पक्ष आणि धर्मनिरपेक्ष जनता दल यांनी म्हटलं आहे की, अशा ऐतिहासिक वास्तूचं रूपांतर केवळ वैयक्तिक आग्रहासाठी ‘होम-ऑफिस’मध्ये करणं अयोग्य आहे. राज्यापुढं अनेेक आर्थिक आव्हानं असताना मुख्यमंत्र्यांनी आपल्या अधिकृत निवासस्थानाच्या नूतनीकरणावर आणि सजावटीवर सरकारी तिजोरीतून अवाजवी खर्च केला आहे; मात्र मुख्यमंत्र्यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी म्हटलं आहे की, बंगल्याच्या नूतनीकरणाचा खर्च कमी ठेवण्यासाठी साधं व स्वस्तातलं साहित्य वापरलं आहे. एवढंंच नव्हे तर या अतिथिगृहात आधीपासून असलेल्या फर्निचरबरोबरच आपल्या जुन्या घरातलंही बरचसं फर्निचर इथं उपयोगात आणलं आहे. नवीन संरक्षक भिंत आणि इतर आवश्यक सुरक्षाविषयक कामांवर काही खर्च झाला आहे. ठेकेदाराकडून अद्याप अंतिम बिलं सादर झालेली नसल्यानं नेमका किती खर्च झाला आहे, हे लगेच सांगता येणार नाही; मात्र तो अत्यंत कमी असेल.
हे गढूळ वातावरण निवळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सर्व आमदार-खासदारांंसह सुमारे पाचशे जणांना गेल्याच गुरुवारी भोजनासाठी बंंगल्यावर निमंत्रित केलं होतं. पण, या ‘डिनर डिप्लोमसी’तूून फार काही साध्य झालं नाही. अनेक विरोधी नेत्यांनी ‘पूर्वनियोजित कामां’चं कारण पुढं करून भोजनाकडं पाठ फिरवली. मात्र, या अनुपस्थितीमागं काही महत्त्वाची राजकीय समीकरणं आणि अंतर्गत मतभेद असल्याचं कर्नाटकच्या राजकीय वर्तुळात बोललं जातं आहे. शिवकुमार मुख्यमंत्री झाले, तेव्हापासूनच सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांच्या गटांमध्ये सुप्त संघर्ष सुरू आहे. सरकारच्या शंभर दिवसांच्या पूर्ततेनिमित्त विधानसौध इथं झालेल्या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष बी. के. हरिप्रसाद यांना मंचावर निमंत्रित न केल्याच्या तसंच त्यांनी सुचवलेल्या ‘राजकीय व्यवहार समिती’च्या प्रस्तावाला शिवकुमार यांनी विरोध केल्याच्या नाराजीतूून हरिप्रसाद यांनी स्नेहभोजनाला उपस्थित राहणं टाळल्याचं मानलं जातं. भाजपच्या आघाडीच्या नेत्यांनी दौऱ्याचं कारण देत येणं टाळलं; मात्र भाजपच्याच काही आमदारांनी भोजनाला हजेरी लावल्यानं त्यांचीही गटबाजी समोर आली आहे.
मल्हार अरणकल्ले
arankalle.malhar@gmail.com
Read About : Fake Gold Hallmark Scam : चकाकते, ते सारे सोने नव्हे!
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.