भविष्यातील सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रयत्न
वॉशिंग्टन : Quantum Position Verification आजच्या डिजिटल युगात ऑनलाइन समोरची व्यक्ती खरोखर कोण आहे आणि ती नेमकी कोठून संवाद साधत आहे, हे ओळखणे अत्यंत कठीण झाले आहे. पासवर्ड हॅक करणे, बनावट ओळख निर्माण करणे, जीपीएस लोकेशन बदलणे किंवा एआयच्या मदतीने बँक अधिकारी असल्याचे भासवून फसवणूक करणे यांसारखे प्रकार जगभरात वेगाने वाढत आहेत. डिजिटल माहिती खरी असल्याची खात्री क्रिप्टोग्राफीद्वारे करता येते, परंतु डिजिटल ओळख आणि प्रत्यक्ष भौगोलिक स्थान यांची सांगड घालणे मोठे आव्हान आहे. मात्र, अमेरिकेतील नॅशनल इन्स्टट्यिूट ऑफ स्टँडर्ड्स अँड टेक्नॉलॉजी मधील भौतिकशास्त्रज्ञांनी यावर उपाय शोधला आहे. एनआयएसटी चे शास्त्रज्ञ क्रिस्टर शाल्म आणि गौतम कावुरी यांच्या नेतृत्वाखालील आंतरराष्ट्रीय पथकाने क्वांटम पोझिशन व्हेरिफिकेशन या तंत्रज्ञानाची प्रयोगशाळेत यशस्वी चाचणी केली आहे. त्यातून भविष्यात होणारी सायबर गुन्हेगारी रोखण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
हा प्रयोग नेमका कसा करण्यात आला?
या प्रयोगासाठी संशोधकांनी कोलोरॅडो येथील एनआयएसटी च्या बोल्डर कॅम्पसमधील एका इमारतीत १९५ मीटर (सुमारे २०० मीटर) अंतरावर दोन तपासणी केंद्रे उभारली. ही दोन्ही केंद्रे फायबर-ऑप्टिक आणि इलेक्ट्रिकल केबल्सद्वारे जोडली गेली होती आणि त्यांच्या मधोमध एका व्यक्तीला उभे करण्यात आले. प्रयोगादरम्यान एका केंद्रावरून प्रकाशाचा एक अत्यंत सूक्ष्म कण म्हणजेच फोटॉन फायबर-ऑप्टिक केबलद्वारे त्या व्यक्तीच्या दिशेने सोडण्यात आला. क्वांटम भौतिकशास्त्राच्या मूलभूत नियमांनुसार, कोणत्याही क्वांटम कणाची हुबेहूब नक्कल (कॉपी) करता येत नाही. त्याच वेळी दोन्ही केंद्रांनी त्या व्यक्तीकडे काही संकेत (रँडम बीट्स) पाठवले, ज्याच्या आधारे त्या फोटॉनचे ध्रुवीकरण मोजायचे होते. त्या व्यक्तीने तो फोटॉन पकडून, त्याचे मोजमाप केले आणि तात्काळ दोन्ही केंद्रांना प्रतिसाद पाठवला.
या प्रक्रियेत भौतिकशास्त्राचे दोन नियम हॅकर्सना पकडतात. पहिला म्हणजे प्रकाशाचा वेग विश्वात प्रकाशापेक्षा वेगाने काहीही प्रवास करू शकत नाही. आणि दुसरा म्हणजे फोटॉनची नक्कल न होण्याचा गुणधर्म. जर एखादी व्यक्ती दुसऱ्याच देशात किंवा वेगळ्या ठिकाणी बसून खोटे लोकेशन दाखवण्याचा प्रयत्न करत असेल, तर सिग्नलच्या देवाणघेवाणीला लागणाऱ्या सूक्ष्म वेळेतील फरकामुळे तिची फसवणूक लगेच उघडकीस येते. शास्त्रज्ञांनी लूपहोल-फ्री बेल टेस्टच्या मदतीने या प्रयोगात कोणतीही छेडछाड होऊ शकत नाही, हेही सिद्ध केले.
भविष्यातील आव्हाने
भविष्यात हे तंत्रज्ञान सायबर सुरक्षेसाठी चांगले कवच ठरू शकते. बँकिंग व्यवहार, आरोग्य नोंदी, शेअर बाजार, वीज ग्रीड्स, जलशुद्धीकरण केंद्रे आणि अतिसंवेदनशील सरकारी डेटाबेसमध्ये केवळ प्रत्यक्ष त्या सुरक्षित इमारतीत उपस्थित असलेल्या व्यक्तीलाच प्रवेश मिळेल, याची खात्री यातून करता येईल. तसेच, फोन किंवा व्हिडिओ कॉलद्वारे होणारी फिशिंग फसवणूक थांबवता येऊ शकते.
सध्या हे तंत्रज्ञान प्राथमिक अवस्थेत असून, प्रयोगशाळेबाहेर प्रत्यक्ष वापरात येण्यासाठी सुमारे दशकभराचा कालावधी लागू शकतो. त्यासाठी अधिक वेगवान क्वांटम नेटवर्क आणि प्रगत उपकरणांची गरज असेल. तरीही, डिजिटल सुरक्षेला प्रत्यक्ष भौगोलिक ठिकाणाशी जोडणारे हे जगातील पहिलेच यशस्वी पाऊल मानले जात आहे.
Read About : Open-Weight AI Models 2026 : एआय क्षेत्रात ओपन-वेट प्रणालींची वेगाने भरभराट; गैरवापराचा धोकाही तितकाच मोठा
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.