Klaus Schelkle and Bettina Taxis : क्लॉस (Klaus) हॉस्पिटलमध्ये पोहोचायच्या आधीच मृत झाला. बेटिनाची (Bettina) प्रकृतीही गंभीरच होती. त्या दोघांच्या डोक्यावर जोरदार प्रहार केलेले दिसत होते. तो हल्ला अतिशय क्रूर होता.
पश्चिम जर्मनीतील क्लॉस शेल्कल (Klaus Schelkle) आणि बेटिना टॅक्सिस (Bettina Taxis) हे २०-२२ वर्षांचं प्रेमी विद्यार्थी जोडपं आणि शेल्कलेचा मित्र थॉमस श्मिड असे तिघे मिळून फिरायला निघाले. त्यासाठी ते २७ जुलै रोजी संध्याकाळी उशिरा स्टॉकहोममधून वायकिंग सॅली या जहाजाने निघाले. ते विद्यार्थी असल्याने त्यांच्याकडे तसे फार पैसे नव्हते, त्यामुळे त्यांनी जहाजावर केबिन घेतली नाही. क्लॉस (Klaus) आणि बेटिना (Bettina) हे दोघेही मनमिळाऊ होते. बोलके होते. त्यांची त्या जहाजावर बऱ्याच जणांशी ओळख झाली.
श्मिड मात्र काहीसा अबोल होता. पटकन लोकांत मिसळणारा नव्हता. त्यांची ओळख एका तरुण ब्रिटीश माणसाशी झाली. तो त्याच्या फिनिश गर्लफ्रें डला भेटायला चालला होता; तर जर्मनीतला एक फिनिश व्यावसायिक जो कार पार्टस विक्रे ता होता, तो बिझनेस टूरहून परतत होता, त्याच्याशीही त्यांची छान ओळख झाली.
२८ जुलैच्या पहाटे १ वाजता क्लॉस (Klaus) आणि बेटिनाने (Bettina) जहाजाच्या आतून त्यांच्या स्लीपिंग बॅग आणल्या. श्मिड तिघांच्याही बॅकपॅक आणि इतर सामानासह एका सार्वजनिक ठिकाणी झोपलेला होता. ते प्रेमी जोडपं जहाजाच्या मागच्या भागातल्या नवव्या डेकवर मोकळ्या हवेत गेले. त्यांनी जहाजाच्या हेलिपॅडजवळ एक सुरक्षित जागा आधीच शोधून ठेवली होती. तिथे तुटका दिवा असल्याने प्रकाश अगदीच अंधूक होता.
साधारण पहाटे पावणेचारच्या सुमारास फिनलँडमधील एका जॅम्बोरीसाठी निघालेले एक डॅनिश स्काउट आणि तीन स्वीडिश स्काउट्स जहाजाच्या डेकवर फिरत होते. ते नेमके शेल्कले आणि बेटिनाच्या (Bettina) झोपण्याच्या त्या जागी गेले. तिथे गेल्यावर त्यांनी या दोघांना जेमतेम उभं राहायचा प्रयत्न करत असताना बघितलं. आधी त्यांना वाटलं की ते दोघं नशेत आहेत. पण, मग त्यांना दिसलं की त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झालेली आहे. ते अर्धवट शुद्धीत होते. त्यांच्या रक्ताने ती सगळी जागा माखलेली होती.
त्यातला एक बॉय स्काऊट प्रथमोपचार करायला गेला, पण त्याला त्यांच्या जखमा खोलवर झालेल्या असल्याचं दिसलं. त्या तिघांनी जहाजाच्या फ्रंट डेस्ककडे सूचना पाठवली. ऑन कॉल नर्स आणि सुरक्षा कर्मचाऱ्याला तिथे तातडीने बोलावून घेतलं. नर्सला त्यातलं गांभीर्य लगेच लक्षात आलं. तिने जहाजाच्या कॅप्टनला तुर्कू युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी फिनलँड कोस्ट गार्डचे बचाव हेलिकॉप्टर पाठवण्याची विनंती केली. सकाळी ०५:४८ वाजता ते हॉस्पिटलमध्ये पोहचले. जाईतोवर नर्सने त्यांना वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. पण, क्लॉस शेल्कल (Klaus Schelkle) हॉस्पिटलमध्ये पोचायच्या आधीच मृत झाला. बेटिनाची (Bettina) प्रकृतीही गंभीरच होती.
त्या दोघांच्या डोक्यावर जोरदार प्रहार केलेले दिसत होते. तो हल्ला अतिशय क्रूर होता. हा गुन्हा आलँडच्या अधिकारक्षेत्रात घडला असला तरी फिनलँडच्या गृहमंत्रालयाने ठरवलं की, तुर्कू प्रादेशिक पोलीस दल फिनलँडच्या राष्ट्रीय अन्वेषण ब्युरो (एनबीआय)च्या मदतीने या प्रकरणाचा तपास करेल. पोलीस तपासनीस सकाळी साडेसहा वाजता जहाजावर पोहोचले. जहाज तेव्हा समुद्रातच होतं. ते सकाळी ८:१० वाजता तुर्कू बंदरात पोहोचलं.
लगेच त्याला पोलिसांनी वेढा घातला. तो गुन्हेगार जहाजावरच असेल असा त्यांना संशय होता. पोलिसांनी सुरुवातीला उतरणाऱ्या सर्व प्रवाशांची मुलाखत घेण्याची आणि त्यांचं व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्याची योजना आखली होती. पण, त्या दिवशी जहाजावर सुमारे १,४०० प्रवासी होते. त्यात लहान मुलं आणि वृद्ध यांना थांबवून विचारणं अशक्य होतं. लहान मुलं आणि वृद्ध बरोबर घेऊन चाललेली कुटुंब जेवढी होती त्या कुटुंबांना त्यांनी तसंच जाऊ दिलं. तेव्हा त्यांनी फक्त काही संशयित व्यक्तींना ताब्यात घ्यायचं ठरवलं. अर्थातच श्मिडचा आणि त्या ब्रिटीश माणसाचाही नंबर त्यात लागला. ब्रिटीश माणसाबद्दल त्यांना संशय होता. कारण सकाळी त्याचे कपडे रक्ताने माखलेले आढळले होते. पण, त्याने दावा केला की हे रक्त त्याचंच आहे. त्याच्या नाकातून रक्तस्त्राव झाला होता. नंतर फोरेन्सिक तंत्रज्ञानाने बघितल्यावर तेच सिद्ध झालं.
ऑगस्ट १९८७ मध्ये या घटनेनंतर लगेचच, स्थानिक मच्छीमारांना जहाजांच्या फेरींच्या सागरी मार्गापासून फक्त २०० मीटर (६६०फूट) अंतरावर लिला ब्योर्नहोम नावाच्या निर्जन बेटावर कपड्यांनी भरलेली एक प्लास्टिकची पिशवी सापडली. त्यांनी ती तशीच सोडून दिली. पण, पुन्हा एका वर्षांनंतर ती पिशवी त्यांना पुन्हा सापडली. तेव्हा मात्र त्यांनी ती पिशवी पोलिसांनासुपूर्द केली. पिशवीत सापडलेल्या एका हातमोज्यावर ‘एचके’ ही आद्याक्षरे कोरलेली होती. फोरेन्सिक तंत्रज्ञानाने एवढं कळलं की ते कपडे वायकिंग सॅली जहाजावरून आलेले होते. पण, त्यामुळेही तपासात कोणतीही प्रगती झाली नाही. फॉरेन्सिक तंत्रज्ञान जस जसं प्रगत होत गेलं, तस तसं गोळा केलेल्या त्या पुराव्यांतून काही सुगावे मिळाले. पण, तरीही ते रहस्य उलगडायला पुरेसं नव्हतं. शेवटी १९९० साली हा तपास थांबवला गेला.
पण, २०२० मध्ये पोलिसांनी या प्रकरणात एक संशयित आहे, त्याच्याविरुद्ध काही संशयास्पद पुरावे आहेत असं सांगितलं. शेल्कल आणि बेटिना (Bettina) या दोघांना शोधणाऱ्या बॉय स्काउट्सपैकी तो एक होता. या प्रकरणाची सदोष मनुष्यवध म्हणून चौकशी करण्यात आली होती. त्यासाठी २० वर्षांची वैधानिक मर्यादा असल्याने ते प्रकरण न्यायालयापुढे आणता आलं नसतं. पण, जून २०२१ मध्ये तो संशयित खून आणि खुनाचा प्रयत्न या आरोपातून निर्दोष सुटला. ऑक्टोबर २०२१ मध्ये असं कळलं की, २०१६ मध्ये दोन फिन्निश पोलीस तपास अधिकाऱ्यांसमोर त्याने खुनाची कबुली दिलेली होती. पण, ते त्याने वकील वा साक्षीदार उपस्थित नसताना दिलेली कबुली होती, त्यामुळे औपचारिक चौकशीदरम्यान त्याने ते कबूल केलं नव्हतं. २०२१ मधल्या न्यायालयीन प्रक्रियेत घटनास्थळाचा एक रक्ताळलेला हाताचा ठसा आणि ‘तिसरी व्यक्ती’ असल्याच्या शक्यतेबाबतही प्रश्न उपस्थित झाले होते, त्यामुळे शेवटी खटला अनिर्णित राहिला.
स्मिता पोतनिस
संपर्क : ९८२०६११२०६
Read About : The Theft of the Western Star : वेस्टर्न स्टारची चोरी !
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.