महाडीबीटी २.० वर ऑनलाइन सुविधा उपलब्ध; अंगणवाडी केंद्रांवर अवलंबून राहण्याची गरज संपली
Lek Ladki Yojana online application : मुंबई : ‘लेक लाडकी’ योजनेच्या लाभासाठी आता अर्जदारांना अंगणवाडी केंद्रांवर अवलंबून राहावे लागणार नसून, ‘महाडीबीटी २.०’ या संकेतस्थळावरून घरबसल्या थेट ऑनलाइन अर्ज करण्याची नवी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. अर्ज प्रक्रिया अधिक गतिमान, पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची संख्याही कमी करण्यात आली आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी यापूर्वी अर्जदारांना प्रत्यक्ष अंगणवाडी केंद्रात जाऊन अर्ज जमा करावा लागत होता. त्यानंतर अंगणवाडी स्तरावरून हे अर्ज प्रकल्प कार्यालयाकडे पाठवून तत्कालीन संकेतस्थळावर त्यांची नोंदणी, छाननी आणि मंजुरीची प्रक्रिया केली जात होती. त्यामुळे लाभार्थ्यांची अंगणवाडी केंद्रांवर मोठी निर्भरता होती. मात्र, शासनाने केलेल्या प्रक्रिया पुनर्रचनेमुळे (जीपीआर) आता संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली असून, लाभार्थ्यांना स्वत: थेट अर्ज दाखल करता येणार आहे. या नव्या सुविधेमुळे विशेषत: ज्या भागांमध्ये अंगणवाडी केंद्र कार्यरत नाहीत, तेथील पात्र लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्यातील कोणत्याही भागातील लाभार्थी आता स्वत: अर्ज नोंदणी करणे, छाननी आणि मंजुरीची सद्यस्थिती तपासणे या सर्व बाबी घरबसल्या करू शकतील. दरम्यान, आतापर्यंत या योजनेचा पहिला लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांची संख्या २ लाख ९८ हजार ६९५ इतकी झाली असल्याचेही मंत्री तटकरे यांनी सांगितले.
लेक लाडकी योजना काय आहे
- उद्देश : मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन, सक्षमीकरण आणि मुलींबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणे.
- लाभार्थी : १ एप्रिल २०२३ रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या मुली.
- जन्मावेळी : ५ हजार रुपये.
- पहिलीत प्रवेश : ६ हजार रुपये.
- सहावीत प्रवेश : ७ हजार रुपये.
- अकरावीत प्रवेश : ८ हजार रुपये.
- वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यावर : ७५ हजार रुपये.
- एकूण लाभ : एका मुलीला टप्प्याटप्प्याने १ लाख १ हजार रुपये.
- पात्रता : कुटुंब महाराष्ट्राचे रहिवासी असणे, पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणे तसेच शासनाच्या उत्पन्न व अन्य पात्रता अटी पूर्ण करणे आवश्यक.
महत्त्वाचे मुद्दे
Read About : Mahavitaran electrical safety awareness campaign – 6.19 लाख विद्यार्थ्यांमध्ये वीज सुरक्षेचा जागर
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.