नव्या सीझनचे चित्रीकरण सुरू; साक्षी तन्वरसह प्रमुख कलाकारांची पुनरागमन, मोरपूरच्या राजघराण्यात नव्या व्यक्तिरेखांचीही भर
The Royals Season 2 मुंबई : प्रेम, कौटुंबिक नाट्य आणि राजघराण्यातील संघर्ष यांची रंगतदार गुंफण असलेली ‘द रॉयल्स’ ही मालिका दुसऱ्या सीझनसह प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नव्या सीझनच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून, इशान खट्टर, झीनत अमान आणि साक्षी तन्वर यांच्यासह पहिल्या सीझनमधील प्रमुख कलाकार पुन्हा आपापल्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.
निर्मात्यांनी मंगळवारी याबाबत घोषणा केली. नव्या सीझनमध्ये प्रेमकथा, कौटुंबिक नाट्य, राजघराण्यातील स्पर्धा आणि अनपेक्षित वळणांची अधिक रंगत पाहायला मिळणार आहे. इशान खट्टर, झीनत अमान आणि साक्षी तन्वर यांच्यासोबत विहान समत आणि काव्या त्रेहन हे कलाकारही पुन्हा मालिकेत दिसतील.
मोरपूरच्या राजघराण्यात नव्या व्यक्तिरेखांची भर
नव्या सीझनचे दिग्दर्शन नित्या मेहरा आणि तनुज चोप्रा करणार आहेत. यंदा मोरपूरच्या काल्पनिक राजघराण्यात काही नव्या व्यक्तिरेखांचीही भर पडणार आहे. त्यामुळे नव्या नातेसंबंधांसोबतच युती, संघर्ष आणि प्रेमकथांचे नवे पदर उलगडणार आहेत. ‘द रॉयल्स’च्या पहिल्या सीझनला भारतासह जगभरातील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. याच प्रेमामुळे दुसऱ्या सीझनची निर्मिती करण्याचा उत्साह वाढल्याचे मालिकेच्या निर्मात्या रंगिता प्रितीश नंदी आणि इशिता प्रितीश नंदी यांनी सांगितले. “मोरपूरने राजवाड्याच्या भिंतींपलीकडेही प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. प्रेक्षकांनी मालिकेला दिलेल्या प्रेमामुळे आम्ही आनंदी आहोत,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली. आगामी सीझनमध्ये परिचित व्यक्तिरेखांसोबत अधिक प्रेम, विनोद आणि कौटुंबिक नाट्य अनुभवायला मिळेल, असेही त्यांनी नमूद केले.
नव्या नात्यांसह राजेशाही संघर्षाची रंगत
नेटफ्लिक्स इंडियाच्या मालिका विभागाच्या प्रमुख तान्या बामी यांनीही दुसऱ्या सीझनबाबत उत्सुकता व्यक्त केली. भारतीय राजेशाहीचे वैभव आणि निषिद्ध प्रेमकथा या दोन विषयांच्या संगमाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे त्यांनी सांगितले. नव्या सीझनमध्ये मोरपूरचे विश्व अधिक विस्तारले जाणार असून, नव्या व्यक्तिरेखा, नातेसंबंध आणि संघर्षांमुळे कथेला वेगळी दिशा मिळेल, असे बामी यांनी स्पष्ट केले. दिग्दर्शक नित्या मेहरा आणि तनुज चोप्रा पुन्हा मालिकेची धुरा सांभाळणार असल्याने आगामी भागांमध्ये भावना, विनोद आणि नाट्य यांची अधिक प्रभावी मांडणी पाहायला मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सध्या ‘द रॉयल्स’च्या दुसऱ्या सीझनचे चित्रीकरण सुरू आहे. ही मालिका नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार असून, प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
Himesh Reshammiya 15 English Songs – रिहानासाठी हिमेशची खास गाण्यांसह ग्लोबल झेप
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.