Ad Advertisement Ad Advertisement

Lightning Strike: जिल्ह्यात वीज पडून 5 जणांचा मृत्यू; चौघे जखमी

पिशोर : Lightning Strike : पावसाची आतुरतेने प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांवर गुरुवारी (दि.१७) दुपारी अचानक आलेल्या पावसासोबत विजेने कहर केला. जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज पडून पाच जणांचा मृत्यू झाला तर अन्य चार जण गंभीर जखमी झाले. पहिली घटना कन्नड तालुक्यातील पिशोर येथे तर दुसरी घटना सिल्लोड तालुक्यातील दहेगाव येथे घडली.

पावसापासून बचावासाठी झाडाखाली आसरा; एकाच कुटुंबातील तिघांचा बळी

कन्नड तालुक्यातील पिशोर (ता. कन्नड) येथील वाघुळखेडा शिवारात दुपारी पावसापासून बचावासाठी कवठाच्या झाडाखाली उभ्या असलेल्या सहा जणांवर अचानक वीज कोसळली. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला तर तिघे जण गंभीर जखमी झाले. फरजाना हमीद सय्यद (३८), अलविरा हनीफ सय्यद (१६) आणि तसलीम बानो मुक्तार सय्यद (५०)अशी मृतांची नावे आहेत. दुपारी शेतात काम सुरू असताना अचानक पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे काही जणांनी जवळच्या कवठाच्या झाडाखाली आसरा घेतला. त्याचवेळी विजेच्या कडकडाटासह झाडाजवळ वीज कोसळली. यात फरजाना, अलविरा आणि तसलीम यांचा जागीच मृत्यू झाला तर हफिस शेख खलील (२२), हमिदा हनीफ सय्यद (३२) आणि अनिसा सय्यद निसार (३५) हे तिघे जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी घाटी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

शेतातील झोपडीवर वीज कोसळली; दाम्पत्याचा मृत्यू

दुसरी घटना सिल्लोड तालुक्यातील दहेगाव येथे घडली. शेतात काम करत असताना अचानक पावसाला सुरुवात झाल्याने शेतातील झोपडीत आसरा घेतलेल्या कुटुंबावर वीज कोसळली. यात पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला. ही घटना दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली. मनोहर भिवसन दुधे (६०), पार्वताबाई मनोहर दुधे (५७) या दाम्पत्याचा मृत्यू झाला तर मुलगा पंढरीनाथ मनोहर दुधे (२८) जखमी झाला. ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंढरीनाथ याला सिल्लोड येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मृत पती-पत्नीच्या पार्थिवाचे सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर दहेगाव येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Read About : Bhokar Nanded Accident : भोकरजवळ भीषण अपघात; ८ ठार, ८ जखमी

E-Paper: Punyanagari E-Paper

Comments
Loading comments...