Advertisement Advertisement

Madhuri Dixit to Host Kon Honaar Crorepati : धकधक गर्ल आणि धाकधूक

Madhuri Dixit to Host Kon Honaar Crorepati : सोनी मराठी वाहिनी आणि सोनी लिव्ह या चॅनेल्सवर लवकरच ‘कोण होणार करोडपती’च्या नव्या पर्वाची घोषणा होणार आहे. या पर्वातून महाराष्ट्राची लाडकी लेक आणि हिंदी चित्रपटांतील लोकप्रिय अभिनेत्री ‘पद्मश्री’ माधुरी दीक्षित ही सूत्रसंचालकाच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तिच्यामुळे या कार्यक्रमात नव्या विचारांचा, ऊर्जेचा आणि स्वप्नांचा प्रवास सुरू होणार आहे. कारण ‘आता खेळ बदलणार’ अशा स्वरूपाची जाहिरात प्रेक्षकांना दिसू लागली आहे. ज्ञानाच्या बळावर स्वप्नांना नवी दिशा देणारा, सामान्य माणसाच्या असामान्य प्रवासाला व्यासपीठ मिळवून देणारा आणि प्रत्येक प्रश्नातून आयुष्य बदलण्याची संधी निर्माण करणारा हा कार्यक्रम यंदाही प्रेरणांचा, आशांचा आणि नव्या शक्यतांचा उत्सव ठरू शकेल.

यापूर्वी सचिन खेडेकर हे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत असताना ते लोकप्रिय होते. त्यानंतर स्वप्नील जोशी आणि नागराज मंजुळे यांनीही मराठी करोडपतीच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं. ‘कोण होणार करोडपती’ कार्यक्रमात हॉटसीटवर बसणाऱ्या स्पर्धकांना लाईफलाइनची मदत असते. एकदा कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी झालेल्या पत्रकार परिषदेत सचिनला एक प्रश्न विचारण्यात आला होता. ‘हॉटसीटवर येणाऱ्या स्पर्धकाला प्रश्नाचं उत्तर देताना अडचण आल्यास ‘फोन अ फ्रेंड’चा पर्याय दिला जातो. तुम्हाला जर मदत हवी असेल तर तुम्ही कुणाची मदत घ्याल?’ तेव्हा त्यांनी महेश मांजरेकरचं नाव सांगितलं होतं. ‘आता मागे राहायचं नाही. आपल्या माणसाला जिंकताना बघायचं’, अशी गेल्या वेळच्या करोडपती पर्वाची टॅगलाईन होती.

माधुरीचा कार्यक्रम लवकर सुरू होत आहे, हिंदीतला अमिताभ बच्चनचा करोडपती कार्यक्रम घराघरांत गेला आहे. शाहरुख खानने ‘कौन बनेगा करोड़पती’च्या तिसऱ्या सीझनचं सूत्रसंचालन केलं होतं. तसंच लहान मुलांसाठी ‘क्या आप पाँचवी पास से तेज़ हैं?’ हा क्वीझ शो केला. सलमान ख़ानने ‘दस का दम’ केला. ‘द विकेस्ट लिंक’ या कार्यक्रमाची हिंदी आवृत्ती म्हणजे ‘कमज़ोर कड़ी कौन.’ त्याचं अँकरिंग नीना गुप्ताने केलं होतं. अनिल कपूरने ‘इंडिया के टॉप वन परसेंट’ हा तर्कावर आधारित कार्यक्रम केला होता, तर मनीष पॉलचा ‘द फंटास्टिक क्विझ’ हा कार्यक्रमही सर्वज्ञात आहे. मात्र, भारतात टीव्हीद्वारे क्विझ शो लोकप्रिय करण्याचं श्रेय सिद्धार्थ बसूचं. त्याने क्विझ टाईम, मास्टरमाइंड इंडिया आणि युनिव्हर्सिटी चॅलेंज इंडिया यांसारखे क्विझ कार्यक्रम लोकांपर्यंत पोहोचवले.

अर्थात, या कार्यक्रमांची निर्मितीही त्याचीच होती. तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन हे टेलिव्हिजनवर ‘बोर्नव्हिटा क्विझ काँटेस्ट’चं सूत्रसंचालन करत असत. प्रख्यात अभिनेत्री आणि व्यक्तिमत्त्व विकासतज्ज्ञ सबीरा मर्चंट हिने दूरदर्शनवर सादर केलेला प्रेक्षकप्रिय कार्यक्रम म्हणजे ‘व्हॉट्स द गुड वर्ड.’ १९७२ ते ७६ या काळात तो दूरदर्शनवर प्रसारित होत असे आणि त्यामुळे ज्ञानात मोठीच भर पडत असे. रेडिओवरून तर या तऱ्हेचे ‘बोर्नव्हिटा डबल ओ क्विट’सारखे कार्यक्रम होतच होते. ज्यावेळी गुगल, चॅट जीपीटी, परप्लेक्सिटी वगैर आणि समाजमाध्यमंही नव्हती, त्यावेळी तर अशा कार्यक्रमांचं महत्त्व विशेष होतं. ‘हू वाँट्स टब बी अ मिल्यनेअर?’ या मूळ ब्रिटिश टीव्ही क्विझ कार्यक्रमाने नंतर जगभर विविध भाषांमध्ये क्विझ कार्यक्रम सुरू होण्यास प्रेरणा दिली.

अमिताभ बच्चनच्या खेळकर आणि प्रसन्न शैलीमुळे ‘कौन बनेगा करोड़पती’ने प्रेक्षकांच्या काळजात स्थान मिळवलं. हा कार्यक्रम ज्ञानाधारित असल्यामुळे थोडी वाचनाची बैठक असणं आवश्यक असतं. अमिताभचे वडील हरिवंशराय बच्चन हे प्रसिद्ध कवी, तर आई तेजी याही सामाजिक कार्यकर्त्या; त्यामुळे त्यांच्याकडून वाचनाचा वारसा अमिताभकडे आला. गेल्या काही वर्षांत अमिताभने नामवंत इतिहासकार विल्यम डॅलरिम्पल यांचं ‘ॲनार्की’ हे ईस्ट इंडिया कंपनीवरील पुस्तक वाचलं. तसंच यानिस व्हरौफाकिस याचं ‘टॉकिंग टू माय डॉटर : ब्रीफ हिस्टरी ऑफ कॅपिटॅलिझम’ हेही वाचलं. सुहैल देव या भारतीय राजावरील आमिष त्रिपाठीची ऐतिहासिक कादंबरीदेखील अमिताभला आवडलेली आहे. थोडक्यात, अमिताभकडे वाचन-लेखनाची परंपरा आहे आणि याचा त्याला या कार्यक्रमासाठी खूप उपयोग झाला.

आपल्याकडे खास करून हिंदी चित्रपटांतील नट्या या मठ्ठ असतात अशी एक समजूत आहे. काहीजणींनी हे सिद्ध केलं असलं तरी अनेकजणी उत्तम वाचक आहेत. ‘कॉफी विथ करण’च्या २०१३ मधल्या एका शोमधील चुकीच्या उत्तरांमुळे अभिनेत्री आलिया भट भारतात प्रसिद्ध झाली होती. त्यात तिने भारताचे राष्ट्रपती कोण, या प्रश्नाचं उत्तर ‘पृथ्वीराज चव्हाण’ असं दिलं होतं. या एका प्रसंगामुळे सोशल मीडियावर तिच्यावर हजारो मीम्स बनले आणि तिच्या सामान्यज्ञानाची खिल्ली उडवली गेली. २०१४ मध्ये आलियाने ‘एआयबी’ सोबत स्वत:वरच एक उपरोधिक व्हिडीओ (मॉक्युमेंटरी) बनवला. त्यात ती बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी जिम लावली असल्याचं दाखवून तिने स्वत:ची चेष्टा केली आणि अप्रत्यक्षपणे ट्रोलर्सची तोंड बंद केली. एखाद्या रिॲलिटी शोमधील चुकीच्या उत्तरावरून कोणाच्याही क्षमतेचा किंवा बुद्धिमत्तेचा अंदाज लावता येत नाही हे यावरून दिसून आलं.

माधुरी दीक्षित आज ५९ वर्षांची आहे. वयाच्या तिसऱ्या वर्षापासून ती कथ्थक शिकू लागली. अंधेरीच्या ‘डिव्हाईन चाइल्ड हायस्कूल’मधून तिने शालेय शिक्षण घेतलं. शाळेत असताना माधुरी नाटकात कामं करायची. विलेपार्ल्याच्या साठे कॉलेजात माधुरी मायक्रो बायॉलॉजीचं शिक्षण घेत होती. पण, कॉलेजात जाऊन सहा महिने होत नाहीत तोवरच माधुरीच्या आयुष्याची दिशा बदलली आणि ती चित्रपटांकडे वळाली. १९८४ साली म्हणजे वयाच्या सतराव्या वर्षी माधुरीला राजश्री प्रॉडक्शनच्या ‘अबोध’ या चित्रपटात भूमिका मिळाली. माधुरीला वाचनाचीही आवड आहे. प्रथम बुक्सच्या ऑनलाईन स्टोरी टेलिंग कॅम्पेनला माधुरीने पाठबळ पुरवलं होतं. विशेष म्हणजे, माधुरी स्वत: कविताही करते. राजेश खन्नाची मुलगी आणि अक्षयकुमारची पत्नी ट्विंकल ही तर इंग्रजीतील प्रसिद्ध लेखिकाही आहे.

अभिनेत्री म्हणून ती अयशस्वी ठरली असली, तरी लेखिका म्हणून यशस्वी आहे. ‘मिसेस फनी बोन्स’ आणि ‘पाजमाज आर फरगिव्हिंग’ ही तिची बेस्ट सेलिंग पुस्तकं आहेत. ट्विंकलचा विनोद किती कमालीचा आहे, हे काही वर्षांपूर्वीच्या तिच्या ‘टाइम्स ऑफ इंडिया’तील कॉलममधून जाणवत असे. सोहा अली खान ही ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी तसंच लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सची पदवीधर आहे. तिलाही वाचनाचा नाद आहे. ‘द पेरिल्स ऑफ बिइंग मॉडरेटली फेमस’ हे पुस्तक तिने लिहिलं असून, त्यात आपल्या आयुष्याचा हसतखेळत आढावाही घेतला आहे. सिनेमा हे क्षेत्र असं आहे की ज्यात केवळ अभिनयकला नाही तर कथा, लेखन, साहित्य याचाही संबंध येतो. व्यक्तिरेखा सादर करताना उत्तम वाचन असेल तर त्याचा उपयोग होतो. वेगवेगळ्या परिस्थितीत माणसं कशी वागतात-बोलतात याची जाण वाचनातून येते. शूटिंगच्या वेळी कॅमेरा, साऊंड या तांत्रिक कारणांसाठी किंवा आऊटडोअर असेल तर प्रकाशाची वाट पाहत अनेकदा कलावंतांना तिष्ठत बसावं लागतं. त्यावेळी काहीजण बाजूला व्यायाम करतात, काहीजण चेस खेळतात तर काहीजण गप्पाष्टकात वेळ घालवतात. मात्र, पूर्वीच्या काळात वहिदा रहमान, नूतन, शर्मिला टागोर यांसारख्या अभिनेत्री एखादं पुस्तक वाचत असताना दिसायच्या असं लोक सांगतात. माधुरी आता पूर्वीइतकी चित्रपटात कार्यरत नाही, पण कधी इंटरेस्टिंग भूमिका आली तर करते. ‘बकेट लिस्ट’सारखा चित्रपट निर्माणही करते. आरोग्यपूर्ण जगते, म्हणून तिची टवटवी कायम आहे. आता माधुरी जेव्हा प्रश्न विचारेल, तेव्हा समोरच्या सहभागी व्यक्तीच्याच मनात धकधक निर्माण होईल.

नंदिनी आत्मसिद्ध
nandini.atma@gmail.com

Comments
Loading comments...