Ad Advertisement Ad Advertisement

RSV Virus Warning: लहान मुलांसाठी आरएसव्ही व्हायरस ठरू शकतो प्राणघातक

गंभीर संसर्ग झाल्यास लहान मुलांना श्वास घेण्यास त्रास

नवी दिल्ली : RSV Virus Warning सामान्य सर्दी-खोकल्यासारखा दिसणारा आरएसव्ही म्हणजेच रेस्पिरेटरी सिंसिटियल वायरस हा केवळ एक साधा हंगामी आजार नसून, तो जगभरातील लहान मुलांच्या आरोग्यासाठी एक अत्यंत गंभीर आव्हान बनला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत या संसर्गजन्य विषाणूबाबत जगभरातील पालकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

डब्ल्यूएचओने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, दरवर्षी या व्हायरसच्या गंभीर संसर्गामुळे जगभरात ३६ लाखांहून अधिक मुलांना रुग्णालयात दाखल करावे लागते, तर सुमारे १ लाख लहान बालकांना आपला जीव गमवावा लागतो. त्यामुळे या आजाराबद्दल योग्य माहिती असणे आणि वेळेवर सावधगिरी बाळगणे अत्यंत गरजेचे आहे. हा अत्यंत संसर्गजन्य विषाणू असून तो संक्रमित व्यक्तीच्या खोकण्याने किंवा शिंकण्याने हवेत पसरतो. याशिवाय संसर्गित झालेल्या वस्तू किंवा पृष्ठभागांना स्पर्श करून नंतर तोच हात डोळे, नाक किंवा तोंडाला लावल्यानेही हा संसर्ग होतो. यामुळेच घरे, शाळा, डे-केअर सेंटर्स आणि गर्दीच्या ठिकाणी मुलांमध्ये हा विषाणू वेगाने पसरतो.

6 महिन्यांपेक्षा कमी वयाची बालके

हा व्हायरस कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला संक्रमित करू शकत असला, तरी ६ महिन्यांपेक्षा कमी वयाची नवजात बालके यासाठी सर्वाधिक संवेदनशील असतात. तसेच मुदतपूर्व जन्मलेली मुले आणि कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या बालकांमध्ये हा संसर्ग गंभीर रूप धारण करू शकतो. सुरुवातीला याची लक्षणे सामान्य सर्दी सारखीच दिसतात, त्यामुळे अनेकदा पालक याकडे दुर्लक्ष करतात. मात्र संसर्ग वाढल्यास मुलांना श्वास घेण्यास प्रचंड त्रास होऊ लागतो. वेळेवर लक्षणे ओळखून त्वरित वैद्यकीय उपचार सुरू करणे आणि काळजी घेणे हाच यावर सर्वोत्तम उपाय आहे.

Comments
Loading comments...