Ad Advertisement Ad Advertisement

Mahur Ghat Accident – माहूर घाटात टेम्पो 100 फूट दरीत कोसळला; तिघांचा मृत्यू

रेणुकामातेचे दर्शन घेऊन परतताना काळाचा घाला; चालकासह तिघे जखमी

माहूर : Mahur Ghat Accident : श्रीक्षेत्र माहूर गडावर सुरू असलेल्या शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त रेणुकामातेचे दर्शन घेऊन यवतमाळकडे परतणाऱ्या भाविकांच्या टेम्पोला माहूर घाटात भीषण अपघात झाला. समोरून येणाऱ्या वाहनाच्या प्रखर प्रकाशामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो सुमारे १०० फूट खोल दरीत कोसळला. शुक्रवारी (दि.१६) पहाटे पाचच्या सुमारास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयामागील घाटातील पहिल्या धोकादायक वळणावर ही दुर्घटना घडली. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला, तर चालकासह तिघे जखमी झाले.

यवतमाळ येथील फर्निचरच्या दुकानात काम करणारे सहा कामगार टेम्पोने (एमएच २९ बीई ६८५९) गुरुवारी रात्री माहूर येथे दशर्नासाठी आले होते. रात्री १२ च्या सुमारास माहूर येथे पोहोचल्यानंतर त्यांनी श्री रेणुकामातेचे दर्शन घेतले. शुक्रवारी पहाटे ५ वाजता त्यांनी यवतमाळकडे परतीचा प्रवास सुरू केला. घाटातील पहिल्या धोकादायक वळणावर समोरून येणाऱ्या वाहनाचा प्रखर प्रकाश चालकाच्या डोळ्यांवर पडला. त्यातच समोरील वाहन विरुद्ध दिशेने आल्याने चालकाने टेम्पो बाजूला घेण्याचा प्रयत्न केला.

मात्र, वाहनावरील नियंत्रण सुटल्याने टेम्पो थेट खोल दरीत कोसळला. या भीषण अपघातात राहुल ठाकरे आणि प्रीतम प्रधान यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेल्या बाबाराव टेकाम यांचा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. दत्तू मेश्राम, प्रतीक आडके आणि यशवंत पाटील हे जखमी झाले. ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. बिपीन बाभळे यांनी जखमींवर प्राथमिक उपचार केले.

पोलिसांसह स्थानिकांकडून बचावकार्य


अपघाताची माहिती भाविकांनी ११२ क्रमांकावर दिल्यानंतर गस्तीवर असलेले पोलीस निरीक्षक देविदास चोपडे आणि कर्मचारी पवन राऊत यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने मयत व जखमींना दरीतून बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, शारदा कन्स्ट्रक्शनचे सुपरवायझर श्रीनिवास यांनी तातडीने क्रेन उपलब्ध करून दिल्यानंतर टेम्पो दरीतून बाहेर काढण्यात आला.

Read about : Meerut Murder Case : पतीची हत्या करणाऱ्या रविता आणि प्रियकराला फाशीची शिक्षा; कोर्टाचा मोठा निर्णय
E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.