उदय सामंत यांची घोषणा; बोलीभाषांच्या संवर्धनासाठी विशेष प्रयत्न, विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कमाफीच्या अंमलबजावणीवरही भर
Marathi Language Development Centres छत्रपती संभाजीनगर : मराठी भाषेचा प्रचार, प्रसार आणि संवर्धन करण्यासाठी राज्यात नऊ मराठी भाषा विकास केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत. त्यापैकी एक केंद्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सुरू करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केली. या केंद्रासाठी लागणारा निधी मराठी भाषा विभागाकडून उपलब्ध करून दिला जाईल, तर विद्यापीठाने जागा उपलब्ध करून द्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आयोजित ‘अभिजात मराठी-अभिमान मराठी’ कार्यक्रमात ते बोलत होते. सामाजिक न्यायमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला कुलगुरू डॉ. विजय फुलारी, प्र-कुलगुरू डॉ. प्रवीण वक्ते, राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ. श्यामकांत देवरे, बोलीभाषा अभ्यासक डॉ. रमेश सूर्यवंशी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
- मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर तिचे महत्त्व जागतिक स्तरावर पोहोचविण्यासाठी शासनाकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यात नऊ मराठी भाषा विकास केंद्रे स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- त्यातील एक केंद्र संभाजीनगरच्या विद्यापीठात सुरू होणार आहे. या केंद्राच्या माध्यमातून मराठी भाषेचा अभ्यास, संशोधन, बोलीभाषांचे दस्तऐवजीकरण आणि भाषेच्या संवर्धनासाठी विविध उपक्रम राबविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
- मराठवाड्याला समृद्ध बोलीभाषांची परंपरा लाभली असून, या भाषिक वारशाचे जतन करण्याची गरज असल्याचे सामंत यांनी सांगितले.
मराठवाड्यातील बोलीभाषांसाठी आवश्यक सहकार्य व निधी
मराठी भाषेचे सामर्थ्य तिच्या विविध बोलीभाषांमध्ये आहे. प्रत्येक प्रदेशातील बोलीभाषेची स्वत:ची वैशिष्ट्ये आणि सांस्कृतिक ओळख आहे. त्यामुळे या बोलीभाषांचे जतन करून त्या पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे, असे सामंत म्हणाले. राज्यातील बोलीभाषांचे शब्दकोश तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मराठवाड्यातील विविध बोलीभाषांचे संकलन, अभ्यास आणि दस्तऐवजीकरण करण्यासाठी आवश्यक सहकार्य व निधी उपलब्ध करून देण्याची तयारी मराठी भाषा विभागाने दर्शविली आहे. बोलीभाषांच्या माध्यमातून स्थानिक संस्कृती, परंपरा आणि लोकजीवनाचे जतन होईल, असेही त्यांनी नमूद केले.
शेतकऱ्यांच्या मुलांचे परीक्षा शुल्क माफ
दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या मुलांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मात्र, काही विद्यापीठांमध्ये शुल्कमाफीचा लाभ मिळण्याऐवजी विद्यार्थ्यांकडून शुल्क आणि दंडही आकारला जात असल्याच्या तक्रारी समोर आल्याचे सामंत यांनी सांगितले. शासनाने घेतलेल्या निर्णयाची शंभर टक्के अंमलबजावणी झाली पाहिजे. यासाठी कुलगुरूंनी संबंधित महाविद्यालये, प्राचार्य आणि यंत्रणांना तातडीने सूचना द्याव्यात, असे आवाहन त्यांनी केले. विद्यार्थ्यांना शासनाच्या निर्णयाचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देणे ही विद्यापीठे आणि शासनाची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिक्षणासाठी कर्ज घेतलेल्या विद्यार्थ्यांना बँकांकडून त्रास दिला जात असल्यास त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठीही शासन प्रयत्न करेल, असे आश्वासन सामंत यांनी दिले.
लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने जागतिक केंद्र
मराठी भाषा आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्यासाठी लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने जागतिक दर्जाचे केंद्र उभारण्याचा संकल्प असल्याचे सामंत यांनी सांगितले. तसेच मुंबईतील नरिमन पॉइंट येथे मराठी भाषेच्या अभ्यास आणि संशोधनासाठी आधुनिक मराठी भवन उभारण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.
Read About : AI Economy – एआयमुळे जागतिक अर्थव्यवस्थेत दरी
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.