मराठवाड्यातील स्थिती चिंताजनक
मुंबई : Marathwada Faces Water Crisis : राज्यातील ३ हजार ३३ धरणांमध्ये यंदा ७१.०६ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असून, गतवर्षीच्या ९०.८३ टक्क्यांच्या तुलनेत यात तब्बल १९.७७ टक्क्यांची मोठी घट नोंदवली गेली आहे. पावसाने ओढ दिल्याने खरीप पिकांचे नुकसान झाले असतानाच, धरणांमधील घटत्या साठ्यामुळे आगामीकाळात रब्बी सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्याचे मोठे आव्हान राज्य शासनासमोर उभे ठाकले आहे. विशेषत: मराठवाड्यातील अनेक मध्यम व लघु प्रकल्पांमधील कमी साठ्यामुळे शेतकऱ्यांसह शासनाची चिंता वाढणार आहे.
राज्यातील ३ हजार ३३ लहान-मोठ्या प्रकल्पांमध्ये १६ ऑक्टोबरअखेर ३६ हजार ५९१.६६ दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध आहे. गतवर्षी याचदिवशी हे प्रमाण ९०.८३ टक्के होते. सध्या १३८ मोठ्या धरणांत ७९.१४ टक्के आणि २६४ मध्यम प्रकल्पांत ६२.२९ टक्के साठा आहे. सर्वाधिक बिकट स्थिती २ हजार ६३१ लघु प्रकल्पांची असून, तेथे गतवर्षीच्या ६४.६६ टक्क्यांच्या तुलनेत अवघा ४०.८४ टक्के साठा शिल्लक आहे. पावसाळ्यानंतर या पाण्याचा वापर पिण्यासाठी, रब्बी हंगामासाठी आणि उद्योगांसाठी करायचा असल्याने शासनाला पाणीवाटपाचे प्राधान्यक्रम ठरवून काटकसरीचे नियोजन करावे लागणार आहे.
मराठवाड्यातील स्थिती
छत्रपती संभाजीनगर विभागातील ९३० प्रकल्पांमध्ये केवळ ४२.०९ टक्के पाणीसाठा शिल्लक असून, गतवर्षी हाच साठा तब्बल ८८.०९ टक्के होता. विभागातील मध्यम प्रकल्पांमध्ये २०.५४ टक्के (गतवर्षी ७९.९८), तर लघु प्रकल्पांमध्ये अवघा १५ टक्के (गतवर्षी ६८.८८) पाणीसाठा राहिला आहे. बीड जिल्ह्यातील माजलगाव धरणात २४.०१ टक्के व मांजरा धरणात ८.५३ टक्के, तर परभणी विभागातील निम्न दुधना प्रकल्पात १७ टक्के उपयुक्त साठा नोंदवला गेल्याने स्थानिक पाणीपुरवठा आणि शेतीची स्थिती अत्यंत नाजूक बनली आहे.
विदर्भातही गतवर्षीच्या तुलनेत घट
नागपूर विभागात ६६.७३ टक्के (गतवर्षी ८९.२८), तर अमरावती विभागात ५९.७४ टक्के (गतवर्षी ८८.८० टक्के) पाणीसाठा उरल्याने विदर्भातील स्थितीही चिंताजनक आहे. याउलट कोकणात ८८.२० टक्के, पुण्यात ८१.८८ टक्के आणि नाशिक विभागात ७९.२९ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे; मात्र गतवर्षीच्या तुलनेत या तिन्ही विभागांत घट नोंदवली गेली आहे.
प्रमुख धरणांतील सध्याचा पाणीसाठा
धरण सध्या (गतवर्षी), घट
कोयना ८५.३१ टक्के (९९.२१ टक्के), १६.७९ टक्के
उजनी ८०.२२ टक्के (१०० टक्के), १९.७८ टक्के
जायकवाडी ७६.४२ टक्के (१०० टक्के), २३.५८ टक्के
ऊर्ध्व वर्धा ५२.२० टक्के (१०० टक्के), ४७.८० टक्के
येलदरी ६०.५८ टक्के (१०० टक्के), ३९.४२ टक्के
राधानगरी ९५.८३ टक्के (९९.३४ टक्के), ३.५१ टक्के
गंगापूर ९५.१८ टक्के (९८.८५ टक्के), ३.६७ टक्के
भातसा ९५.४६ टक्के (९७.९९ टक्के), २.५३ टक्के
महत्वाचे मुद्दे
Read About : Greenland Glacier Melting – जहाजांना अशक्य ठरलेल्या समुद्रात नार्व्हल माशांनी उलगडले हिमनग वितळण्याचे रहस्य
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.