maharashtra-voter-registration-drive-special-camps-october-17-18-24-25_ १७, १८, २४ व २५ ऑक्टोबरला मतदान केंद्रांवर शिबिरे
मुंबई : Voter Registration Drive : राज्यातील एकाही पात्र मतदाराचे नाव यादीतून सुटू नये, म्हणून १७, १८ तसेच २४ आणि २५ ऑक्टोबर रोजी सर्व मतदान केंद्रांवर विशेष नोंदणी शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत.
भारत निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या वतीने ही राज्यव्यापी विशेष मोहीम राबवली जात आहे. प्रारूप मतदार यादीत आपले नाव तपासून नागरिकांनी नवीन नाव नोंदणी किंवा दुरुस्तीसाठी २६ ऑक्टोबरपर्यंत ऑफलाइन अथवा ऑनलाइन अर्ज सादर करावेत, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने केले आहे.
या मोहिमेसाठी राज्यातील ३६ जिल्हा निवडणूक अधिकारी, २८८ मतदार नोंदणी अधिकारी, ७ हजार १०० सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी आणि १ लाख २५३ केंद्रस्तरीय अधिकारी कार्यरत आहेत. शिबिराच्या दिवशी केंद्रस्तरीय अधिकारी उपस्थित राहून नागरिकांना थेट मदत व मार्गदर्शन करतील. मतदार नोंदणी ही वर्षभर चालणारी प्रक्रिया असल्याने नागरिकांना विहित मुदतीत अर्ज करावे लागणार आहेत.
विविध नमुना अर्ज
मतदार यादीत नवीन नाव नोंदवण्यासाठी अर्ज क्रमांक ६ भरावा लागतो. यादीतील नाव वगळण्यासाठी नमुना अर्ज क्रमांक ७ आहे. याशिवाय, पत्ता बदल, तपशिलात दुरुस्ती, नवीन ओळखपत्र मिळवणे किंवा दिव्यांग नोंदणीसाठी नमुना अर्ज क्रमांक ८ उपलब्ध आहेत.
हेल्पलाइन व संपर्क व्यवस्था
नोंदणीबाबत कोणतीही अडचण किंवा तक्रार असल्यास नागरिकांनी ‘१९५०’ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच कार्यालयीन वेळेत जिल्हा निवडणूक अधिकारी किंवा मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयातील मदत केंद्रांशी संपर्क साधता येईल. तपशील आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
Read About : UPI MDR Fee Debate : यूपीआयवर लगान कशासाठी
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.