Ad Advertisement Ad Advertisement

Marathwada Mega Road Action Plan मराठवाड्यात रस्त्यांचा ‘मेगा ॲक्शन प्लॅन’; १३ हजार अतिक्रमणांना दणका!

महाराष्ट्र अमृतकाल रस्ते विकास योजनेत सात जिल्ह्यांचा समावेश

Marathwada Mega Road Action Plan छत्रपती संभाजीनगर : दीर्घकालीन रस्ते विकास आराखड्यात मराठवाड्यातील सात जिल्ह्यांसाठी तब्बल २० हजार ८२५ किलोमीटर लांबीच्या मध्यवर्ती रस्ते जाळ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. ‘महाराष्ट्र अमृतकाल रस्ते विकास योजना २०२५-२०४७’ अंतर्गत छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, नांदेड, परभणी आणि लातूर या जिल्ह्यांतील रस्त्यांचा आराखड्यात समावेश आहे. याशिवाय मास्टर प्लॅनवरील रस्त्यांचा श्वास मोकळा करण्यासाठी पोलीस दलातील घटक प्रमखांकडे बंदोबस्त मागणीचे पत्र पाठविण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात १३ हजार ३७५ अतिक्रमणांना दणका बसणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

या आराखड्यात द्रुतगती मार्ग, राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग आणि इतर जिल्हा मार्ग अशा विविध प्रकारच्या रस्त्यांचा समावेश करण्यात आला आहे. मराठवाड्यातील सात जिल्ह्यांमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये ३ हजार ६७५ किमी, जालना २ हजार ८२२ किमी, बीड ३ हजार ५५६ किमी, धाराशिव २ हजार ६९७ किमी, नांदेड ३ हजार ३७१ किमी, परभणी १ हजार ८७५ किमी आणि लातूर २ हजार ८२९ किमी रस्त्यांचे नियोजन आहे.

सात जिल्ह्यांतील प्रस्तावित रस्ते जाळ्यांमध्ये राज्य महामार्गांची लांबी ६ हजार ५५८ किमी तर प्रमुख जिल्हा मार्गांची लांबी ६ हजार ६२० किमी आहे. याशिवाय २ हजार ५१५ किमी इतर जिल्हा मार्गांचा समावेश आहे. सातही जिल्ह्यांतील राष्ट्रीय महामार्गांची एकत्रित लांबी ३ हजार ८३२ किमी तर द्रुतगती मार्गांची लांबी १ हजार २९८ किमी आहे.

रस्ते विकासासाठी मोठी गुंतवणूक

आराखड्यात २०४७ पर्यंत राज्यातील मध्यवर्ती रस्ते जाळ्यांच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर भांडवली गुंतवणुकीचे नियोजन करण्यात आले आहे. उपलब्ध एकक खर्चाच्या आधारे सात जिल्ह्यांतील राज्य महामार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग आणि इतर जिल्हा मार्गांच्या प्रस्तावित लांबीचा विचार केल्यास या तीन प्रकारच्या रस्त्यांसाठी सुमारे ८९ हजार ३४८ कोटी रुपयांचा अंदाजित खर्च येतो. हा आकडा गणिती अंदाज असून जिल्हानिहाय अधिकृत खर्च म्हणून ग्राह्य धरता येणार नाही.

अनेकांनी काढली अतिक्रमणे

मास्टर प्लॅनमधील उर्वरित रस्त्यांचे काम सुरू करण्यापूर्वी त्यांना अडथळा ठरणाऱ्या १३ हजार ३७५ घरांवर, दुकानांवर किंवा इतर बांधकामांवर हटावची कारवाई करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे मराठवाड्यामध्ये रस्ते विकासासोबतच मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण हटाव मोहीम राबविली जाण्याची शक्यता आहे. ही मोहीम राबविण्यापूर्वीच अनेक अतिक्रमणधारकांनी पुढाकार घेत अतिक्रमणे काढून घेतली आहेत.

Read About : 70 TMC river linking project छत्रपती संभाजीनगरात मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments
Loading comments...