ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काही तासांतच पोलिसांची कारवाई, जुन्या हत्या प्रकरणातील वॉरंटच्या आधारे अटक
नंदीग्राम : Milan Pradhan Arrest नंदीग्राम विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीपूर्वी तृणमूल काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नंदीग्राममध्ये काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला. पाठींबा जाहिर केल्यानंतर अवघ्या काही तासांतच काँग्रेसचे उमेदवार मिलन प्रधान यांना एका जुन्या प्रकरणात पोलिसांनी अटक केली आहे. या अटकेमुळे बंगालच्या राजकारणात एकच उडाली असून, काँग्रेसने यामागे भाजपची राजकीय खेळी असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
टीएमसी उमेदवाराची माघार
नंदीग्राममध्ये ६ ऑक्टोबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे. येथे तृणमूल काँग्रेसने संचिता प्रधान यांना उमेदवारी दिली होती. मात्र, शुक्रवारी संचिता प्रधान यांनी अचानक मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी यांची भेट घेतली आणि त्यानंतर आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची घोषणा केली. आपल्या उमेदवाराने माघार घेतल्यामुळे ममता बॅनर्जी यांनी भाजपला थेट टक्कर देण्यासाठी नंदीग्राममध्ये काँग्रेसचे उमेदवार मिलन प्रधान यांना तृणमूल काँग्रेसचा पाठिंबा जाहीर केला. ममता बॅनर्जींच्या या निर्णयामुळे भाजपसमोरील आव्हान वाढले होते.
प्रचारादरम्यान पोलिसांची कारवाई
ममता बॅनर्जी यांनी पाठिंबा जाहीर केल्यानंतर, मिलन प्रधान हे नंदीग्राम ब्लॉक नंबर २ मधील रेयापारा भागात घरोघरी जाऊन प्रचार करत होते. याच दरम्यान, शुक्रवारी संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मिलन प्रधान हे एका जुन्या हत्येच्या गुन्ह्यात आरोपी असून, त्यांच्याविरुद्ध वॉरंट जारी झाले होते. याच जुन्या केसच्या आधारे त्यांना अटक करण्यात आली आहे.
काँग्रेस आक्रमक
या अटकेनंतर काँग्रेस नेत्यांनी भाजपवर तीव्र शब्दांत हल्ला चढवला आहे. प्रदेश काँग्रेस अध्यक्ष शुभंकर सरकार म्हणाले की, निवडणुकीच्या तोंडावर अचानक जुनी केस बाहेर काढण्यात आली. भाजप देशात विरोधकांना संपवून एकपक्षीय हुकूमशाही आणू पाहत आहे. तर माजी प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनी म्हटले की, भाजप काँग्रेस उमेदवाराला घाबरली आहे, हे या अटकेवरून सिद्ध होते. त्यांनी नैतिक पराभव स्वीकारला आहे. दुसरीकडे, भाजपने हे आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. या अटकेशी भाजपचा कोणताही संबंध नाही. पोलीस एका गुन्हेगारी प्रकरणात त्यांचे कायदेशीर काम करत आहेत असे भाजपने स्पष्ट केले.
नंदीग्राममध्ये तिरंगी लढतीचे चित्र
दोन जागांवर विजयी झाल्याने मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी यांनी ही जागा रिक्त केल्यामुळे येथे पोटनिवडणूक होत आहे. भाजपने सुवेंदु अधिकारी यांच्या दिवंगत सहाय्यक चंद्रनाथ रथ यांच्या मातोश्री हसीरानी रथ यांना रिंगणात उतरवले आहे. आता काँग्रेस उमेदवाराच्या अटकेनंतर या जागेवरील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली असून, ६ ऑक्टोबरच्या मतदानापूर्वी नंदीग्राममधील संघर्ष शिगेला पोहोचला आहे.
Read About : Marathwada Liberation War Day : मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी रंगला नेत्यांचा कलगीतुरा
E-Paper: Punyanagari E-Paper

You need an account to post comments.