Marathwada Tiger Corridor Project छत्रपती संभाजीनगर : वाघांचा प्रदेश म्हणून एकेकाळी मराठवाडा प्रांताची ओळख होती. जी विविध कारणांमुळे नंतर कमी-कमी होत पुसल्या गेली. आता वाघांनी डरकाळ्या फोडत आपल्या अधिवास क्षेत्रात पुनरागमन सुरू केले आहे. आजरोजी ६ वाघ मराठवाड्यात आहेत. त्यांच्या संवर्धन आणि सुरक्षिततेसाठी अखेर वन्यजीव प्रशासनाने कॉरिडॉर प्रोजेक्ट (व्याघ्र संचार प्रकल्प) राबविण्याबाबत समर्थता दर्शविलेली आहे. टप्प्याटप्प्याने सर्वेक्षण केले जाणार असून नांदेडचे काम पूर्ण झालेले आहे.
वाघांच्या प्राचीन संचार मार्गिका आजवर मोठ्या प्रमाणात नागरीकरण, शेती, विकासप्रकल्प आदी कारणांमुळे संकटात सापडलेल्या आहेत. काही मार्गिका बंदच झालेल्या आहेत. त्या पुन्हा कशा मोकळ्या करता येतील याचा विचार केला जात आहे. लोकांना त्रास नको, विकासकामांत अडथळा नको अशा पद्धतीचे नियोजन केले जात आहे. संचार प्रकल्प न राबविल्यास, मार्गिका सुरक्षित न केल्यास अभयारण्यांच्या परिघाबाहेर मुक्त संचार करणारे मराठवाड्यातील वाघ शिकाऱ्यांचे लक्ष्य ठरू शकतात. यामुळे प्रशासनाने यासाठी आता पुढाकार घेतला आहे.
विदर्भातून वर्ष २०१९ पासून नियमित मराठवाड्यात वाघ येत आहेत. येथील वनांत ते मुक्त संचार करत शिकारीचा मनुराद आनंद लुटत आहेत. गौताळा अभयारण्यात (जि. छत्रपती संभाजीनगर) पाच वर्षांपासून १ वाघ मुक्कामी आहे. नांदेडमधील वनक्षेत्रात ४ वाघ आहेत. वाघांचे प्रवेशद्वार म्हणून या जिल्ह्याने ओळख निर्माण केली आहे. धाराशिव जिल्ह्यात (येडशी रामलिंग घाट अभयारण्य परिसर) ५०० किमीचा प्रवास करून आलेला वाघ दोन वर्षांपासून बीड, अहिल्यानगर, सोलापूर असा हिंडत आहे.
अशा आहेत वाघांचा नोंदी
महाराष्ट्र शासनाच्या गॅझिटीयरमधील नोंदीनुसार १८७९ पर्यंत मराठवाड्यात वाघांची संख्या मोठी होती. नांदेड, बीड आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात या प्राण्याचा समृद्ध असा अधिवास होता. १९७२ च्या शिकारीनंतर मराठवाड्यात पहिला वाघ (हिंगोली जिल्ह्यात) ३ नोव्हेंबर २०१९ रोजी सी १ टी १ (वॉकर) आला. यानंतर २१ फेब्रुवारी २०२१ रोजी गौताळा अभयारण्यात ४९ वर्षांनंतर (टी ३ सी १) वाघ आला. तर, नांदेड जिल्ह्यात किनवट परिसरात अनेक वर्षांपासून वाघांचा आढळ आहे. धाराशिव जिल्ह्यात १९ डिसेंबर २०२४ पासून ॲव्हेंजर (टिपेश्वर अभयारण्यातील फोरमार्क वाघिणीचा बछडा) नावाचा वाघ ये-जा करून आहे.
वाघांचे असे आहेत संचार मार्ग
मराठवाड्यात पैनगंगा व टिपेश्वर अभयारण्यातून (यवतमाळ) वाघ येऊ शकतात. टिपेश्वर अभयारण्यातून यवतमाळ, कारंजा, अकोला, बुलढाणामार्गे जाईचा देव, अजिंठामार्गे गौताळा किंवा सोयगावमार्गे गौताळ्यात वाघ येऊ शकतात. किंवा टिपेश्वर, पैनगंगा, नांदेड, लातूर, येडशीमार्गे धाराशिव येथे वाघ येऊ शकतो. ज्ञानगंगा अभयारण्यातील वाघ पुसद, हिंगोली, माहूरगड, किनवट, आदिलाबाद (तेलंगणा) किंवा टिपेश्वरमध्ये जाऊ शकतात. पैनगंगा अभयारण्य नांदेड वनक्षेत्राला लागून आहे. येथील वाघ सहज मराठवाड्यात येऊ शकतात. गौताळा औट्रम घाट अभयारण्याचा भ्रमणमार्ग सोयगाव, सिल्लोड तालुक्यातून उत्तरेला यावल अभयारण्याकडे व पूर्वेला बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्याकडे जातो. तो पुढे मेळघाटकडे किंवा काटेपूर्णाकडे विस्तारला जाऊ शकतो.

Leave a Comment