इंडोनेशियातील लिआंग बुआ गुहेत २००९ मध्ये सापडलेल्या पायाच्या हाडावरून नव्या प्रजातीची ओळख; सुमारे ३.९ किलो वजनाचा हा पक्षी सव्वा लाख वर्षांपूर्वी अस्तित्वात
नवी दिल्ली : Megapodius Rokusii Fossil इंडोनेशियातील फ्लोरेस बेटावरील एका गुहेत वैज्ञानिकांना प्रागैतिहासिक काळातील महाकाय पक्ष्याच्या नव्या प्रजातीचा शोध लागला आहे. विशेष म्हणजे, याच लिआंग बुआ गुहेतून मानवाचा प्राचीन नातेवाईक ‘हॉबिट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या होमो फ्लोरेसिएन्सिसचे अवशेष सापडले होते. नव्या पक्ष्याचे नाव ‘मेगापोडियस रोकुसी’ असे ठेवण्यात आले आहे.
यासंबंधीचे संशोधन ऑक्टोबर २०२६ मध्ये ‘अल्चेरिंगा’ नियतकालिकात प्रसिद्ध झाले. या पक्ष्याचे जीवाश्म २००९ मध्ये सापडले होते. मात्र, त्याची नवी प्रजाती म्हणून आता ओळख पटली. संशोधकांना उजव्या पायाच्या हाडाचा खालचा भाग मिळाला. त्यावरून या पक्ष्याचे वजन सुमारे ३.९ किलो असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. फ्लोरेस बेटावर सध्या आढळणाऱ्या ऑरेंज-फूटेड मेगापोडचे वजन साधारण ०.५ ते १.२ किलो असते.
अंडी उबवण्याची अनोखी पद्धत
‘मेगापोड’ हे कोंबडीचे नातेवाईक असून त्यांना इनक्युबेटर बर्डस किंवा माउंड-बिल्डर्स म्हणतात. इतर पक्ष्यांप्रमाणे अंड्यांवर बसण्याऐवजी ते जमिनीत अंडी पुरतात. सभोवतालच्या मातीतील उष्णतेमुळे अंडी उबतात. या पक्ष्यांचे पाय मजबूत, पंजे मोठे आणि नखे तीक्ष्ण असतात.
उडू शकत होता का?
जीवाश्मात पंख किंवा खांद्याची हाडे नसल्यामुळे हा पक्षी उडू शकत होता की नाही, हे स्पष्ट झालेले नाही. तो नेमका कधी नामशेष झाला आणि सध्याच्या लहान मेगापोडसोबत त्याचे सहअस्तित्व होते का, याबाबतही संशोधकांना निश्चित माहिती नाही. या प्रजातीचे नाव इंडोनेशियन प्राणिशास्त्रज्ञ रोकुस ड्यू अवे यांच्या सन्मानार्थ ठेवण्यात आले आहे. वॉलेसिया या आशिया आणि ऑस्ट्रेलियामधील बेटसमूहातून नोंदवलेला हा पहिला वर्णन केलेला मेगापोड जीवाश्म असल्याने या प्रदेशातील प्राचीन जैवविविधतेच्या अभ्यासाला महत्त्वाची दिशा मिळाली आहे.
Read About : Early Bedtime for Prediabetes – प्री-डायबिटीजचा धोका कमी करण्यासाठी रात्री लवकर झोपा
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.