मायक्रोसॉफ्टची सेवा जगभरात ठप्प, युजर्सचा संताप; मायक्रोसॉफ्ट ३६५, आउटलूक, टीम्स ॲप सेवा विस्कळीत, विविध कंपन्या व शासकीय कामकाजाला फटका
शिकागो : Microsoft Global Outage तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपनी मायक्रोसॉफ्टच्या जगभरातील विविध सेवा अचानक ठप्प झाल्याने एकच खळबळ उडाली. परिणामी आशियापासून अमेरिकपर्यंतच्या विविध कंपन्या आणि सरकारी यंत्रणांचे कामकाज विस्कळीत झाले. यामुळे जगभरातील लाखो युजर्सना नाहक मनस्पात सहन करावा लागला. दरम्यान, सर्व्हरवर अतिरिक्त ताण आल्याने हा प्रकार घडल्याचा खुलासा मायक्रोसॉफ्टने केला. तसेच संपूर्ण सेवा पूर्ण ताकदीने पूर्ववत करण्याचे काम युद्घपातळीवर सुरू असल्याचे कंपनीने शुक्रवारी सांगितले.
मायक्रोसॉफ्टच्या जगभरातील सेवा गुरूवारी आणि शुक्रवारदरम्यान अनेक तास बंद राहिल्या. यात मायक्रोसॉफ्ट ३६५, आउटलूक, टीम्स ॲप आणि कृत्रिम बुद्घिमत्ता (एआय) असिस्टंट कोपायलटसह प्रमुख सेवांचा समावेश आहे. या तांत्रिक बिघाडामुळे ईमेल पाठवणे, ऑनलाईन बैठका आणि क्लाउडवर फाइल सेव्ह करण्यासारखे काम ठप्प पडले. परिणामी जगभरातील विविध कंपन्या, शाळा, रुग्णालय आणि विविध देशांमधील सरकारी कामकाज विस्कळीत झाले.
सेवांमधील अडचणींवर लक्ष ठेवणाऱ्या ‘डाऊनडिटेक्टर’ या संकेतस्थळानूसार सुरूवातीला १ लाख ३० हजारांहून अधिक युजर्सनी आउटलूक वापरता अडचणी येत असल्याचे नोंदवले. जपान, ऑस्ट्रेलिया, हाँगकाँग, सिंगापूर आणि फिलीपीन्ससह विविध देशांमधील कंपन्या आणि सरकार कामकाजाला यामुळे मोठा फटका बसला. ऑस्ट्रेलियाचे गृहमंत्री टोनी बर्क यांच्यानूसार मायक्रोसॉफ्टने या जागतिक बिघाडची तुलना २०२४ मधील ‘क्राउडस्ट्राइक आउटेज’शी केली आहे. त्यावेळी जगभरातील लाखो मायक्रोसॉफ्ट विंडोज संगणक अचानक बंद पडले होते.
सायबर हल्ल्याची शक्यता फेटाळली
मायक्रोसॉफ्टने सायबर हल्ल्याची शक्यता फेटाळून लावत लवकरात लवकर सेवा पूर्ववत करण्याचे आश्वासन दिले. एक्सचेंज ऑनलाइन आणि ईमेल सेवांशी संबंधित प्रणालीला या बिघाडाचा सर्वाधिक फटका बसला आहे. कंपनीकडून सर्व्हर पुन्हा पूर्ववत करण्याचे काम युद्घपातळीवर केले जात असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
दिल्लीत ३ विमानांची उड्डाणे रद्द
मायक्रोसॉफ्टमधील तांत्रिक बिघाडाचा फटका भारतातील अनेक सेवांना देखील बसला. शुक्रवारी सकाळी स्पाइसजेट एअरलाईन्सने दिल्लीहून उड्डाण घेणारे ३ विमाने रद्द केली. तर दरभंगा आणि मंबईकडे जाणाऱ्या २ विमानांना विलंब झाला. इंडिगोच्या ईमेल मदत सेवांनाही फटका बसला. दिल्ली विमानतळाने प्रवाशांसाठी दिशानिर्देश जारी केले आहेत. विमानतळाकडे निघण्यापूर्वी आपआपल्या विमानांची स्थिती पाहून नियोजन करण्याचा सल्ला प्रवाशांना देण्यात आला आहे.
महत्त्वाचे मुद्दे
Read About : Global M&A – जागतिक विलीनीकरण – खरेदी व्यवहारांना मोठा फटका; तिसऱ्या तिमाहीत व्यवहारमूल्य 36.9 टक्क्यांनी घटले
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.